अचानक वजन कमी होणे म्हणजे, शरीराच्या वजनात लक्षणीय घट होणे. एखादी व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत नसतानाही ते होणे, आहार, व्यायाम किंवा जीवनशैलीतील बदल न करताही वजन कमी होणे, हे बऱ्याचदा एखाद्या आजाराचे किंवा गंभीर शारीरिक परिस्थितीचे लक्षण असते.
डॉ. अविनाश भोंडवे
पैसे आणि शारीरिक वजन यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण व्यस्त असते. म्हणजे पैसे मिळवणे कठीण, पण घालवणे अगदीच सोपे. वजनाचे याउलट असते. मिळवणे सोपे, पण घालवणे महाकर्म कठीण. वजन कमी करणे अवघड असते, म्हणूनच वजन कमी करण्याचे आश्वासन देणारी अनेक औषधे, गोळ्या, जिम, पर्यायी वैद्यकीय शाखांवर आधारित व्यवसाय, कन्सल्टन्ट आणि दवाखानेसुद्धा जगभर आढळून येतात.
दोन मित्र किंवा मैत्रिणी खूप दिवसांनी भेटले, तर एकमेकांच्या वजनावर टिप्पणी होतेच. बऱ्याचदा ‘तू चांगलाच गरगरीत झालायस’, ‘तब्येत एकदम सुधारलीये तुझी’ अशा प्रशंसा करणाऱ्या कॉमेंट्बरोबर, एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप कृश झाल्याचे दिसल्यास, ‘किती बारीक झालायस तू. काय करतोस वजन कमी करायला?’ असे प्रश्नही विचारले जातात. पण प्रयत्न न करताही वजन कमी होत असेल तर?
नियमित व्यायाम आणि आवश्यक उष्मांकांचा संतुलित आहार घेतल्यास वजन कमी तर होतेच, पण नियंत्रणातही राहते. मात्र, शरीराच्या वजनात लक्षणीय घट होऊन अचानक वजन कमी होत असेल, तर डॉक्टरांच्या भुवया उंचावतात. कारण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत नसतानाही, अचानक वजन कमी होणे हे कर्करोग, मधुमेह आणि इतर अनेक गंभीर व्याधींचे लक्षण असू शकते. साहजिकच वजन कमी होण्याची अनैसर्गिक कारणे सर्वांना माहिती असणे आवश्यक असते.
अचानक वजन कमी होणे म्हणजे काय?
अचानक वजन कमी होणे म्हणजे, शरीराच्या वजनात लक्षणीय घट होणे. एखादी व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत नसतानाही ते होणे, आहार, व्यायाम किंवा जीवनशैलीतील बदल न करताही वजन कमी होणे, हे बऱ्याचदा एखाद्या आजाराचे किंवा गंभीर शारीरिक परिस्थितीचे लक्षण असते.
साधारपणे ६ महिन्यांच्या कालावधीत ५ किलोग्रॅम किंवा त्याहून अधिक वजन घटणे
शरीराच्या वजनाच्या पाच टक्के वजन ६ महिन्यात किंवा त्यापेक्षा छोट्या अवधीत कमी होणे ‘अनैसर्गिक’ मानले जाते.
तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचे, वजन अशाप्रकारे कमी होत असेल आणि ते का कमी होते आहे याचे स्पष्टीकरण करता येत नसेल, तर वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे असते.
अचानक वजन कमी होण्याचा धोका कोणाला?
कोणाचेही वजन अचानक कमी होऊ शकते. पण, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हे सर्वात सामान्य (आणि सर्वात गंभीरही) असते. शरीराच्या वजनाच्या ५ टक्के किंवा ५ किलोंपेक्षा जास्त वजन सहा महिन्यात घटणे, हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंतेचे लक्षण मानले पाहिजे.
लक्षणे आणि कारणे
अचानक वजन कमी होणे हे एखाद्या सौम्य आजाराने होऊ शकते, किंवा अत्यंत गंभीर विकारानेदेखील होऊ शकते. असे वजन अचानक उतरण्याची कारणे शारीरिक असू शकतात, किंवा मानसिकही असतात. त्यामुळे या विविध कारणांची तोंड ओळख करून घेणे आवश्यक आहे.
हायपर थायरॉइडिझम ः शरीरातील थायरॉइड ग्रंथी शरीराचे तापमान, हृदयाच्या ठोक्यांची गती, तसेच चयापचय क्रिया नियंत्रित करण्यास हातभार लावते. हायपर थायरॉइडिझममध्ये थायरॉइड ग्रंथी, काही कारणांमुळे जरुरीपेक्षा जास्त क्रियाशील बनते. त्यामुळे शरीराचे तापमान, हृदयाचे स्पंदन आणि चयापचय क्रिया वेगवान होऊन नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा खर्च होते, ही अतिरिक्त ऊर्जा शरीरातील चरबीपासून मिळत असल्याने, शरीरातील चरबीचे साठे कमी होत जाऊन वजन उतरते.
