४-६ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन वाट्या मुगाची डाळ, २ वाट्या साखर, १ वाटी तूप, वेलची पूड, काजू व बेदाणे, केशर किंवा केशरी रंग, ३-४ वाट्या दूध.
कृती
शिरा करण्यापूर्वी मूग डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर पाण्यातून स्वच्छ धुऊन काढावी व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी. कढईत तूप गरम करण्यास ठेवावे. गरम झाल्यावर त्यात वाटलेली डाळ घालून ती बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यावी. कडेला सुटलेले जास्तीचे तूप काढून घ्यावे. नंतर त्यात गरम दूध घालून डाळ चांगली मऊ शिजू द्यावी. डाळीतला ओलसरपणा कमी झाला, की साखर घालून चांगली वाफ आणावी. वाफ आल्यावर वेलची पूड, काजू-बदाम काप घालावेत.
वाढप
१२ ते १५ साटोऱ्या
साहित्य
सारणासाठी
दीड वाटी खवा, १ वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी किसलेले खोबरे (बाजारातील डेसिकेटेड), २ चमचे वेलची पूड, २ वाट्या पिठीसाखर.
पारीसाठी
दीड वाटी बारीक रवा, पाऊण वाटी मैदा, पाव वाटी गरम तुपाचे मोहन, तांदळाची पिठी, तळण्यासाठी तूप किंवा रिफाइंड तेल.
कृती
रवा व मैदा एकत्र करावे. त्यात तूप आणि मीठ घालून पाण्याने घट्ट पीठ भिजवावे व अर्धा तास झाकून ठेवावे. बेसन लाडवासाठी भाजतो त्याप्रमाणे डाळीचे पीठ तुपावर खमंग भाजावे. खाली उतरवून कोमट होऊ द्यावे. खसखस व डेसिकेटेड खोबरे भाजून घेऊन ते डाळीच्या पिठात मिसळावे. खवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. भाजलेली खसखस, खोबरे, पिठीसाखर, वेलची पूड घालून सर्व एकत्र करून सारण तयार करावे. चांगले एकजीव करावे. त्याच्या पेढ्याएवढ्या गोळ्या कराव्या व झाकून ठेवाव्या.
भिजवलेल्या पिठाच्या, सारणाच्या गोळ्यांच्या दुप्पट संख्येत, सुपारीएवढ्या गोळ्या कराव्यात. पिठाच्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून एका पुरीवर सारणाची गोळी पसरून त्यावर दुसरी पुरी ठेवून पारी सर्व बाजूंनी पाण्याचा हात लावून चिकटवून घ्यावी. ही साटोरी तांदळाच्या पिठावर हलक्या हाताने लाटून थोडी वाढवावी. तव्यावर कोरडी शेकून मग तुपात तळावी. या साटोऱ्या ८ ते १० दिवस चांगल्या राहतात.
वाढप
४-६ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन लिटर दूध, पुरेशी साखर, केशर किंवा केशरी रंग, वेलची पूड, सुकामेवा तुकडे.
कृती
पसरट भांड्यात दूध आटण्यासाठी ठेवावे. दूध आटत असताना सारखे हलवत राहावे. चांगली बासुंदी होण्यासाठी दोन लिटर दूध सव्वा लिटर होईल इतके आटवावे. दूध आटल्यानंतर त्यात गरजेनुसार (साधारण पाऊण ते एक वाटी) साखर घालून एक उकळी आणावी. नंतर त्यात केशर, वेलची पूड, बदाम किंवा पिस्ते काप घालावे. थोडी चारोळी भाजून घालावी व बासुंदी थंड होऊ द्यावी.
वाढप
६-८ व्यक्तींसाठी
साहित्य
एक किलो मलाईचा चक्का, ३ हापूस आंब्यांचा रस किंवा २५० ग्रॅम तयार मॅंगो पल्प, १ किलो साखर, सुकामेवा (ऐच्छिक).
