किशोर वयातील मुलांना समजून घेताना कोणत्या गोष्टी गरजेच्या?

अभिमन्यूसारखे आपण चक्रव्यूहात शिरलो आहोत, पण त्यातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी सुचवल्या गेलेल्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे माध्यमसाक्षरतेचा!
teenage life skill
teenage life skillesakal
Updated on

किशोरवय आणि जीवनकौशल्ये - डॉ. वैशाली देशमुख

विचारांमधली विविधता आणि त्यावर चिकित्सक विचार करण्याची हातोटी किशोरवयीन मुलांना त्यांच्या स्वओळख शोधण्याच्या प्रवासात मदतनीस ठरतील आणि त्यांना स्वयंपूर्ण व्हायला मदत करतील.

गप्पा मारणं, त्यांची विचारप्रक्रिया ऐकून घेणं, आपल्या निर्णयांमागची कारणमीमांसा समजणं आणि समजावणं वगैरे मार्गांनी मुलांना प्रशिक्षित करता येईल.

नुकतीच आपण चकवा देणारी एक, नव्हे, दोन बातम्या वाचल्या. पहिली, एका मॉडेलच्या मृत्यूची. एखाद्या व्यक्तीच्या अधिकृत अकाऊंटवर आलेली बातमी, आणि तीसुद्धा इतकी वाईट; मग ती खोटी कशी असेल? - असा सर्वसाधारण सुज्ञ व्यक्तींनी विचार केला, आणि तिला श्रद्धांजली वाहिली; ती लाखो लोकांनी वाचली.

त्यावर हिरिरीनं मतप्रदर्शनं केली गेली. पण मग तो मृत्यू झालेलाच नाही असं सांगणारी दुसरी बातमी दुसऱ्या दिवशी आली. तसं करण्यामागचा त्या मॉडेलचा हेतू उदात्त होता असं सांगण्यात आलं. आता आली का पंचाईत!

काय खरं आणि काय खोटं? या सगळ्या प्रकारातून बरीवाईट निष्पत्ती व्हायची ती झालीच, पण मुख्य म्हणजे माध्यमांकडे जागरूकपणे बघण्याची निकड पुन्हा अधोरेखित झाली.

‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’ या म्हणीची निर्मिती झाली तेव्हा जग इतकं गुंतगुंतीचं, धावपळीचं नसणार. आता ते तसं झालंय. शिवाय त्यात तंत्रज्ञानाची, इंटरनेटची भर पडलीये.

आई-बाबांची पिढी या तंत्रज्ञानाला आता बऱ्यापैकी सरावलेली असली, तरी त्याचं बाळकडू प्यायलेल्या मुलांइतकी ती पिढी यात निष्णात नाही.

तंत्रज्ञानाच्या शक्तिशाली अस्तित्वामुळे होणाऱ्या परिणामांविषयी मतमतांतरं आहेत, पण आज माध्यमांपासून कुणालाच सुटका नाही.

अभिमन्यूसारखे आपण चक्रव्यूहात शिरलो आहोत, पण त्यातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी सुचवल्या गेलेल्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे माध्यमसाक्षरतेचा!

जे वाचतो, पाहतो त्यातलं दर्जाहीन ते बाजूला काढून अस्सल कसं वेचायचं हे शिकण्या-शिकवण्याचा! त्यासाठी लागणारी जीवनकौशल्यं आहेत, वैविध्यपूर्ण विचार करता येणं आणि मग त्यातून विवेकी, सारासार विचार करून नेमका पर्याय शोधणं (Creative and Critical thinking). त्याविषयी आज थोडं बोलूया.

teenage life skill
Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मग या टिप्स फॉलो करा, मुलांना लागेल शाळेत जाण्याची गोडी

बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यास करून करून आपल्या सर्वांची खात्री झालेली असते, की एका प्रश्नाला एकच उत्तर असतं. प्रत्यक्षात मात्र डोळे आणि मन उघडं ठेवलं, तर प्रत्येक प्रश्नाकडे विविध प्रकारांनी बघता येतं आणि उत्तराचे अनेक पर्याय सापडतात.

