लक्ष्मीकांत देशमुख
समोरच्या टेबलावर भूमीचे लाल रंगाचे बूट होते. त्याकडे मी एकटक पाहत होते. मनात विचारांचं तुफान उठलं होतं. लाल रंग क्रांतीचा असतो ना? भूमीच्या लाल बुटांनी समाज-पुरुषाला प्रतिकात्मक लाथ तर नक्कीच मारली आहे. हा खेळामधला स्त्री-क्रांतीचा प्रारंभ आहे? आम्ही लैंगिक अत्याचार सहन करणार नाही! मी काय करू शकते? एक पत्रकार म्हणून? एक स्त्री म्हणून?...
‘सोनू बेवे, तडकेतडक थोरी पोस्ट पढी इन्स्टाग्राम पे... बहोतही कसुट्टा काम किया है तुने!’ (सोनू बहना, सकाळीच तुझी इन्स्टाग्रामवरची पोस्ट वाचली. बढिया काम.)
कालच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर आज भूमीदीदी घरी एकटीच आत्मपरीक्षणाच्या मूडमध्ये असणार... कारण आता धरणं आंदोलन संपलं होतं. यापुढे कायदेशीर लढाई लढायचं तिनं आणि हनुमानभैया - मीरादीदीनं ठरवलं होतं. भूमीनं तर कुस्ती सोडल्याचं जाहीर केलं होतं, पण हनुमान व मीराला अजून पुढील वर्षीची एशियन व २०२४ची ऑलिंपिक स्पर्धा खेळायची होती. त्यासाठी पात्रता फेरी खेळून भारतीय कुस्ती संघात जागा मिळवण्यासाठी कडी मेहनत करायची होती. सोनूला खात्री होती, ते दोघं गुरू हनुमान आखाड्यात सकाळीच प्रॅक्टिसला गेले असणार. आता भूमीदीदी मात्र मॅटपासून कायमची दूर राहणार. किती रिकामं वाटत असेल तिला आज?