डॉ. अविनाश भोंडवे
थंडीच्या दिवसांत झोपणे आणि जागे होण्याचे जैविकचक्र, भुकेचे आणि खाण्याचे वेळापत्रक तसेच इतर दैनंदिन कामांमधला समतोल बिघडू लागतो, असे संशोधकांच्या लक्षात आले आहे.
जगभरात झालेल्या अनेक संशोधनात असे दिसून आले आहे, की या काळात असंख्य लोकांमध्ये चिंता आणि नैराश्यासारखे मानसिक विकार आढळून येऊ लागतात. या सीझनल अॅफेक्टिव्ह डिसऑर्डरचे मूळ या असमतोलातच असते.
हिवाळा किंवा थंडीचा मोसम म्हटलं की मनात अनेक आठवणी दाटून येतात. दिवाळीतल्या पहाटेच्या अंघोळी, धुक्यात हरवलेले आसमंत, सकाळी शाळेत जाताना भरणारी हुडहुडी, स्वेटर, मफलर, आणि शाली, नव्या वर्षाचं स्वागत आणि बरंच काही.
पण हे सारे आता इतिहासजमा झाल्यासारखे वाटते. आजकाल पूर्वीसारखी थंडी पडते कुठे म्हणा. पडलीच तर उत्तरेकडील राज्यांतच.
थंडीमुळे त्वचा शुष्क होते, ओठ फुटतात, अनेकांना सर्दी होते, खोकलाही येऊ लागतो. पण या शारीरिक बदलांसोबतच हिवाळ्यामध्ये अनेक लोकांचे विचार, भावना आणि वागणे यातही काही दखल घेण्याजोगे बदल घडतात, असे मानसशास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील अद्ययावत संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे.
तसे पाहिले तर प्रत्येक ऋतूमधल्या बदलांबरोबर लोकांच्या वागण्यात काही बदल होतातच. म्हणजे उन्हाळ्यात चिडचिड वाढते, आळस वाढतो किंवा पावसाळ्यात चिंता वाढतात वगैरे.
अशी हंगामानुसार बदलणारी प्रवृत्ती सगळ्यांच्या सहजच लक्षात येते. पण हे बदल का निर्माण होतात? हे शोधण्याचा वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रशुद्ध प्रयत्न करणे मात्र एक महाकर्मकठीण काम असते.
हिवाळ्यामध्ये आढळून येणारे काही मानसिक बदल सांस्कृतिक नियमांशी, सणासुदीशी आणि पद्धतींशी जोडले गेले आहेत. पण त्याचवेळेस बदलणारे हवामान आणि पर्यावरणीय परिस्थितींना दिल्या जाणाऱ्या जन्मजात जैविक प्रतिसादांमुळेदेखील इतर अनेक बदल घडून येतात.
हे नैसर्गिक बदल आणि सांस्कृतिक बदल हिवाळा सुरू झाल्यावर अगदी हातात हात घालून येतात. त्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या या मानसिक बदलांची कारणे शोधणे आणि त्यावर उपचार करणे तसे अवघडच असते.
हिवाळ्यातील नैराश्य
हिवाळ्याच्या महिन्यांत तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर असं वाटणारे तुम्ही एकटेच आहात असं नाही.
अमेरिकेतील सायकियाट्रिक असोसिएशनच्या अंदाजानुसार दिवस जसाजसा लहान होत जातो तसतसा सुमारे पाच टक्के अमेरिकी लोकांना हंगामी भावनात्मक विकार किंवा याला सीझनल अॅफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी- सॅड) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैराश्याचा अनुभव येतो.
एसएडीचा अनुभव घेणाऱ्या लोकांना हताश वाटते, सामान्यतः ज्या कृतींमधून आनंद मिळतो अशा काही कृतींमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा कमी होते, अंगात आळशीपणा भरून राहतो.
जे लोक या विकारासाठी क्लिनिकल थ्रेशोल्ड पूर्ण करत नाहीत त्यांच्यातदेखील चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांमध्ये वाढ दिसू शकते; किंबहुना काही अंदाजानुसार चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकी लोकांना हिवाळ्यातील काही प्रमाणात ही लक्षणे जाणवतात.
एसएडी आणि हिवाळ्यात नैराश्यातील वाढीचा संबंध शास्त्रज्ञ सूर्यप्रकाशाच्या कमी होण्याशी जोडतात, सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिनची पातळी कमी होते.
दिवस सर्वात लहान आणि हिवाळा सर्वात लांब असतो अशा स्कॅन्डिनेव्हिया आणि अलास्कासारख्या जगातील उत्तरेकडील प्रदेशांमध्ये हे हंगामी भावनात्मक विकार अधिक कॉमन असल्याचे आढळून येते.
सूर्यप्रकाश माणसांच्या मनःस्वास्थ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो या कल्पनेशी ही बाब सुसंगत आहे.
ऋतूंशी जोडलेले असे बदल फक्त माणसांच्याच मानसिकतेत होतात असे नाही. उदाहरणार्थ, उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार माणसाशी लांबचे नाते सांगणाऱ्या ऱ्हीसस मॅकॉकमध्येही असे सीझनल मूड चेंज दिसतात, असे संशोधक सांगतात.
