सुप्रिया खासनीस
दिवाळीच्या फराळात शेव हवीच. एरवीसुद्धा शेव पोहे, उपमा, इडली, सांबार अशा पदार्थांवर भुरभुरून खाल्ली जाते. त्याशिवाय फरसाण, शेवपुरी, रगडा पुरी, भेळ, मसाला पापड या पदार्थांमध्येही शेवेला महत्त्व आहेच. अशाच या निरनिराळ्या चवीढवीच्या शेवेच्या विविध व सोप्या पाककृती..
साहित्य
तीन वाट्या हरभरा डाळीचे पीठ, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, २ चमचे ओव्याची बारीक पूड, तेल.
कृती
प्रथम ओव्याची पूड चाळून घ्यावी. चाळलेल्या ओव्यामध्ये थोडे पाणी घालून कालवावे. डाळीच्या पिठात तिखट, मीठ, हळद, हिंग, ओव्याचे पाणी व दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून पीठ एकसारखे करावे. नंतर आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ साधारण कणकेसारखे भिजवावे. तेल चांगले तापल्यावर शेव पात्रातून शेव पाडावी व मंदाग्नीवर तळावी.
**
साहित्य
दोन वाट्या चिरलेला पालक, १ चमचा जिरे पूड, १० ते १२ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, साधारण ३ ते ४ वाट्या हरभरा डाळीचे पीठ, तेल.