ही कुंठित झालेली कल्पकता जागी करणं, त्याचा सहजतेनंवापर करण्याची सवय करणं हा या जीवनकौशल्यांचा हेतू आहे. या सापडलेल्या पर्यायांचा सापेक्षतेनं लेखाजोखा घेऊन एखाद्या जवाहिऱ्याच्या कुशलतेनं त्यांची पारख करता यायला हवी.

त्यासाठी तो मुद्दा आपल्याला पटतोय का, जमणार आहे का, त्याचे परिणाम काय होणार आहेत, ते झेपणार आहेत का, हे पाहायला हवं. माध्यमांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर समजा आपण एखादी जाहिरात बघत असू, तर मुळात ती जाहिरात का करायला लागते आहे हा प्रश्न विचारूया.

पोळी-भाजीची करतात का कुणी जाहिरात? अनावश्यक वस्तूकिंवा पदार्थ, जे लोकांच्या गळी जबरदस्ती उतरवावे लागतात, त्यांचीच टिमकी वाजवायला लागते.

पुढचा प्रश्न म्हणजे त्यात जे फायदे दाखवले आहेत, ते खरंच फायदे आहेत की अनावश्यक भूल आहे?

teenage life skill
Parenting Tips : तुमची मुलं लग्नासाठी नकार देतायत? मग या गोष्टी कारणीभूत असू शकतात

उदाहरणार्थ- एखादी पावडर खाल्ल्यामुळे शरीर पिळदार दिसतं अशी एखादी जाहिरात असेल. यात खरंतर खूप साऱ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या असतात.

शरीर पिळदार होण्यासाठी भरपूर व्यायाम, सुयोग्य आहार आणि एक विशिष्ट वय अशा अनेक गोष्टी मुदलात असतील, तर कदाचित या पावडरनं मदत होऊ शकेल. पण हे ना त्या जाहिराती सांगतात, ना मुलांच्या ते लक्षात येतं.

पुढचा प्रश्न- आपल्याला याची खरंच गरज आहे का? तुम्ही बॉडी-बिल्डर असाल किंवा चित्रपटात तशी व्यक्तिरेखा निभावत असाल, तर गोष्ट वेगळी; त्यांच्यासाठी तसं दिसणं ही आवश्यकता असते.

बरं, एवढं करून ती पावडर घेणं सुरक्षित असेल याची खात्री काय? त्याचे जे काही दुष्परिणाम होतील, ते सोसायची आपली ताकद आहे का?

त्यासाठी लागणारा खर्च कुठून करणार? त्यात घालवलेला वेळ आणि पैसा यांची भरपाई कशी होणार? हा सगळा सारासार विचार करून एखादा मुलगा समजा या निर्णयाप्रत आला, की ती पावडर घ्यायला नको.

पण शरीर दणकट करण्याची त्याची इच्छा काही वाईट नाही. त्यासाठी हाच एक मार्ग नाही. तो मुलगा आहारतज्ज्ञांच्या मदतीनं प्रथिनयुक्त आहार घेऊ शकतो, एखादा मैदानी खेळ खेळू शकतो किंवा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करू शकतो.

शरीर कमावणं ही हळूहळू होणारी गोष्ट आहे, इन्स्टंट नव्हे हे त्यानं ध्यानात घेतलं, तर हे कष्ट तो मनापासून आणि आनंदानं करेल.

बाप रे! तुम्ही म्हणाल, किती ही चिकित्सा! किती तो कीस पाडायचा एखाद्या गोष्टीचा! पण हे आपण इतक्या विस्तारानं लिहितोय म्हणून खूप वाटतंय.

जेव्हा तुमचा मुलगा (किंवा मुलगी) अशी एखादी मागणी करतो, तेव्हा विद्युतवेगानं मनातल्या मनात तुम्ही या सगळ्या पायऱ्या कमीअधिक पार केलेल्या असतात. म्हणूनच तुमचं पटकन उत्तर असतं, ‘काही नको, त्यापेक्षा खेळ भरपूर मैदानावर.

