हेमंत गोविंद जोगळेकर
तुळशीचे बनी।
जनी उकलते वेणी।।१।।
हातीं घेऊनियां लोणी।
डोई चोळी चक्रपाणी ।।२।।
माझे जनीला नाहीं कोणी ।
ह्मणुनी देव घाली पाणी ।।३।।
जनी सांगे सर्व लोकां।
न्हांऊं घाली माझा पिता ।।४।।
मागच्या लेखांकात (पैल तो गे काऊ... –सकाळ साप्ताहिक –प्रसिद्धीः ऑक्टोबर २१) आपण एका ‘विराणी’चा म्हणजे विरहगीताचा आस्वाद घेतला. अशा विराण्यांतून पुरुष संत कवी स्वतःकडे स्त्रीची भूमिका घेताना दिसतात आणि परमेश्वराची एक स्त्री म्हणून कामना करतात.
असे असेल तर स्त्री संत आपली परमेश्वरभक्ती कशा व्यक्त करीत असतील? संत कवयित्री जनाबाईच्या रचना अगदी वेगळ्या आहेत. या लेखांकात संत जनाबाईची एक रचना पाहू. ती आहे जनी उकलते वेणी...
इथे जनी आपली वेणी उकलते आहे - तेही विठ्ठलाला प्रिय असलेल्या तुळशीच्या बनात जाऊन. तर तिथे साक्षात चक्रपाणी हातात लोणी घेऊन आपल्या हाताने तिचे डोके चोळून देतो. जनीला कोणी नाही म्हणून देव स्वतः तिला न्हाऊ घालतो.
इथे जनी सर्व लोकांना सांगते, माझा पिता मला प्रेमाने न्हाऊ घालतो आहे. त्या काळातला हाडामासाचा बापदेखील आपल्या लेकीचे असे लाड करत नसेल; पण जनीचा विठ्ठल करतो. या ओव्यांचा एक पाठभेदही आहे. त्यात जनी सांगे सर्व लोका। न्हाऊ घाली माझा सखा।। असे म्हटले आहे.
डोके चोळून न्हाऊ घालणारा विठ्ठल पित्यापेक्षा जास्त सखाच आहे (शिवाय लोका आणि सखा हे यमकदेखील जुळणारे आहे!) खरे तर अनेक ओव्यांत, अभंगांत जनाईचे विठ्ठलाशी असलेले नाते वेगवेगळ्या तऱ्हेने आलेले आहे. बाप, बंधू अगदी तिचे अचडे बचडे बाळसुद्धा! पण मनोमन तो तिचा सखाच आहे.
जनाई आपल्या रचनांत कुठेही आपले स्त्रीत्व नाकारत नाही. संकोच आडवा येऊ देत नाही. किंबहुना जनाई जे जे करते त्यात विठ्ठल तिची साथ करतो. तिचे काबाडकष्ट चालूच असतात पण स्वतः विठ्ठल तिच्यासाठी ते कष्ट उपसतो.
सकाळी तिच्याबरोबर सडासंमार्जन करतो. पाण्याच्या घागरी भरून आणून देतो. गोवऱ्या थापतो. उखळात धान्य कांडू लागतो. जनी जात्यावर दळू लागली की स्वतः तिच्याबरोबर जाते फिरवतो. मग त्याच्याच हाताला फोड येतात, घामाने त्याचे पितांबर ओले होते.
तेव्हा जनीच त्याला थांबायला सांगते. इतकेच काय रात्री जनी झोपी जाते तेव्हा ती विठ्ठलासाठीही शेज अंथरते आणि ‘पुरे पुरे रे विठ्ठला जनीचा अंतरंग धाला’ असे उद्गार काढते.
याचे कारण ती आणि विठ्ठल हे वेगळे नाहीतच म्हणून ती जे जे करते आहे ते विठ्ठलच करतो आहे अशी तिची भावना आहे आणि त्याने ती तृप्त होते आहे. स्वतःच्या कष्टाचे, दुःखाचे, एकटेपणाचे तिने केलेले हे रूपांतर थक्क करणारे आहे.
विठ्ठल आपल्यासाठी हे सारे करतो हे ती गर्वाने मिरवायला जात नाही आणि त्याच्या समोर आपण कोणी क्षुद्र आहोत असा थोडाही न्यूनगंड बाळगत नाही.
वास्तविक जनाई ही पोरकी. तिच्या बापाने तिला नामदेवांच्या घरी आणून सोडले आणि तिथे ती दासीसारखी जन्मभर काम करत राहिली. तिथे तिला विठ्ठल सापडला आणि मग तो तिचाच होऊन गेला. हे अद्वैत तिला कोणी शिकवलेले नाही. तिचे तिलाच ते गवसले आहे.
अनेक संतांच्या रचनांत भगवंतापुढे आपण किती क:पदार्थ आहोत याचे वर्णन केलेले असते. पण जनाईच्या रचनांत तिचा लवलेशही नाही. कारण ती आणि विठ्ठल हे वेगळे नाहीतच.
एका स्त्रीने अशा तऱ्हेने व्यक्त होणे जनसामान्यांच्या पचनी पडण्यासारखे नव्हते. विठ्ठल जर जनीसाठी इतके करीत असेल तर ते त्याच्या रुक्मिणीला कसे चालत असेल असे त्यांना वाटते.
ही भावना मग अनेक लोकगीतांतून व्यक्त झालेली आहे. सारख्या जनीच्या घरी जाणाऱ्या विठ्ठलाला रुक्मिणी अडवते; म्हणते, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात। खरं सांगा विठ्ठला जनी संगं काय नातं?।।
विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असे पाप। जनी आहे अपुली लेक आपण तिचे मायबाप।।
अशा तऱ्हेने या लोकगीतात जनाई आणि विठ्ठलाच्या नात्याला समाजाला चालेल अशा बाप लेकीच्या नात्यात बसवले आहे ; पण जनाईचे आणि विठ्ठलाचे नाते अशा चौकटीत मावणारे नाहीच ते साक्षात अद्वैत आहे.
जनाईने ते या रचनेतून आणि आपल्या अनेक रचनांतून अगदी सहज मनोवेधकपणे मांडले आहे. जनीचे शहाणपण आणि प्रेम तिच्या जगण्यातून, अनुभवातून, बाईपणातून आलेले आहे. म्हणूनच जनाईच्या रचना हृदयंगम झाल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.