डॉ. अविनाश भोंडवे, पुणे
‘‘हिस्टरी सजेस्टिव्ह ऑफ डिल्यूजन्स, हॅलुसिनेशन्स, डिसऑर्गनाईझ्ड थिंकिंग, डिसऑर्गनाईझ्ड स्पीच, अॅबनॉर्मल बिहेविअर, फ्यू इन्सिडन्सेस ऑफ व्हायोलन्स. प्रोव्हिजनल डायग्नोसिस - स्किझोफ्रेनिया विथ सबस्टन्स अब्यूज.’’ शेवटचे चार शब्द त्या डॉक्टरानं ठासून म्हटल्यासारखे वाटले.
तो दाराकडे जात असताना मी त्याचं बारकाईनं निरीक्षण केलं. मला माहिती होतं, की वेळ निघून चालली आहे, पण घड्याळाकडं बघण्याची इच्छा मी दाबली. एक दीर्घ श्वास घेतला आणि प्रत्येक श्वासागणिक उलट्या क्रमानं आकडे मोजू लागलो... ‘दहा, नऊ, आठ, सात...’
मला पक्कं ठाऊक होतं, त्याला हेरगिरी केंद्रातल्या लोकांनी पाठवलंय. तसे ते खूप दिवसांपासून माझ्या मागावर आहेत. मी त्यांच्या गनपॉइंटवर होतो. त्यांच्या एलिमिनेशनच्या यादीत... नंबर एकवर.
त्या माणसानं खाकी शर्ट आणि हिरवी पँट घातली होती. त्याचा डावा हात पॅंटच्या खिशात होता. त्याच्या त्या फुगलेल्या खिशात काय आहे, याची मला कल्पना होती.