’ या उत्तरापर्यंत आपण का आणि कसे पोहोचलो याची सजग जाणीव ठेवली आणि ती मुलांपर्यंत पोहोचवली, तर ही वैचारिक कुशलता मुलांना हळूहळू जमायला लागेल

teenage life skill
Parenting Tips: मुलांना लागलेली मोबाईल पाहण्याची सवय मोडायचीये? मग या टिप्स नक्की ट्राय करा

सुरुवातीच्या बातमीचं उदाहरण घ्या. त्यातून काय धडे मिळाले? माध्यमांमध्ये जे काही दिसतं ते तसंच्या तसंघेऊन चालणार नाही. त्यावर उत्स्फूर्तप्रतिक्रिया देऊन चालणार नाही. ते दाखवण्यामागे काही छुपे हेतू असू शकतात.

आपल्या ज्या गोष्टी आपण माध्यमांवर टाकू किंवा आत्ताच्या भाषेत पोस्ट करू, त्याबाबतीतही असाच गैरसमज किंवा गैरवापर होऊ शकेल हे ध्यानात ठेवून, पूर्ण विचारांती ते टाकलं पाहिजे. मुलांना वाटतं, की आपले मेसेज सर्वात खासगी असतात.

प्रत्यक्षात ते अगदीच सार्वजनिक असतात; ते कोण वाचेल, ऐकेल, पाहील यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं, मग आपल्याकडून आपण ते नंतर डिलीट केलं तरी!

आजच्या मुलांचे रोमान्स, मैत्री, गप्पा, प्लॅन, चर्चा असं सगळं प्रत्यक्षापेक्षा सोशल मीडियावरच जास्त चालतं, त्यामुळे त्यांना याची जाणीव असणं आवश्यक आहे.

माध्यम हा सध्याचा ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण आत्तापर्यंत माध्यमांविषयी बोललो, पण माध्यम साक्षरतेप्रमाणेच सर्वसाधारणपणे समोर कुठलीही समस्या उभी ठाकली किंवा निर्णय घेण्याची वेळ आली, की हे असे सुज्ञ विचार करायला लागतात.

किशोरवयीन मुलांवर पावलोपावली अशी वेळ येत असते. करिअर निवडणं, शाळा बदलणं, नवी नाती जोडणं, दोस्तांच्या दबावाला तोंड देणं, लैंगिक संबंधांना होकार/नकार देणं, मादक पदार्थांचं सेवन, घरातून निघून जाणं असे महत्त्वाचे गंभीर प्रसंग असतात.

किंवा काही किरकोळ वाटणारे पण कानाशी गुणगुणणाऱ्या डासासारखे उपद्रवी, पदोपदी सोडवायला लागणारे प्रसंग असतात-

teenage life skill
Parenting Tips : वर्षाच्या आतील बाळाला साखर-मीठ का देऊ नये?

उदाहरणार्थ. उठण्याची वेळ, आज कुठले कपडे घालायचे, केस कापू का, आधी अभ्यास की आधी खेळ, मेसेजला उत्तर देऊ की नको, तिनं माझ्याकडे पाहिलं का नाही इत्यादी.

गंभीर निर्णयांचे पडसाद लांबवर पोहोचतात, जडणघडणीच्या या काळात मुलांना खोलवर दुखावतात, त्यांच्या आयुष्यावर कायमचे व्रण सोडतात.

समजा, मैत्रीण जर शारीरिक जवळीकीची मागणी करत असेल, तर मुलं का स्वीकारतात? कारण नकाराची परिणती नातं तुटण्यात होईल, किंवा आपले मित्र आपल्याला हसतील अशी त्यांना भीती वाटते.

पण वर उल्लेखल्याप्रमाणे त्यांनी यावर साऱ्या बाजूंनी विचार केला, तर त्याचे इतर पैलू त्यांच्या लक्षात येतील, आणि त्यांना योग्य निर्णयाप्रत पोहोचायला मदत करतील.

