भविष्यकाळात जेव्हा जेव्हा एआयचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा त्यात २०२३च्या जुलै महिन्याची ठळक अक्षरात विशेष नोंद केली जाईल यात शंका नाही. एआय संशोधन निदान सहा महिने स्थगित ठेवावे अशी मागणी करणाऱ्या एलॉन मस्कनेच नवी xAI कंपनी काढणे ही तर महिन्यातील ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागते. शिवाय जीनिव्हात भरलेली मानवसदृश (Humanoid) रोबोंची पहिली पत्रकार परिषदही अशीच महत्त्वाची बातमी होती.
या बातम्यांनी दिलेल्या धक्क्यांमधून सारतोय न सावरतोय तोच आणखी एका बातमीने व तिच्यावरील मल्लिनाथीने लक्ष वेधून घेतले. २९ जुलैच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये या बातमीवर भाष्य केले आहे. ‘लेखक सर्जनशील असतोच, परंतु त्याला लिहिण्यासाठी, शैली विकसित करण्यासाठी, पूरक अभ्यासाचे श्रम घ्यावेच लागतात. कारागिरीही करावी लागते. हे सारे न करता एखाद्याला लेखक होता येईल?’
उपस्थित केलेल्या या प्रश्नाचे जे उत्तर अपेक्षित आहे तेच हे भाष्य करतानाही दिले आहे. ‘खरं तर याचं उत्तर नकारात्मक आहे.’ आता हा विषय येथेच संपायला हवा. पण तसे झाले नाही. ‘खरं तर’ला छेद देणारे पुढील वाक्य ‘परंतु’ने सुरू होते. ‘परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात होकारार्थी उत्तर येऊ शकते.’
त्याचे असे झाले आहे, की अशा सर्जनशील (पण तरीही परिश्रमपूर्वक) लेखनाची पुस्तके एआय कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने उत्पादित करू लागल्या आहेत. निर्मिती (Creation) आणि उत्पादन (Production) यांच्यामधील भेदरेषाच जणू पुसली जात आहे. आणि तीही अप्रामाणिकपणे!
हा सारा खेळ तंत्रवैज्ञानिक आहे. एआयचे भांडवल म्हणजे विदा (Data) आणि आज्ञाप्रणाली. पिठाच्या गिरणीचे उदाहरण फारच बटबटीत होईल. तरी पण मुद्दा समजण्यासाठी उपयुक्त ठरेल. पिठाच्या गिरणीत आपण धान्य टाकतो, ओततो म्हटले तरी चालेल. मग या धान्यावर कोणती विशिष्ट प्रक्रिया करायची ते ठरवतो.
कधी कधी आपणाला धान्य दळायचे नसते, तर फक्त भरडायचे असते. (विशेषतः खपली गव्हाची लापशी करताना ते भरडावे लागतात) आपल्याला पोळी करायची असेल तर गव्हाचे दळण करून पीठ नावाचा ‘आउटपुट’ गिरणीतून बाहेर काढावा लागतो. रवा, मैदा ही आणखी सूक्ष्म आउटपुटे. अतिविकसित गिरणीत किंवा चक्कीत या वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी वेगवेगळी बटणे दाबायची तरतूद हवी, हे उघड आहे.
आपण मराठी भाषेच्या संदर्भात विचार करू. मराठीतील वाचकप्रिय लेखक व त्याच्या लोकप्रिय रचना निवडण्यासाठी आधी ‘सर्व्हे’ वगैरे केला जाईल हे उघड आहे. त्यातून समजा असे निष्पन्न झाले, की सुहास शिरवळकर हे असे लोकप्रिय लेखक आहेत व त्यांच्या कादंबऱ्यांना वाचकांकडून भरपूर मागणी आहे, तर मग एआयला शिरवळकरांच्या उपलब्ध कादंबऱ्या डेटाच्या रूपात ‘फीड’ केल्या जातील. कादंबरीचे स्वरूप इत्यादी संबंधीची विदाही अर्थातच पुरवली जाईल. एआयला एक प्रकारे लेखक म्हणून प्रशिक्षित केले जाईल आणि मग त्याला तशी आज्ञा दिली तर तो सुहास शिरवळकरांची वाटावी अशी कादंबरी आउटपुट म्हणून देऊ शकेल!
दुर्दैवाने सुहास शिरवळकर आज आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांची नवी कादंबरी येणे शक्य नाही हे गृहीत धरून वाचक जुन्या कादंबऱ्याच वाचत असणार. त्यांना एकदा शिरवळकरांच्या शैलीची आठवण करून देणारी, किंबहुना शिरवळकरांनीच लिहिली आहे असे वाटायला लावणारी ही एआय लिखित कादंबरी वाचायला मिळाली, की तिच्यावर उड्या पडणार. एआय कंपनीचे उखळ पांढरे होणार!
