आल्प्स पर्तरांगांमध्ये मार्चचा पहिला पंधरवडा ऋतुबदलाचा असतो. एकीकडे दिवस मोठा होत असतानाच दुसरीकडे मार्चअखेरच्या उन्हाळी प्रमाणवेळ बदलाची (डेलाइट सेव्हिंग टाइम) चाहूल असते. स्नो, आईस आणि भरपूर थंडी अशा वातावरणात चार महिने गेल्यावर आता तापमानातील वाढ हवीहवीशी वाटते.
आल्प्स पर्वतात एक हजार मीटरच्या वरच्या भागात अजूनही भरपूर स्नो असल्याने बरीच मंडळी वीकेंडला स्कीईंगसाठी जाताना दिसतात. आता दिवसभरातला सूर्यदर्शनाचा काळही थोडा लांबलेला असतो, त्यामुळे जमिनीतील गारवा कमी होऊन छोटी छोटी फुले व वेल वाढायला लागलेले असतात.
महिन्याभरात येणाऱ्या वसंत ऋतूचीच ही चाहूल असते. एकुणात काय, निसर्गात व परिसरात सर्वत्र बदल दिसतो आणि दिवस चांगला असेल तर एकूणच वातावरण, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्याचा आनंद काही औरच असतो.