'पर्सनल फायनान्स' हा परवलीचा शब्द असण्याचा हा काळ. निवृत्तीपश्चात ठोस उत्पन्नाचा मार्ग अगदी आटला नसला तरी निरुंद होत असताना आपल्या निवृत्तीपूर्व जीवनशैलीला फारशी मुरड घालावी लागू नये असा विचार असणं आणि त्यासाठी डोळसपणे काही गुंतवणूक नोकरी- व्यवसाय भरात असतानाच करून ठेवणं हा गेल्या काही वर्षांमध्ये रुजत चाललेला पायंडा.
गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गांबरोबरच अलीकडच्या काळामध्ये गुंतवणुकीचे अनेकविध पर्यायही उपलब्ध झाले आहेत. ठरावीक उत्पन्न नित्यनेमाने देणाऱ्या बँकांमधल्या मुदत ठेवी किंवा विविध सरकारी योजना हा असंख्य मध्यमवर्गीयांचा गुंतवणुकीचा, अगदी टाइम टेस्टेड, महामार्ग. मात्र अर्थकारणाचे आयाम बदलत गेले तसे या महामार्गालाही कुंपण पडायला लागले.
असंख्यांसाठी वाढत्या महागाईची चिंता अधिक गहिरी होऊ लागली. काहीशा अतिरिक्त उत्पन्नाच्या रूपाने जागतिकीकरणाची फळे चाखणारा नवा मध्यमवर्ग मग गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांचा शोध घेऊ लागला, विचार करू लागला. एकेकाळी ‘सट्टा’ या शेलक्या शब्दाने उल्लेखला जाणारा शेअर बाजार अगदी सर्वसामान्य पगारदारांच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये डोकावू लागला, शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे काही पावलं पडू लागली.
अंथरूण पाहून पाय पसरावेत अशी शिकवण देणाऱ्या अनेक घरांनाही कर्जाचं वावडं राहिलं नाही, किंबहुना जमिनीसाठी, घरासाठी योग्य स्वरूपातलं कर्ज हासुद्धा मालमत्ता निर्मितीचा एक मार्ग ठरायला लागला. गेल्या दीड दशकातले हे बदल.