पण यात शिरवळकरांना, (आता ते हयात नसल्याने) त्यांच्या वारसदारांना काय लाभ होणार? तर काही नाही. ज्याप्रमाणे चांगल्या चांगल्या लेखकांच्या छापील पुस्तकांच्या प्रती चांचेगिरी करून छापल्या जातात व फुटपाथवर कमी किमतीत विकल्या जातात. त्याच प्रकारची ही एक पायरसी (Piracy) नव्हे काय?
आणि अशा परिस्थितीत शिरवळकरांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून एआय कंपनीला मिळालेल्या फायद्याच्या रास्त भागावर रॉयल्टी- म्हणजे स्वामित्वहक्कापोटीच्या रकमेवर दावा का करू नये?
अमेरिकेत असे घडले, याच जुलै महिन्यात!
खरे तर या प्रकाराची सुरुवात मे महिन्यातच झाली होती. अमेरिकेत रायटर्स गिल्ड (Writers Guild) नावाची लेखकांची संघटना आहे. या संघटनेचे सदस्य लेखक तेव्हा चक्क रस्त्यावर उतरले. त्यांनी एक संपही केला म्हणे. त्यांच्या इतरही मागण्या होत्या. मुख्य मागणी होती ती एआयच्या चांचेगिरीला आळा घालण्याची. यामुळे लेखकांचे दुखणे चव्हाट्यावर आले खरे; पण त्यातून त्यावरील उपचार मिळणार नव्हते, म्हणून त्यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. अर्थात, संघर्षापेक्षा समझोता केव्हाही चांगला म्हणून ओपन एआय, अल्फाबेट, मेटा, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, स्टॅबिलिटी एआय इत्यादी एआय कंपन्यांना खुले पत्र लिहिण्याची खबरदारी त्यांनी घेतली आहे.
या पत्रावर दहा हजारांपेक्षा अधिक लेखकांच्या सह्या आहेत! या लेखकांनी असाही दावा केला आहे, की या चांचेगिरीमुळे लेखकांच्या उत्पन्नात गेल्या दहा वर्षांत चाळीस टक्के घट झाली आहे. आता हे चाळीस टक्के गेले कोठे? अर्थातच एआय कंपन्यांच्या नफ्यात. मार्क्सचे अनुकरण करून या प्रकाराला लेखकांचे शोषण म्हणता येईल काय? अर्थात, त्यासाठी बरेच सिद्धांतन करावे लागेल. भांडवलशाहीच्या या नव्या रूपाला उदाहरणार्थ ‘डिजिटल कॅपिटॅलिझम’ (Digital Capitalism) म्हणावे की आणखी काही?
‘तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरमध्ये लेखकांच्या कृती कॉपी करून टाकल्या आहेत. त्याच्या आधारेच ते तंत्रज्ञान नवीन लेखन करते’, असा संघटनेचा युक्तिवाद आहे. संघटनेच्या अध्यक्ष माया शानभाग लँग यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘या तंत्रज्ञानातून होणारी नवनिर्मिती ही त्याला पुरविलेल्या साहित्यावर आधारलेली आहे. त्यामुळे संबंधित लेखकांना त्याचा मोबदला मिळणे हेच न्यायाचं ठरतं!’
हेही सांगायला हवं, की लेखकांच्या मागण्यांना ओपन एआयचे मुख्याधिकारी सॅम अल्टमन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ज्या लेखकांच्या साहित्यकृतींचा वापर झाला आहे, हे शोधून त्यांना मोबदला देण्याचे प्रारूप विकसित करणार असल्याचे सांगितले आहे. बाकी एआय कंपन्या कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल.
लेखकांच्या मागण्या न्याय असल्याचे महाराष्ट्र टाइम्सच्या भाष्यकारांना मान्यच आहे. तथापि, पुढे जाऊन ते म्हणतात की ‘कृत्रिम तंत्रज्ञानाद्वारे सुमार दर्जाचे लेखन जरूर होईल. परंतु, अस्सल जीवनानुभव देणाऱ्या रसरशीत साहित्याची निर्मिती होऊ शकणार नाही. त्यासाठी प्रतिभा, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मुख्य म्हणजे लेखन करण्याची ऊर्मी या गोष्टी लागतात. त्या कृत्रिम तंत्रज्ञानाकडे कोठून येणार?’
