डॉ. सदानंद मोरे
एखाद्या ग्रंथावर भाष्य लिहिले जाते, त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न होतो याचा अर्थच मुळी त्या ग्रंथाची काही एक उपयुक्तता आहे, त्याचा जनमानसावर प्रभाव आहे; अनेकांसाठी तो आचारविचाराचे प्रमाण आहे असाच होतो. त्याची उपयुक्तता, प्रामाण्य आणि प्रभाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत त्या ग्रंथाचा अन्वयार्थ परतपरत नव्याने लावला जातो. बदललेल्या परिस्थितीतसुद्धा त्या ग्रंथाकडून काही जीवनसूत्रे उपलब्ध होऊ शकतात का, याचा शोध घेतला जातो.
भारतीय परंपरेतील असा ग्रंथ म्हणजे अर्थातच भगवद्गीता हे सांगायची गरज नाही. गीतेवरील आद्य भाष्यग्रंथ शंकराचार्यांचा होय. मात्र स्वतः शंकराचार्यांच्याच गीताभाष्यातून असे सूचित होते, की त्यांच्या पूर्वीही गीतेवरील भाष्ये लिहिली गेली होती. दुर्दैवाने आज ती उपलब्ध नाहीत. त्यामुळे या क्षेत्रातील आद्यत्वाचा मान शंकराचार्यांनाच द्यावा लागतो.