कर्करोग ः सर्व प्रकारच्या कर्करोगात वजन निश्चित कमी होत जाते. याला कर्करोगाशी संबंधित वेट लॉस किंवा कॅचेक्सिया म्हणून ओळखले जाते. कर्करोगात अनेक कारणांमुळे आणि विविध घटकांच्या संयोगामुळे ही परिस्थिती उद्भवते.
चयापचय क्रियेत बदल: कर्करोगामुळे शरीरातील चयापचय क्रियेचा वेग बदलू शकतो. ट्यूमर त्यांच्यासाठी ऊर्जा आणि पोषक द्रव्ये वापरत असल्यामुळे शरीराच्या इतर भागासाठी उपलब्ध ऊर्जा आणि पोषण कमी होत जाते. याबाबतीत हे ट्यूमर किंवा कर्करोगाच्या गाठी एखाद्या परजीवी सजीवांसारखे (पॅरासाईट/ जंत) असतात, ते त्यांच्या क्रियांसाठी यजमानाचे म्हणजे मानवी शरीराचे पोषण वापरतात.
दाह (इन्फ्लेमेशन): अनेक कर्करोगांमध्ये दीर्घकाळ दाहजनक परिस्थिती राहते. ही जळजळ सायटोकाइन्स नावाची संयुगे शरीरात सोडते. त्यामुळे भूक कमी होते आणि स्नायू तसेच चरबीचे विघटन वाढते. एका दृष्टीने शरीराची संरक्षण यंत्रणा बिघडून जाते आणि परिणामतः पोषणमूल्ये इतरत्र वापरली जातात.
केमोथेरपी आणि रेडिएशन: केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये मळमळ, उलट्या, तोंडाची चव बदलणे अशासारखे दुष्परिणाम होतात. त्यामुळे रुग्णांना योग्यरित्या खाणे कठीण होते. हे खराब झालेले अन्न खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटण्यासारखे आहे.
ट्यूमरमुळे भूक न लागणे: ट्यूमरद्वारे मेंदूच्या भूक नियमनावर परिणाम करणारे पदार्थ शरीरात तयार होत असतात. ते मेंदूमधील भूक लागण्यासंबधी केंद्राला संकेत पाठवतात, त्यामुळे खाण्याची इच्छा दबते. एखाद्या व्यक्तीला भूक लागली असतानाही हे पदार्थ भूक नसल्याचे संकेत पाठवतात. परिणामी रुग्णाचा आहार कमी होत जाऊन वजन उतरते.
चव आणि वासातील बदल: काही कर्करोग चव आणि वासाच्या आकलनावर परिणाम करतात, त्यामुळे अन्न बेचव वाटते. एखाद्या रुग्णाला त्याला नेहमी आवडणारा खाद्यपदार्थ दिला, तर त्याची चव त्याला विचित्र वाटते आणि खाण्याची इच्छा निर्माण होत नाही.
लवकर तृप्ती: काही कर्करोगांत जेवण करताना पोट पूर्ण भरल्याची भावना येते. थोेडे काही खाल्ल्यानंतर खूप खाल्ले असे वाटू शकते त्यामुळे शरीराच्या गरजेपेक्षा खूप कमी कॅलरींचे सेवन होते.
ऊर्जा खर्च होणे : काही कर्करोगांत दीर्घकाळ ताप येत राहतो किंवा चयापचय क्रिया वेगवान होते आणि शरीराची ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते. दुसऱ्या भाषेत, अशा आजारात शरीराचे इंजिन खूप वेगाने धावते आणि नेहमीपेक्षा जास्त इंधन जाळते.
मानसिक ताण : कर्करोगाशी संबंधित भावनिक आणि मानसिक ताणामुळे खाण्याच्या सवयींवर परिणाम होतो. नैराश्य, चिंता आणि कॅन्सरची भीती यामुळे अन्नसेवन कमी होते.
पोषक तत्त्वांचे शोषण कमी होणे : काही कर्करोग पचनसंस्थेवर परिणाम करतात, त्यामुळे खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्त्वांचे शोषण होत नाही. एखादी गळकी बादली नळावर भरायला लावली, तर जशी पूर्ण भरत नाही, तशी परिस्थिती होते. खाल्लेल्या अन्नाचा पूर्ण फायदा मिळत नाही.
