प्रतिनिधी
वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती किंवा गुंतवणूक याची एकत्रित नोंद हा मालमत्ता हस्तांतर प्रक्रियेचा पहिला टप्पा. या नोंदणीपासून हस्तांतर प्रक्रिया आणि कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांचे समाधान या संपूर्ण प्रवासात व्यावसायिक मदत लाभली तर ती प्रक्रिया सुरळीत आणि विनाअडथळा होऊ शकते.
आपण कष्टाने कमावलेले, साठवलेले, गुंतवलेले पैसे आणि त्यातून निर्माण केलेली संपत्ती आपल्या पश्चात योग्य रितीने आणि योग्य व्यक्तींना हस्तांतरीत व्हावी व हे करत असताना नातेसंबंधांनाही धक्का लागू नये, नात्यांमध्ये जिव्हाळा कायम राहावा, अशीच सर्वांची इच्छा असते.
विशेषतः वयाच्या पन्नाशीनंतर असे विचार खूप जणांच्या मनात वारंवार यायला लागतात. मात्र अनेकजण त्यादृष्टीने ठोस पावले उचलत नाहीत आणि परिणामी सगळ्याच प्रक्रिया सुरळीत व कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडतातच असे नाही.
अनेकदा यामधून वादही निर्माण होतात, कुटुंबांत दुरावा निर्माण होतो. त्यामुळेच आजच्या अनिश्चिततेच्या काळात योग्य वेळेतच पावले उचलून आपण कमावलेली संपत्ती सुरक्षित करणे आणि पुढील प्रक्रियेसाठी योग्य दस्तावेज करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.