डॉ. बाळ फोंडके
नवीन जनुकसुधारित वाणं रोगमुक्त आणि भरघोस पीक देणारी ठरली, तरी त्यांच्यापासून मिळणारा आटा गृहिणींच्या पसंतीला उतरेल का, तो स्वाद टिकवून असेल का, तितकाच रुचकर असेल का, सध्याइतक्याच सहजतेनं शिजवता येईल का, हा आटा वापरून केली जाणारी रोटी पोषणमूल्य राखून असेल का, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा ‘आटा’पिटा करण्यात आता कृषीशास्त्रज्ञ गर्क आहेत.
आदिमानवाच्या अवस्थेत मानवप्राण्यानं भटक्या जीवनशैलीचा अंगिकार केला होता. कारण जगण्यासाठी आवश्यक असलेला आहार एकाच ठिकाणी सातत्यानं मिळेल, याची शाश्वती नव्हती. जिथं तो आणि त्याचा गोतावळा असेल, तिथं सहज उपलब्ध असलेली कंदमुळं, फळं आणि शिकार करून आणलेल्या प्राण्यांचं मांस हाच त्याचा आहार होता.
यापैकी तिथं जे काही मिळेल त्याचा समावेश त्याला आपल्या आहारात करावा लागत होता, त्यात त्याला निवडीची फारशी संधी नव्हती. त्यामुळं एके ठिकाणची कंदमुळं संपली किंवा त्यांचा मोसम संपला, की तिथून स्थलांतर करत जिथं ती मिळू शकतील अशा नवीन जागी मुक्काम हलवण्याशिवाय पर्याय नव्हता.