संत नामदेव यांच्यानंतर नाव घेतले जाणारे संतश्रेष्ठ सेना महाराज कोण होते?

sant Sena maharaj
sant Sena maharaj esakal
Updated on

डॉ. राहुल हांडे

चोरी करुनिया बांधले वाडे । झाले ते उघडे नांदत नाही ।

होऊनिया मिळविले धन । असता अवगुण वाया गेली ।।

मदिरा जुगार करी परदार । दारिद्र बेजार दुःखमोगी।

सेना म्हणे त्रासून फिरती ही जनी । मग चक्रपाणी भजू पाहे ।।

संत सेना महाराजांनी मध्ययुगीन भारताला परमार्थाचा व विवेकाचा आरसा दाखवलेला आहे.

समाजातील अनीतिपूर्ण व्यवहारावर रोकठोक टीका करण्याचे सामर्थ्य दाखवणारे संतश्रेष्ठ सेना महाराज म्हणजे महाराष्ट्रातील आणि उत्तर भारतातील भक्ती आंदोलनांचा अंतःसंबंध दाखवणारा नामदेवरायांनंतरचा एक अत्यंत महत्त्वाचा धागा म्हणता येतो.

सेना महाराज मराठी मातीचे लेणे आहेत की उत्तरेतील गंगाजल आहे, याबाबत मराठी व हिंदी अशा दोन्ही संत साहित्याच्या अभ्यासकांमध्ये आजवर एकमत झालेले दिसत नाही. महाराष्ट्रात ‘संत सेना न्हावी’ अशी त्यांची ओळख सांगितली जाते, तर उत्तरेत ‘सैन नाई’ म्हणून त्यांचा परिचय दिला जातो. त्यांचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास महाराष्ट्र आणि उत्तर भारत यामध्ये सदैव दोलायमान होत असलेला दिसतो.

सेना महाराजांसोबत आपले नाते सांगण्यात मध्यप्रदेशातील उमरिया ह्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बांधवगड किल्ल्याचे पारडे जड ठरते. सेना महाराजांच्या संदर्भातील अभ्यासकांच्या साधार मतप्रतिपादनाचे सार काढता हे वास्तव लक्षात येते. त्यामुळे सेना महाराजांचा शोध घेण्यासाठी बांधवगडापासून प्रारंभ करणे अधिक उचित ठरते.

बांधवगड मध्यप्रदेशातील रेवा संस्थानात कैमूरच्या डोंगरावर बांधलेला एक मजबूत किल्ला. ह्या परिसरात तेराव्या शतकात रामराजा अथवा राजाराम याचे राज्य होते. इ.स.१२७२मध्ये त्याच्या पदरी नाभिक म्हणून असणाऱ्या देविदास आणि प्रेमकुंवरबाई यांच्या पोटी सेना महाराजांचा जन्म झाला. देविदास हे एक धर्मपरायण व्यक्ती होते. त्यामुळे राजाची त्यांच्यावर खास मर्जी होती. त्यांच्याबद्दल राजाला नितांत आदर होता.

देविदास हे स्वामी रामानंद यांचे अनुयायी होते. एका कथेनुसार सेना महाराजांना बालपणात ‘नंदा’ असे संबोधले जायचे. पुढे ते नंदाचे सेना कसे झाले, यासंदर्भात काहीच माहिती उपलब्ध नाही. बालपणापासून परमार्थात रमणाऱ्या सेना महाराजांना एक दिवस राजाच्या सेवेला जाण्यास विलंब झाला. त्यावेळी प्रत्यक्ष विठ्ठलाने सेना महाराजांचे रूप घेऊन राजाची सेवा केली, अशी एक कथा आहे.

दुसऱ्या कथेनुसार विलंबाने पोहोचणाऱ्या सेना महाराजांजवळील आरशात आणि वाटीतील पाण्यात राजाला स्वतःऐवजी पांडुरंगाचे प्रतिबिंब दिसू लागले. त्यामुळे त्याला विरक्ती आली आणि तोदेखील परमार्थाच्या मार्गावर चालू लागला.

sant Sena maharaj
Sant Namdev Punyatithi : नामदेव महाराजांचा थोडक्यात जिवन प्रवास...

आयुष्याच्या उत्तरार्धात सेना महाराज काशी वास्तव्याला गेले. तेथे स्वामी रामानंद यांच्या बारा शिष्यांपैकी एक गणले गेले. त्यांनी काशीलाच समाधी घेतली, असे मानले जाते. तर त्यांनी बांधवगडावरच समाधी घेतली, असेही सांगितले जाते. रामराजाने त्यांचे भव्य समाधी मंदिर बांधले होते. आज काळाच्या ओघात बांधवगढ भग्न झाला आहे. सेना महाराजांच्या समाधीचा चबुतरा तेवढा शिल्लक आहे.