या शिवाय अनेक आजारांमध्ये वजन कमी होत जाते, यामध्ये -
क्रॉन्हस डिसीज ः (आतड्यांचा दाह होणारा एक आजार),
हृदयाच्या स्पंदनाची शक्ती खूप कमी झाल्याने उद्भवणारे हार्ट फेल्युअर,
अॅडिसन्स डिसीज ः मूत्रपिंडाच्या वर बसलेल्या अॅडरीनल ग्लँड्स (अधिवृक्क ग्रंथी) कॉर्टिसोल आणि अल्डोस्टेरॉन हार्मोन पुरेशा प्रमाणात तयार करत नाहीत, त्यामुळे होणाऱ्या आजारामध्ये हट्टाकट्टा माणूसही कृश होत जातो.
याशिवाय पार्किन्सन डिसीज, एड्स, पेप्टिक अल्सर किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिससारखे पोटाचे आजार, दंत समस्या, नैराश्य किंवा चिंता, औषधांचे दुष्परिणाम, सिलिअॅक डिसीज (ग्लूटेनची अॅलर्जी), मधुमेह, टेपवर्म, हुकवर्मसारखे परजीवी रोगजनकांचा संसर्ग, मादक आणि नशील्या पदार्थांचे व्यसन, निदान न झालेले खाण्याचे विकार, स्वादुपिंडाची सूज, अतिरिक्त मद्यपान, डिसफेजिया (अन्न गिळताना अन्ननलिकेत किंवा घशात अडकणे), स्मृतिभ्रंश अशा असंख्य आजारात वजन कमी होणे ही समस्या उभी राहत असते.
निदान
अचानक वजन कमी झाल्याबद्दल डॉक्टरांना कधी भेटावे?
सहा ते १२ महिन्यांच्या कालावधीत प्रयत्न न करता, शरीराचे वजन ५ टक्क्यांहून अधिक किंवा ५ किलोग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात कमी झाले असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखाद्या व्यक्तीला जर इतर लक्षणे असतील, तर हे विशेष महत्त्वाचे असते.
निदान करताना विचारले जाणारे प्रश्न ः वजन कमी झाल्याचे निदान करण्यासाठी, डॉक्टर शारीरिक तपासणी करतात आणि सर्वसाधारणपणे खालील प्रश्न विचारतात-
तुमचे वजन किती कमी झाले आहे?
वजन कमी होणे केव्हापासून सुरू झाले?
तुम्ही काही औषधे घेत आहात का?
तुमच्या खाण्याची पद्धत बदलली आहे का?
तुम्ही जास्त व्यायाम करत आहात का?
तुम्ही अलीकडे खूप दिवस आजारी होतात का?
तुम्हाला सतत थकवा जाणवतो का?
तुम्हाला दातांचा काही त्रास आहे का?
तुम्हाला गिळताना काही समस्या जाणवते का?
तुम्हाला सतत किंवा वरचेवर उलट्या होत राहतात का?
तुम्ही तणाव अनुभवत आहात का?
तुम्हाला झटके येणे, मूर्च्छित होणे असे त्रास होतात का?
तुमची तहान वाढली आहे का?
तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त लघवी होत आहे का?
तुम्हाला सतत जुलाब होतात का ?
तुम्हाला नेहमी खूप उदास-उदास वाटते का?
तुम्ही दररोज किती दारू घेता?
या प्रश्नांची उत्तरे ऐकल्यावर, तुमच्या नक्की कोणकोणत्या चाचण्या कराव्या हे डॉक्टरांना ठरवता येते. यामध्ये रक्ताच्या, लघवीच्या चाचण्या आणि एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी अशा इमेजिंग तपासण्या येतात.
व्यवस्थापन आणि उपचार
अचानक वजन कमी झालेल्या रुग्णाचा उपचार, वजन कमी होण्यास कारणीभूत असणाऱ्या आजाराचे निदान करूनच करावा लागतो. कोणतेही कारण जर स्पष्ट झाले नाही, तर त्या रुग्णाच्या तपासण्या काही दिवसांनी परत कराव्या लागतात. अशा रुग्णाला अधिक कॅलरी मिळण्यासाठी पोषक पदार्थ, अन्नाची चव वाढवणारे पदार्थ अधिक खाण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी विशेष आहारदेखील सुचवला जातो. काही प्रसंगात रुग्णाला आहारतज्ज्ञांकडे समुपदेशनासाठीदेखील पाठवले जाऊ शकते.
थोडक्यात, प्रयत्न न करता वजन कमी होत असेल तर ती नक्कीच धोक्याची निशाणी असते, आणि त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि आजाराच्या निदानाची गरज असते.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.