लेखकांसाठी हा आशावाद उभारी देणारा ठरेल यात वाद नाही. पण एआय कंपन्यांचे प्रयत्न, भाष्यकार सांगतात, त्या घटकांनाही गवसणी घालण्याच्या रोखाने जारी आहेत याचीही नोंद घ्यायला हवी.
आधी संप, मग पत्र आणि अखेर शेवटी न्यायालयीन प्रक्रिया असा शोषित अमेरिकन लेखकांच्या प्रतिसादाचा प्रवास आहे. सारा सिल्व्हरमन आणि अन्य दोन लेखकांनी आता ओपनएआय आणि मेटा या कंपन्यांवर न्यायालयात खटला दाखल केला आहे. ते दोन लेखक म्हणजे रिचर्ड कॅड्री आणि ख्रिस्तोफर गोल्डमन.
पण गोष्ट येथेच थांबत नाही. आपण वापरलेला डेटा हा अमेरिकेत ज्याला ‘शॅडो लायब्ररीज’( Shadow Libraries) म्हणतात, त्यांच्याकडून घेतला आहे, असा बचाव कंपन्या करू शकतात. तेव्हा मुळावर घाव घालणेच सयुक्तिक मानून मुळात या छायाग्रंथालयांच्या वेबसाइटच्या वैधतेवरच आक्षेप घेतला आहे.
वस्तुतः इतरांचे अस्सल सर्जनशील साहित्य चोरून आपल्या नावावर खपविण्याचा प्रकार काही नवा नाही. तुकाराम महाराजांचे अभंग सालोमालो नावाचा पंडित आपल्या नावावर खपवायचा. पण ही चोरी उघड होऊ नये म्हणून त्यात तो काही बदलही करीत असे. हे कळल्यावर आपले काव्य हे ईश्वरी प्रसाद आहे, अर्थात, प्रातिभ आहे याची जाणीव असलेले तुकोबा उद्विग्न झाले व त्यांनी सालोमालोचा निषेध करणारे अभंग लिहिले. त्यातील एक अभंग उधृत करणे पुरेसे होईल.
‘‘सालोमालो हरीचे दास। म्हणऊनी केला अवघा नास।।
अवघे बचमंगळ केले। म्हणती एकाचे आपुले।।
सोडूनी संतांची उत्तरे। करीता आपणा भूषणे।।
तुका म्हणे कवी। जगामधी रूढ दावी।’’
या प्रकाराची तुकोबांनी ‘कालवूनी विष। केला अमृताचा नाश’ अशी संभावना केली आहे.
तुकोबांसारख्या प्रासादिक महाकवीची कविता चोरायचा मोह एखाद्याला होणे स्वाभाविक मानता येईल. पण अगदी उत्तर पेशवाईतील कवी सगनभाऊ यालाही असाच अनुभव आला होता. एका लावणीत तो कविराज महादेवाच्या लावण्यांची चोरी कशी होत आहे याचे वर्णन करतो,
महादेव कविराज पुण्यामधी राहाती। त्याचे छंद ऐकून गुणीजन गाती। बदलून अंतरे मग उलटे वाहती। तोडीमध्ये छानपछान करती। अभंग बदलती।
अर्थ असा की काव्यक्षेत्रातील चांचे सगन किंवा महादेव यांच्या लावण्यांत फेरफार करून त्यात कवी म्हणून आपले नाव घालतात.
कवीने कवितेत आपले नाव घालणे या प्रकाराला अभंग असे म्हटले जाई. अशा प्रकारचे नाव रचनेच्या शेवटच्या ओळीत समाविष्ट केले जाई. ती जणू त्या कवीची सहीच असे. जसे तुका म्हणे, एका जनार्दनी, ज्ञानेश्वरांचं बापरखुमादेवीवर इत्यादी. पुढे रचनेची ही शेवटची ओळ इतकी महत्त्वाची ठरली की या काव्यप्रकारालाच अभंग असे नाव पडले.
या संदर्भात एका यादवकालीन आख्यायिकेची आठवण होते. यादवांचा राजा रामदेवराव याच्या देवगिरीच्या दरबाराला नरेंद्र, नृसिंह आणि साल हे तीन त्रिवर्ग बंधू कवी म्हणून भूषवीत होते. नरेंद्राने रुक्मिणीस्वयंवर नावाचे काव्य रचले. ते त्याने राजदरबारात सादर केले. रामदेवराव यादवाला ते इतके आवडले की ते आपल्या नावावर केले जावे, अशी इच्छा त्याने कवीपुढे व्यक्त केली. त्यासाठी तो अर्थातच भरपूर बिदागीही देणार होता.