सेना महाराजांचा हा जीवनपट काही मराठी अभ्यासक बीदर राज्याशी जोडतात. त्यामुळे त्यांच्या जीवनातील कथांमध्ये राजा ऐवजी बादशहाचा उल्लेख केला जातो. बिदरचा संदर्भ घेत सेना महाराज ज्ञानदेव-नामदेव यांच्या संतप्रभावळीतील महत्त्वाचे संत म्हणून अधोरेखित केले जातात. सकल संतगाथेत सेना महाराजांचे सुमारे १३३ अभंग नमुद करण्यात आलेले आहेत.

हिंदी संतसाहित्याच्या अभ्यासकांच्या मते सेना महाराज उत्तरेतून काही काळ महाराष्ट्रात आले. येथे आल्यानंतर ते संतप्रभावळीत सहभागी झाले. मराठी संतसाहित्याच्या अभ्यासकांनुसार सेना महाराज मराठीच होते. नामदेवरायांप्रमाणे जीवनाच्या उत्तरार्धात उत्तरेत गेले. यासाठी त्यांच्या अभंगातील यादवकालीन मराठीचा अस्सल बाज दाखला म्हणून सांगितला जातो.

आणखी शोध घेतला तर सेना महाराजांचा जन्म चौदाव्या शतकात पंजाबातील अमृतसर (सोहलठटही) येथे झाला, असे ही मत प्रतिपादन करण्यात आल्याचे आढळते. श्रीसेन प्रकाश नावाच्या हस्तलिखित बाडामध्ये त्यांच्या जन्म राजपुतान्यात म्हणजेच राजस्थानात झाला, असाही उल्लेख आहे. गोरखपूर येथील कल्याण या मासिकातील एका उल्लेखानुसार त्यांचा जन्म १३व्या शतकात ‘बोधगढ’ राज्यात झाला.

या बोधगढ राज्याचा आज काही शोध लागत नाही. परशुराम चतुर्वेदी यांच्यासारखे संशोधकदेखील सेना महाराजांच्या जीवनपटाविषयी निश्चित विधान करत नाहीत. त्यामुळे सेना महाराज मराठी होते की उत्तर भारतीय याबद्दल अद्याप अभ्यासकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही.

संत सेना महाराजांसंदर्भात विचार करताना एक प्रश्न मात्र कायम संभ्रमात टाकणारा ठरतो. हा प्रश्न म्हणजे सेना महाराज जर हिंदी भाषक असतील तर त्यांची मराठी एवढी अस्सल कशी? आणि ते जर मराठी भाषक असतील तर त्यांची हिंदी एवढी सफाईदार कशी? यासाठी त्यांच्या हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांमधील काव्यरचनेचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.

धूप दीप घ्रित साजि आरती।। वारने जाउ कमला पती ।।

मंगला हरि मंगला।। नित मंगलु राजा राम राइ को रहाउ ।।

ऊतमु दी असरानिरमल बाती ।। तुंही निरंजनु कमला पती ।।

रामा भगति रामानंदु जानै ।। पूरन परमानंदु बखानै ।।

मदन मूरति भै तारि गोबिंदे ।। सैनु भणै भजु परमानंदे ।।

-गुरु ग्रंथ साहिब

सेना महाराजांच्या उपरोक्त हिंदी काव्यरचनेचा विचार केला असता ही रचना एखाद्या मराठी भाषक संतकवीची असावी असे अजिबात वाटत नाही. त्यांच्या मराठी अभंगांचा परामर्श घेतल्यास याच्या नेमके उलट वाटून जाते. असे अभंग एखाद्या हिंदी भाषक संतकवीने अस्सल यादवकालीन मराठीत रचणे अशक्य आहे, अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

ऐका स्वधर्म विचार । धंदा करी दोन प्रहर ।

सांगितले साचार । पुरणान्तरी ऐसे हे ।।

करुनिया स्नान । मुखी जपे नारायण ।।

मागुती न जाण । शिवू नये धोकटी ।।

आपला नित्यक्रम सांगताना सेना महाराज म्हणतात सकाळी पूजाअर्चा, नामचिंतन-भजन करून काखोटीस धोकटी (धोपटी) घेऊन बाहेर पडावे. आपला वंशपरंपरागत व्यवसाय करताना तो विनम्रपणे आणि कुशलतने करावा.

जातीभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून प्रत्येकाची सेवा करावी. घरी आल्यानंतर पुन्हा स्नान करून नामजप करावा. मग मात्र धोकटीला स्पर्शदेखील करायचा नाही. म्हणजेच उदरभरणाचा व्यवसाय सोडून उरलेला सर्वकाळ भक्तीत व्यतीत करायचा.

सर्व संतांप्रमाणे सेना महाराज यांनी आपले लौकिक जीवन आणि पारमार्थिक जीवन यांचे केलेले विभाजन येथे अधोरेखित केले आहे. तसेच आपल्या कर्मातही परमार्थ शोधलेला दिसतो. प्रस्तुत अभंगातील मराठी भाषेचा विचार करता ही कोण्या हिंदी भाषक संतकवीची मराठी वाटणे अशक्य वाटते.

