मेधा दिलीप शास्त्री
स्वित्झर्लंडमधल्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी नैसर्गिक भूरचनेला तडा जाऊ दिलेला नाही. डोंगर, टेकड्या भेदून भुईसपाट करून किंवा तलाव बुजवून बांधकाम केलेलं नाही. काही उंच तर काही सखल अशा नैसर्गिक पातळ्यांवरच घरांची बांधणी केलेली दिसून येते.
ही सृष्टी निर्माण करताना परमेश्वराची सौंदर्यदृष्टी किती अलौकिक असावी, अंतराळातील भौगोलिक घडामोडींमुळे अस्तित्वात आली, तेव्हा आपली पृथ्वी किती कल्पनातीत सुंदर असावी याचा प्रत्यय देणारा देश म्हणजेच स्वित्झर्लंड.
निरभ्र आकाशाची अथांग निळाई, सर्वदूर मशागत केलेले हिरवळीचे गालीचे, वर निमुळती होत जाणारी, आकाशाशी हितगूज करणारी गर्द हिरवी उंचच उंच झाडं, शहरातील रस्त्यांचं, चौकांचं आणि घरासमोरील अंगणांचं सौंदर्य खुलवणारी लहान-मोठी फुलझाडं, लाल- पिवळ्या-जांभळ्या फुलांच्या ताटव्यांनी बहरलेली उद्यानं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नैसर्गिक दौलत अतिशय निगुतीनं अबाधित राखणारी इथली जनता...