आपलं नातं किती भुसभुशीत पायावर उभं आहे, याचीही त्यांना थोडीफार जाणीव होईल. या मोठ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण थोरांना किरकोळ वाटणाऱ्या त्या बाकीच्या गोष्टीसुद्धा मुलांना खूप त्रास देतात, त्यांच्या मर्यादित जगात त्या मोठी जागा अडवतात.

teenage life skill
Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

हळूहळू अनेक छोट्या गोष्टी मिळून त्यांचा मोठा बागुलबुवा तयार होतो आणि मग तो गुंता सोडवणं अवघड होऊन जातं.

उदाहरणार्थ, एखाद्या मुलीला वाटतंय की आपली उंची खूप कमी आहे (प्रत्यक्षात तिची उंची सरासरी आहे, ५ फूट), त्यामुळे कुणाला आपण आवडत नाही. तिच्या मैत्रिणीला योगायोगानं बॉयफ्रेंड आहे, त्यामुळे तिचं हे मत आणखी अधोरेखित झालंय.

इतरांमध्येमिसळणं ती आजकाल टाळते. मग काय, घरात बसायचं आणि सारखा मोबाईल बघायचा. त्यामधली रील आणि एयरब्रश केलेले फोटो बघून तिला आपल्या दिसण्याविषयी आणखी कॉम्प्लेक्स यायला लागला आहे.

आता वजनही वाढायला लागलं आहे, कारण बसल्या-बसल्या ती काहीतरी चरत असते. सगळ्याचा एकूण परिणाम असा झालाय की ती एकांडी झाली आहे, निराश व्हायला लागली आहे, ती स्थूल झाली आहे, तिची पाळी अनियमित झाली आहे, आणि तिचं अभ्यासातलं लक्ष उडालं आहे.

आई-बाबांना काळजी केव्हा वाटायला लागली? जेव्हा परीक्षेचा रिझल्ट आला तेव्हा! पण त्याला कारणीभूत असणाऱ्या या चार गोष्टी तिला हाताळता आल्या असत्या, तर गाडं इथपर्यंत पोहोचलच नसतं.

गरज आहे ती या मुलीला सारासार विचार करायला शिकण्याची. भारतातल्या अनेक मुलींइतकी उंची असताना तिला आपल्या उंचीविषयी न्यूनगंड का आला? ती बदलणं आता तिच्या हातात आहे का?

त्यामुळे कुठली कौशल्यं शिकण्यावर बंधनं येणार आहेत का? इतरांपासून फटकून राहण्याचा जो मार्ग तिनं स्वीकारला आहे, तो यावरचा उपाय आहे का? आणखी कोणते पर्याय तिच्याकडे आहेत? तिची इतर बलस्थानं शोधायचा तिनंप्रयत्न केला आहे का? असा सगळा धांडोळा घेतला तर मार्ग सापडेल.

teenage life skill
Cyber Parenting : सायबर-पालकत्व म्हणजे काय?

मुलांना हे शिकवण्यासाठी बसून मोठं लेक्चर घ्यायला नको, की कुठली महागडी साधनं विकत आणायला नकोत. रोज जाता-येता घडणाऱ्या गोष्टी, टिव्ही, वर्तमानपत्रं, बातम्या, पिक्चर, समारंभ, कौटुंबिक मेळावे, सहली अशा अनेक संधी मिळतात.

त्यावेळी मुलांशी अशा प्रकारच्या गप्पा मारणं, त्यांची विचारप्रक्रिया ऐकून घेणं, आपल्या निर्णयांमागची कारणमीमांसा समजणं आणि समजावणं वगैरे मार्गांनी मुलांना प्रशिक्षित करता येईल.

अशी विचारसरणी तयार करणं ही मंद गतीनं होणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी हे मार्ग चिकाटीनं हाताळत राहायला हवेत. शाळांमध्येही यावर गटानं काम करता येईल.

विचारांमधली ही विविधता आणि त्यावर चिकित्सक विचार करण्याची हातोटी किशोरवयीन मुलांना त्यांच्या स्वओळख शोधण्याच्या प्रवासात मदतनीस ठरतील आणि त्यांना स्वयंपूर्ण व्हायला मदत करतील

----------------

teenage life skill
Lifeskill Tips : तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? मग 'या' 5 वाईट सवयी आताच सोडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.