राजाची ही ‘ऑफर’ नरेंद्रामधील कवीला पटेना. असे केल्याने आपल्या कवीकुळाला कलंक लागेल, असे त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला सांगू लागली. त्याने शिताफीनं, काव्याची प्रत नीटनेटकी-शुद्ध करून आणतो असा बहाणा केला व रातोरात देवगिरीहून परागंदा झाला.
काव्याचे कर्तृत्व मागताना राजाने वापरलेला शब्द महत्त्वाचा आहे, ‘या काव्याचा अभंगु मज द्यावा.’
थोडक्यात अभंग हा कवीच्या कर्तृत्वाला व पर्यायाने त्याच्या स्वामित्वाला अधोरेखित करणारा शब्द आहे. वामयचौर्य नावाचा प्रकार कायदा आणि नीती या दोन्ही दृष्टिकोनांतून गहर्णीय आहे. गेल्या शतकातील प्रसिद्ध कादंबरीकार प्रा. ना. सी. फडके यांच्या प्रतिभासाधन या ग्रंथावर असाच आरोप झाला होता. त्याची चर्चाही तेव्हाच्या साहित्यवर्तुळात एक सनसनाटी ठरली होती. त्यावरून आचार्य अत्रे आणि स्वतः लेखक यांच्यात चांगलीच जुंपली होती. फडके यांनी हा आरोप अर्थातच नाकारला.
मुद्दा वेगळाच आहे. एका लेखकाने दुसऱ्या लेखकाची एखाद्या कृतीवरून एखादी कृती बेतली व ती आपली असल्याची बतावणी केली तर ती केव्हाना ना केव्हा लक्षात येते व त्या लेखकावर स्वामित्वकायद्याखाली खटला भरता येतो. परंतु नव्याने उपस्थित झालेल्या अमेरिकेतील या प्रकरणाची गुंतागुंत अशी आहे, की एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या बौद्धिक किंवा प्रातिभ मालमत्तेची चोरी केली नसून ती चोरी अशा एका यंत्राद्वारे झाली आहे, ज्याला स्वामित्व, चोरी या मानवी व्यवहारातील संकल्पनाचे ज्ञान वा भान नाही. त्यामुळे तुम्ही ना त्याला त्यासाठी जबाबदार धरू शकता, ना त्याच्यावर खटला भरू शकता, ना नुकसानभरपाई मागू शकत, काही कारवाई करायचीच असेल तर तुम्ही त्या यंत्राच्या मालकावर करू शकता.
एकाच्या कृत्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार तेव्हाच धरता येते, की जेव्हा त्या दुसऱ्याने केलेली कृती स्वयंप्रेरणेने केली गेली नसून त्याच्याकडून ती पहिल्याने करवून घेतली आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी दुसऱ्यावर टाकता येत नाही. ती पहिल्याचीच ठरते. दुसरा हा पहिल्याचा हस्तक म्हणून वावरत असतो. या प्रकाराला ‘व्हिकॅरियस रिस्पॉन्सिबिलिटी’ (Vicarious Responsibility) असे म्हटले जाते. हे एक प्रकारचे संक्रमित किंवा अप्रत्यक्ष उत्तरदायित्व होय. येथे मुद्दा फक्त एवढाच आहे की हस्तकाचे काम एखाद्या माणसाने केले नसून यंत्राने केले आहे.
एवढा सारा गदारोळ सुरू असताना, आरोपांची धूळ उडत असताना व संशयाचे धुके दाट होत असताना हे सर्व स्वस्थ बसून पाहात राहाणे एआय कंपन्यांना शक्यता नव्हते. त्यांच्या वतीने एक पत्रकार परिषद भरविण्यात आली. या पत्रकारपरिषदेत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कंपन्यांचे प्रतिनिधी किंवा एआययुक्त रोबोंचे निर्माते वैज्ञानिक इत्यादी उपस्थित असणे अपेक्षित होतेच. पण विशेष म्हणजे ते आपापल्या रोबोंना समवेत घेऊन आले होते आणि अनेक प्रश्नांची उत्तरे या मानवसदृश रोबोंनीच दिली. इंग्रजीत ज्याला ‘फ्रॉम हॉर्सेस माऊथ’ (from Horse’s Mouth) असे म्हणतात तसा हा प्रकार होता. ही घटनाही जुलैमधीलच व तिचा उल्लेख मागच्या लेखात केला आहे. त्यावर आणखी थोडा प्रकाश ठेवायला हवा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.