हिवाळा सुरू होताना दिवस लहान होत जातात. संध्याकाळी अंधार लवकर पडतो आणि सकाळी थोडे उशिरा उजाडते. परिणामतः दिवसरात्रीच्या २४ तासांच्या चक्रात शरीराला मिळणारा सूर्यप्रकाश कमी काळ मिळतो.
२१ सप्टेंबरपासून २२ डिसेंबरपर्यंत दिवस जसजसे लहान होत जातात तसतसे काही लोकांना अस्थिर वाटू लागते, आयुष्यात नैराश्य डोकावू लागते.
या काळात झोपणे आणि जागे होण्याचे जैविकचक्र, भुकेचे आणि खाण्याचे वेळापत्रक तसेच इतर दैनंदिन कामांमधला समतोल बिघडू लागतो, असे संशोधकांच्या लक्षात आले आहे.
जगभरात झालेल्या अनेक संशोधनात असे दिसून आले आहे, की या काळात असंख्य लोकांमध्ये चिंता आणि नैराश्यासारखे मानसिक विकार आढळून येऊ लागतात. या सीझनल अॅफेक्टिव्ह डिसऑर्डरचे मूळ या असमतोलातच असते.
हिवाळ्यातील नैराश्याचे कारण
झोपणे आणि जागे होणे, या शारीरिक क्रियांचे एक चक्र आपल्या शरीरातील जैविक घड्याळाद्वारे नियंत्रित केले जाते. आणि हे घड्याळ वातावरणातील प्रकाश आणि अंधाराच्या तीव्रतेच्या पातळीनुसार नियंत्रित होते. त्याला सर्केडियन ऱ्हिदम म्हणतात.
हे घड्याळ दर २४ तासांनी पुनर्रचित (रिसेट) होत असते. या घड्याळायोगे आपली चयापचय क्रिया, शारीरिक वाढ आणि हार्मोन निर्माण होणे व ते शरीरात वितरित होणे वगैरे महत्त्वाच्या शरीरक्रिया नियंत्रित होत असतात.
जेव्हा दिवसाचा प्रकाश कमी होऊ लागतो, तेव्हा संवेदना ग्रहण करणाऱ्या शरीरातील मज्जातंतूंकडून मानवी मेंदूला काही संकेत मिळतात.
त्यामुळे मेलाटोनिन नावाचा हार्मोन स्रवतो आणि आपल्याला झोप येऊ लागते. आधीच्या ऋतूतील सवयीनुसार झोप यायला काही तास बाकी असले तरीही हा हार्मोन स्रवतो आणि झोपेची गुंगी येऊ लागते. याचा परिणाम शरीरातील ऊर्जेवर, आपल्या भुकेवर आणि खाण्यावर होतो.
या हार्मोनमुळे न्यूरोप्लास्टिसिटी ही शरीरप्रक्रिया उद्भवते आणि वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्याची मेंदूची क्षमतादेखील बदलू शकते.
त्याचा परिणाम मज्जातंतूंच्या जाळ्याची वाढ आणि त्यांच्या कार्यावर म्हणजे मज्जापेशींची दुरुस्ती आणि देखभालीवर होतो. यातूनच हिवाळ्यातील नैराश्य उद्भवते.
हिवाळ्यात बिघडलेला हा सर्केडियन ऱ्हिदम पुन्हा जागेवर आणणे शक्य असते. मात्र त्यासाठी जागे झाल्यावर शक्य तितक्या लवकर दिवसाच्या प्रकाशात येणे आवश्यक असते.
त्याचबरोबर, दिनचर्या बदलून अधिक झोपेच्या, व्यायामाच्या आणि खाण्याच्या वेळा बदलाव्या लागतात. आणि हळूहळू दिवसाचे नवे वेळापत्रक आचरावे लागते.
काही शास्त्रज्ञांनी या सीझनल बदलांचा संबंध प्राण्यांच्या दिनचर्येतील बदलांशी लावला आहे. हिमालयातील आणि बर्फाच्छादित प्रदेशातील हे प्राणी, थंडी वाढली, बर्फ पडू लागले की त्यांच्या गुहांमध्ये लुप्त होतात. याला हायबरनेशन म्हणतात.
या काळात अस्वलासारखे प्राणी आणि इतर अनेक प्रजाती त्यांचे चयापचय बंद करतात सीझनल अॅफेक्टिव्ह डिसऑर्डरचे मूळ अशा प्रकारे पर्यावरणाशी जुळवून घेण्याशी असू शकते.
अशा वेळी प्राण्यांना त्यांचा नित्याचा आहार मिळणे दुरापास्त असते आणि नेमकी थंड तापमानात शरीराला ऊर्जेची गरज असते.
वजनवाढ
अनेक सर्वेक्षणांत हिवाळा हा वर्षातील वजनवाढीचा काळ म्हणून ओळखला जातो. जवळजवळ ५० टक्क्यांहून जास्त व्यक्ती आपल्या वजनात अतिरिक्त किलोंची भर घालतात.
