Sant Dnyaneshwar :भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण संत ज्ञानेश्वर!

sant dnyaneshwar
sant dnyaneshwar esakal
Updated on

भक्ती कशी करावी याचे असे मूर्तिमंत उदाहरणच ज्ञानेश्वर आपल्या विराण्यांतून भक्तांपुढे ठेवतात. ज्ञानेश्वरांची भक्ती कुठेही जीवनापासून दूर जात नाही, जीवनसन्मुख राहते. सर्व ऐंद्रिय संवेदना त्यांच्या रचनेतून व्यक्त होतात. मनाला जाणवेल असा आनंद भरून राहिल्याचा प्रत्यय आपल्याला येतो.

हेमंत गोविंद जोगळेकर

वाचकहो, प्रारंभलेखासाठी मंगेश पाडगावकरांचे तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे (सकाळ साप्ताहिक, प्रसिद्धीः ७ ऑक्टोबर) हे गीत घेऊन एक प्रकारे मी ही लेखांकमाला लिहिण्यासाठी माझा सूर लागू दे, अशी प्रार्थनाच केली होती.

एकदा सूर लागल्यावर सुरुवात सुरुवातीपासूनच केली पाहिजे. मराठी गीतांतील भावगीतांची सुरुवात केली ती संत ज्ञानेश्वरांनी. ज्ञानेश्वरांच्या समकालीन आणि त्यांच्यानंतरच्या संतकवींच्या रचना आळवल्या जातात, त्या त्यायोगे ईश्वराचे नामस्मरण करून मोक्ष मिळवता यावा म्हणून.

ज्ञानेश्वर तत्त्वज्ञ कवी होते. ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी संस्कृतातील श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे तत्त्वज्ञान सामान्यजनांसाठी मराठीत आणले. हे तत्त्वज्ञान त्यांनी रुक्षपणे मांडले नाही. ते सामान्यांच्या जीवनातील नाना दृष्टांत देऊन पटवून दिले.

गीतेत मोक्षप्राप्तीचे चार मार्ग सांगितले आहेत. त्यातला संतांचा आवडता मार्ग म्हणजे भक्तियोग. अनेक संतकवी आपल्या काव्यातून आपल्या इष्ट देवतेची आळवणी करतात. ज्ञानेश्वर आपल्या विराण्यांतून त्या भक्तीतील भावाचा थेट प्रत्यय आणून देतात.

sant dnyaneshwar
Sant Dnyaneshwar Maharaj : हरिनामाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली

विराणी म्हणजे विरहगीत. त्यात कवी परमेश्वराच्या प्रेयसीची भूमिका घेतो. परमेश्वराच्या विरहाने ही प्रेयसी व्याकूळ होते आणि आपली परमेश्वरप्राप्तीसाठीची ओढ विराणीतून व्यक्त करते. येथे घेतलेली ज्ञानेश्वरांची विराणी आहे, पैल तो गे काऊ कोकताहे. वास्तविक कावळा हा कुरूप, कर्कश आणि अशुभ पक्षी समजला जातो; पण ज्ञानेश्वरांच्या ठाई सर्व प्राणिमात्रांविषयी केवळ प्रेम आणि प्रेमच आहे.

या प्रेमाने ते कावळ्याला लाडिकपणे काऊ म्हणतात. आईने आपल्या बाळाला रिझवण्यासाठी कावळ्याला त्याचा खेळगडी बनवून हाकारावे तसे. मग हा कावळा निवेदिकेचा जिवलग होऊन जातो. कावळ्याशी संबंधित आणखीही एक संकेत आहे, तो आपल्या घरापाशी येऊन ओरडत राहिला की पाहुणे येतात. या विरहिणीला पंढरीनाथाची ओढ लागलेली आहे.

पैलतीरावर ओरडणारा कावळा पंढरीनाथ आपल्या घरी पाहुणे येणार असल्याचा शुभशकुनच आणत आहे, असे तिला वाटते. कावळा यावा आणि त्यायोगे पंढरीनाथ यावेत यासाठी तिने या कावळ्याचे केवढे लाड करायचे आश्वासने दिली आहेत. तो यावा यासाठी त्याचे पाय ती सोन्याने मढवून द्यायला तयार आहे.

पंढरीनाथांची वर्दी त्याने द्यावी म्हणून त्याला ती दहिभात भरवायचा, त्याच्या ओठी (चोची?) दुधाची वाटी लावायचा वायदा करीत आहे. ‘तो खरंच येईल ना?’ अशा आशंकेपोटी, ती कावळ्याला त्याच्या येण्याची ग्वाही द्यायला सांगते आहे. कावळ्याने आंब्यासारखी रसाळ गोड फळे चुंबावीत आणि पंढरीनाथ आजच येणार असल्याची गोड बातमी आपल्याला द्यावी अशी तिची तीव्र इच्छा आहे.

ज्ञानेश्वर तिच्याच शब्दांतून ती आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि मग तिची भावावस्था आपलीही होते. अशी जीव तोडून परमेश्वराची कामना केली तर तो नक्की भेटेल असा शकुनच ज्ञानेश्वर सांगतात; पण या विराणीतील शकुन सांगणारा काऊ पैलतीरावर आहे.

या भेटीसाठी ऐलतीर सोडावे लागणार आहे असे तर ज्ञानेश्वर सुचवीत नाहीत? या विराणीत विरहणीच्या प्रेमभावाची उत्कटता ज्ञानेश्वर आपल्या प्रत्ययाला आणून देतात. भक्ती कशी करावी याचे असे मूर्तिमंत उदाहरणच ज्ञानेश्वर आपल्या विराण्यांतून भक्तांपुढे ठेवतात. ज्ञानेश्वरांची भक्ती कुठेही जीवनापासून दूर जात नाही, जीवनसन्मुख राहते.

सर्व ऐंद्रिय संवेदना त्यांच्या रचनेतून व्यक्त होतात. मनाला जाणवेल असा आनंद भरून राहिल्याचा प्रत्यय आपल्याला येतो.

sant dnyaneshwar
गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

ज्ञानेश्वरांनी ही विराणी लिहिली त्याला आता सातशेहून अधिक वर्षे उलटून गेली आहेत, पण आजही ती ताजी वाटते. आजच्या वाचकांना/ श्रोत्यांना भावगीतातील आनंद देण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी आहे.

गहन वाटावे असे तत्त्वज्ञान सांगतानाही ज्ञानेश्वरांनी ते सहज सोपे करून सांगितले आणि हे करताना त्यातील काव्य कुठेही सुटले नाही, उणावले नाही.

ही विराणी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली आहे आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांनी गायली आहे ; पण या असामान्य सूर-ताल-संगीताचा आस्वाद घेतानाही आपण रंगून जातो ते त्यातल्या काव्यात, इतके ते प्रभावी आहे.

पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

sant dnyaneshwar
मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.