भूषण महाजन
एवढ्या मोठ्या तेजीचा प्रत्येकाने उपभोग घ्यायला हवा. गुंतवणूक खालच्या भावात झाली असेल, तर ती सांभाळता आली पाहिजे. मात्र जर खरेदी नुकतीच आणि वरच्या भावात झाली असेल, तर सावध राहणे अनिवार्य आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता. २० सप्टेंबर) आपलेच काय, जगातले सर्व शेअर बाजार ‘झिंग झिंग झिंगाट करत नाचत बागडत होते. तब्बल चार वर्षांनी फेडने शेअर बाजाराची इच्छा पूर्ण केली होती. फेडने काहीही खळखळ न करता चक्क अर्ध्या टक्क्याने व्याजदर कमी केले आणि तेजीवाल्या पंटर्सना अस्मान ठेंगणे झाले.
खरेतर व्याजदराची बातमी गुरुवारीच (अमेरिकेचा बुधवार) आली होती, पण तो दिवस बाजाराने संयमाने हाताळला. २५६००ला निफ्टीने धडक दिली खरी, पण लागलीच ‘सातच्या आत घरात यावे’ तशी माघारी वळून दोनशे अंश खाली येत तिने २४४१५ अंशाचा बंद दिला. कदाचित अमेरिकी पंटर्स झिंगाट करतात का, हे बघायला बाजार थांबला असावा.
शुक्रवारी सकाळी डाऊ फ्युचर्स भांगडा करताना दिसल्याबरोबर आपला बाजार काही थांबला नाही. डाऊ जोन्स ४२०००च्या शिखरावर, तर निफ्टी २५६०० अंशापुढे धावत जात, २५७९१वर जाऊन थांबली आणि सेन्सेक्स ८४००० ओलांडून ८४५४४वर बंद झाला. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप सारेच या वाऱ्यावरच्या वरातीत सामील झाले. शेवटी मार्केट हे सर्वोच्च आहे, आपण त्यापुढे खुजे आहोत हे स्वीकारून शेअर बाजारात आता नव्या संधी शोधायला सुरुवात करावी लागेल.