दिवाळीपासून सुरू होणाऱ्या हिवाळ्यात बहुसंख्य लोकांचे सरासरी वजन ०.५ ते १.३ किलोग्रॅमने वाढते, असे या विषयावरील संशोधनांत स्पष्ट आढळून आले आहे. त्यातही मुळातच वजन जास्त असणाऱ्या लठ्ठ व्यक्तींचे वजन थोडे जास्तच वाढते.
आदिमानवाच्या काळामध्ये हिवाळ्यात अन्न मिळणे दुर्मिळ होत असे. पण त्यामुळे, हिवाळा सुरू होईपर्यंत धान्य जास्त कसे मिळेल याचा विचार त्यानंतरच्या काळात मानवजातीने केला गेला असावा. त्याला जोडूनच सणासुदीचे आणि मिष्टान्न खाण्याचे रिवाज सुरू झाले असावेत.
हिवाळ्यातील थंड वातावरणात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांमध्ये निर्माण झालेली ही प्रतिक्रिया होती. त्यांना त्याचा फायदा नक्कीच झाला असेल.
पण उत्क्रांती प्रक्रियांमुळे त्यांच्या वंशजांच्या म्हणजे आपल्या जनुकांमध्ये या प्रतिक्रियेचा समावेश झाला. आणि थंडीत गोडधोड आणि तेलातुपाचे अधिक ऊर्जा देणारे अन्न खाणे आणि पर्यायाने वजन वाढणे ही शृंखला अस्तित्वात आली असावी.
शैक्षणिक एकाग्रता आणि कामांचा उरक
वर्षाच्या या काळात, विद्यार्थांना शाळेत किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामावर लक्ष एकाग्र करणे सहज शक्य होते, असेही काही संशोधनात असेही आढळून आले आहे.
आपल्या मेंदूमधून सिरोटोनीन आणि डोपामाईन हे दोन हार्मोन स्रवतात. यातील सेरोटोनिन हे रसायन मेंदूकडून शरीरातील सर्वमज्जापेशींमध्ये संदेश वाहून नेते.
मनःस्थिती, झोप, पचन, मळमळ, जखमा भरणे, हाडांचे आरोग्य, रक्त गोठणे आणि लैंगिक इच्छा यासारख्या शरीरातील कार्यांमध्ये सेरोटोनिन महत्त्वाची भूमिका बजावते. तर डोपामाइन हे एक न्यूरोट्रान्समीटर असते, ज्यायोगे आनंद, प्रेरणा आणि शिकणे या भूमिका बजावल्या जातात.
बेल्जियममधील न्यूरोसायंटिस्टनी सप्रमाण दाखवून दिले आहे, की ज्या कामात कमालीची एकाग्रता लागते, त्याबाबत हिवाळ्याच्या काळात कर्मचाऱ्यांची कामगिरी सर्वोत्तम होती.
संशोधकांच्या मते सिरोटोनिन आणि डोपामिनच्या पातळीत दिवसाच्या कमी प्रकाशामुळे हिवाळ्यामध्ये वाढ होते आणि त्यांच्या संज्ञानात्मक कार्याची क्षमता वाढते.
लैंगिक प्रवृत्ती
हिवाळ्यामध्ये कंडोम विक्री, लैंगिक संक्रमित रोगांची संख्या, वेश्याव्यवसाय यांचे आलेखही उंचावतात, असेही संशोधकांना अनेक सर्वेक्षणांत आढळून आले आहे. अमेरिकेत आणि उत्तर गोलार्धातील इतर देशांमध्ये, इतर काळापेक्षा हिवाळ्याच्या महिन्यांत गर्भधारणेचे प्रमाणसुद्धा वाढलेले आढळले आहे.
या सर्व गोष्टींचा कार्यकारणभाव पाहिला, तर कामवासना निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळी वाढणे, सुट्ट्या आणि थंडी यामुळे प्रेरित होणारी शारीरिक जवळीकतेची इच्छा आणि आजच्या जगात लैंगिक संबंधात गुंतण्याबाबत वाढलेल्या संधी यांचा समावेश होतो.
संशोधकांच्या मते, हिवाळा केवळ लैंगिक वर्तन वाढवत नाही तर लैंगिक इच्छा आणि आवडदेखील जोपासतो.
थोडक्यात, माणसं ऋतुमानानुसार बदलतात. इतर अनेक प्राण्यांप्रमाणे मानवावरही ऋतूबदलांचा परिणाम होत असतो. हिवाळ्यात, लोक जास्त खातात, जास्त वेळ झोपतात. या काळात त्यांचे औदार्यही वाढते आणि लैंगिक व्यवहारही. त्यांची एकाग्रता
वाढते आणि निराशाही वाढते. जगभरातील मानसशास्त्रज्ञ आणि इतर शास्त्रज्ञ या प्रकारच्या हंगामी प्रभावांवर संशोधन करत आहेत. पण शास्त्राला त्याबाबत जे ज्ञान आज आहे ते केवळ हिमनगाचे टोक असू शकते.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.