कृती
प्रथम चक्क्यात साखर मिसळावी व पातेले दोन तास झाकून ठेवावे. नंतर त्यात आमरस किंवा पल्प मिसळावा. श्रीखंड यंत्रातून चक्का, साखर व आमरस गाळून घ्यावा व एकसारखे करावे. आवडत असल्यास सुकामेव्याचे तुकडे घालावेत. आमरस घालावयाचा नसेल, तर श्रीखंड गाळून झाल्यावर आंब्याच्या साली काढून त्याच्या बारीक फोडी करून घातल्यास आम्रखंड चविष्ट लागते व स्वादही चांगला येतो.
वाढप
६-८ व्यक्तींसाठी
साहित्य
एक किलो मलईचा चक्का, एक किलो साखर, वेलची पूड, चारोळी, काजू, केशर किंवा केशरी रंग, थोडे दूध.
कृती
पुरण यंत्रातून एक डाव चक्का व एक डाव साखर असे एकत्र करून घेऊन चक्का गाळावा. त्याचप्रमाणे बाकी सर्व चक्का साखर घालून गाळून घ्यावा. थोड्या दुधामध्ये केशर भिजत घालावे. हे कालवलेले केशर चक्क्यात घालावे व एकसारखे करावे. नंतर चारोळी, वेलची पूड, काजू काप घालून सारखे करावे. श्रीखंड शक्यतो आदल्या दिवशी करावे म्हणजे मुरल्यावर ते चविष्ट लागते.
वाढप
४-६ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन लिटर दूध, बदाम-पिस्ते काप, गरजेनुसार साखर, अर्धा किलो सीताफळ गर (पल्प).
कृती
प्रथम एका पसरट भांड्यात दूध तापायला ठेवावे. दूध साधारण सव्वा लिटर होईपर्यंत आटवावे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवावे. तयार सीताफळ गर किंवा चांगली सीताफळे उपलब्ध असतील तर त्यातील बिया काढून निघालेला गर थंड झालेल्या दुधामध्ये गोडीनुसार साखरेसह घालावा. बदाम-पिस्ते काप घालावे. रबडी जेवढी थंड तेवढी चांगली लागते. गर मुरल्यामुळे सीताफळाचा स्वादही उत्तम येतो.
वाढप
४ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन लिटर दूध, पुरेशी साखर, केशर किंवा केशरी रंग, वेलची पूड, दीड ते दोन वाट्या बदामाचे काप.
कृती
शक्यतो पसरट भांड्यात किंवा कढईत दूध आटण्यासाठी ठेवावे. दूध आटवत असताना सारखे हलवत राहावे. चांगली रबडी होण्यासाठी दोन लिटर दूध एक लिटरपर्यंत आटवावे. नंतर त्यात गरजेनुसार साखर घालून एक उकळी आणावी व खाली उतरवून ठेवावे. बदाम कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजत ठेवावेत. नंतर त्यांची साले काढून पातळ काप करावेत व ते रबडीत घालावेत. वेलची पूड घालून एकसारखे करावे. रबडी थंडच चांगली लागते. त्यामुळे खायला देताना ती थंड द्यावी.
वाढप
४-६ व्यक्तींसाठी
साहित्य
अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, बदाम व पिस्ते, साधारण वाटीभर अननसाचे बारीक तुकडे, पुरेसा पाइनॲपल इसेन्स, खायचा पिवळा रंग (ऐच्छिक).
कृती
प्रथम चक्का चांगला फेटून घ्यावा. नंतर त्यात साखर घालून एकसारखे घोटावे. थोड्या वेळाने अननसाच्या फोडी घालाव्यात. थोडा पाइनॲपल इसेन्स, काजू व पिस्त्याचे तुकडे व पिवळा रंग घालावा. अननसाचा सुरेख स्वाद येतो. ज्यावेळी अननस उपलब्ध नसेल त्यावेळी पाइनॲपल इसेन्सचा पूर्ण वापर केला तरी चालतो.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.