ज्ञानदेव-नामदेव प्रभावळीतील जवळपास प्रत्येक संताने सेना महाराजांचा अत्यंत आदरपूर्वक व प्रेमपूर्वक केलेला उल्लेख त्यांच्या महाराष्ट्रातील रहिवासाची आणि संत सहवासाची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे हिंदी संतकवींनीदेखील आपल्या काव्यात त्यांचा उल्लेख केलेला आढळतो.

त्यामुळेच सेना महाराज मराठी प्रांतातील होते की हिंदी प्रांतातील होते याविषयी प्रत्येक विद्वान अभ्यासक स्वतःच्या पातळीवर ठाम विधान करत असला तरी संभ्रम दूर होत नाही.

मध्ययुगीन भक्ती आंदोलनातील संत हे प्रामुख्याने उपेक्षित समाजातून आलेले आहेत. त्यामुळे सामाजिक विषमता, वर्ण-जाती भेद आणि धार्मिक-सामाजिक शोषण याविषयी त्यातील बहुतेकांनी वेदना, भावना व विचार व्यक्त केलेले दिसतात. सेना महाराजांच्या काव्यरचनेत हा भाव आणि अशी अभिव्यक्ती मात्र अत्यल्प

प्रमाणात दिसते. त्यांच्या काव्यात नैतिक शिकवणीवर अधिक भर असलेला दिसतो. कदाचित बलुतेदार समाजातील नाभिक व्यवसायाचा संबंध थेट मानवी स्पर्शाशी येत असल्यामुळे स्पृश्य-अस्पृश्यतेसंदर्भातील दाहक अनुभव सेना महाराजांच्या वाट्याला आले नसावेत.

त्याचबरोबर त्यांना लाभलेल्या वडिलोपार्जित राजाश्रयामुळे त्यांची सामाजिक विषमतेविषयी अनुभूती टोकदार होऊ शकलेली नसावी. नैतिक उपदेशाबरोबरच काही प्रमाणात सेना महाराज अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांच्या व्यर्थतेवर भाष्य करताना दिसतात.

घुमती या जगी अंगी देवत खेळे । मरती कां मुले वाचवेना ।।

चेटुमेटुक साधन मंतर । दाविती प्रकार वाढवूनिया ।।

आंधळे हे जन विसरती केशवा । शेंदराचे देवा आळविती ।।

सेना म्हणे हरी जगाचा नायक । कर्तव्य सुख दुःख देई काढी ।।

sant Sena maharaj
Spiritual Tips : अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वर भक्ती...

श्रद्धा म्हणजे नेमके काय? याचे ज्ञान नसलेले लोक बुद्धीने अंधच आहेत. चराचरात व्यापलेला परमेश्वर त्यांना दिसत नाही म्हणून दगडाला शेंदूर फासून त्याला हे लोक भजतात. चेटुकमेटुक, मंत्र-तंत्र, अंगात येणे इत्यादी प्रकारातील ढोंग आणि खरा परमेश्वर व त्याची भक्ती यांचा काडीमात्र संबंध नाही, हे सांगताना सेना महाराज आणि तुकोबा यांचा थेट धागा जुळलेला दिसतो.

संत सेना महाराज उत्तरेत ‘सैन नाई’ म्हणून प्रसिद्ध झाले. शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये त्यांच्या एका पदाचा असलेला समावेश करण्यात आलेला आहे. तसेच त्यांची भक्त पंरपरा ‘सैन संप्रदाय’ म्हणून ओळखला जातो. भविष्यात सेना महाराजांचा जन्मभूमी व कर्मभूमी याविषयी असलेला संभ्रम नवनवीन संशोधनाबरोबर दूर होत राहील.

आपण सेना महाराजांना मराठी संत मानले तर नामदेवरायांनंतर उत्तरेत भक्ती आंदोलनाचे नेतृत्व करणारे दुसरे मराठी संत म्हणून त्यांचे अनन्यसाधारणत्व लक्षात येते. तसेच त्यांना आपण हिंदी संत मानले, तर मध्ययुगीन उत्तर भारतीय भक्ती आंदोलनातील एक प्रमुख प्रेरणा म्हणून त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. एक मात्र खरे, की संत सेना महाराजांनी मध्ययुगीन भारताला आपल्या व्यवसायाप्रमाणेच परमार्थाचा व विवेकाचा आरसा दाखवलेला आहे.

त्यांचे जीवन आणि तत्त्वज्ञान आजही व उद्याही माणसाच्या अविवेकाची हजामत करून त्याला विवेकी निटनेटकेपणा देण्याचे सामर्थ्य बाळगणारे आहेत. त्यांच्या एका रचनेत सेना महाराज म्हणतात-

आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।

विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।

उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।

भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।

चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

-----

sant Sena maharaj
Spiritual Facts : कर्मकांड नव्हे तर स्वतःच्या शरीरात राहणाऱ्या आत्म्याला ओळखणे म्हणजे अध्यात्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.