डॉ. बाळ फोंडके
नव्याने केस हाताळायला सज्ज झालेल्या अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यासाठी कोर्टाकडून कबरीचं उत्खनन करून शव मिळवण्यासाठी अर्ज केला. तो मंजूर झाल्यानंतर हाडांचा सांगाडा झालेलं शरीर त्यांनी बाहेर काढलं. हाडांमधून त्यांनी त्या मुलाच्या जनुकीय वारशाचा, म्हणजेच त्याच्या डीएनएचा नमुना मिळवला.
सकाळच्या थंडीत २५ फेब्रुवारी १९५७ला अंगावर गरम कपड्यांचं खोगीर चढवून एक विद्यार्थी फिलाडेल्फिया शहराच्या जवळ असलेल्या एका जंगलात ससे शोधायला गेला होता. त्याच्या समोरून एक ससा सुळकन जवळच्या झुडूपांमध्ये पळून जाताना त्याला दिसला. त्याच्या पाठोपाठ तो विद्यार्थीही तिथं पोहोचला.
तो ससा काही त्याच्या हाती लागला नाही. पण एक मोठा कार्डबोर्डचा पेटारा त्याला दिसला. कुतूहल चाळवल्यानं त्यानं तो उघडून पाहिला आणि धक्का बसून तो पाठीमागेच सरकला. कारण त्या पेटाऱ्यात एका लहान मुलाचं शव होतं! त्याला तिथं कोणी पाहण्यापूर्वी तो विद्यार्थी घाईघाईनं निघून गेला.
पोलिसांचा ससेमिरा आपल्याच पाठी लागेल या भीतीनं तो गप्प बसला. पण त्याचं मन त्याला खात राहिलं. तेव्हा त्यानं गावातल्या पाद्र्याला ती माहिती दिली. त्यानं आश्वासित करून त्याला लगोलग पोलिसांना ती खबर द्यायला उद्युक्त केलं.