माधव गोखलेवेदनेलाही एक देवदुर्लभ सौंदर्य प्राप्त करून देणारी वेदनेतून होणारी ही निर्मिती... म्हणूनच बहुतेक मोत्यांच्या सौंदर्याला एका गारुडाची श्रीमंती लाभली असावी. मोती बघितलाही नव्हता तेव्हापासून माझ्या मनावर मोत्यांच्या सौंदर्याचं गारुड आहे. .बाबांची एक मावशी बालवाडी चालवायची. (तेव्हा बालवाड्यांचे प्लेग्रूप झाले नव्हते. बालवाड्यांना बालवाड्याच म्हणायचे फार तर माँटेसरी...) त्यावेळच्या प्रथेप्रमाणे चौथ्या-पाचव्या वर्षी मलाही त्या बालवाडीमध्ये अडकवले गेले होते. बाबांची ही मावशी बहुधा द्रष्टी असावी, कारण अक्षरांची आणि माझी ओळख व्हायच्या आधीपासून ती माझी मावसआज्जी मला कळवळून सांगायची, अक्षर कसं मोत्यासारखं असावं रे...मोत्यासारखं म्हणजे अक्षर कसं असावं, ते समजण्याचं ते वयही नव्हतं आणि स्वतःच्या अक्षराबरोबर तुलना करण्यासाठी मोती ‘तो असतो कसा आननी’ असा प्रश्न होता तो वेगळाच. पण त्या मावसआज्जीच्या कळवळ्यातून मोती म्हणजे काहीतरी अप्रतिम सुंदर असणार (खुलासा – ‘अप्रतिम सुंदर’ हा शब्द खूप नंतर समजला. तेव्हाच्या परिप्रेक्ष्यात हा शब्दही नव्हता) एवढी खूणगाठ बांधली गेली. मोत्यासारखं अक्षर यावं म्हणून नंतर खूप प्रयत्न केले, पण मावसआज्जी, शिवाय माझी आई, मावसआज्जीची बहीण असणारी माझी आज्जी वगैरे मंडळींची ही इच्छा काही माझ्याकडून पुरी होऊ शकली नाही.पण मोती मात्र नंतर कुठे कुठे भेटत राहिला. शाळेत स्नेहसंमेलनाला वगैरे पाहुणे यायचे त्यांची ‘विचारमौक्तिके’ लक्षपूर्वक ग्रहण करा, ही शिक्षकवृंदाची विनंतीही स्नेहसंमेलनाच्या एकूण आनंदावर पाणी ओतणारी असल्याने (कोणीच) कधी फारशी मनावर घेतली गेली नाही, त्यामुळे मोत्यांशी सलगी करण्याची ती संधीही तशी हुकलीच. .पण मोती भेटत राहिले, मुख्यतः मनावर कसलीतरी जादू करणाऱ्या कवितांमधून; गोष्टींमधून... आपल्या भवतालातून आपण जे आपल्यासाठी म्हणून घेतो आहोत आणि जे आपल्या असण्याचा भाग होऊन राहिलं आहे/ राहतं आहे ते सगळंच मोत्यांइतकंच सुंदर होतं; शुभ्र होतं; ऊर्जा देणारं होतं आणि क्वचित दुर्मीळही होतं, हे आता समजतंय. सहाव्या –सातव्या वर्गात सोहन लाल द्विवेदींची एक कविता अभ्यासाला होती.कोशिश करने वालों की हार नहीं होती... त्या कवितेतल्या समुद्रात बुड्या मारणाऱ्या त्या गोताखोराच्या ‘मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में...’ पण ‘बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती...’ असं सांगणाऱ्या प्रयत्नांचं मोल तेव्हा नीटसं लक्षात आलं नव्हतं, पण जसं ते नंतर समजत गेलं तसं मनावर गारुड करणाऱ्या मोत्यांचंही मोल उमगत गेलं.कुठल्याकुठल्या वळणावर मोती भेटतच होते. रानातून पाऊस झेलीत हिंडताना कधी रानआळूच्या पानावरून घरंगळताना अगदी निमिषमात्र मोती होणाऱ्या पावसाच्या थेंबांतून; महानोरांच्या ‘येता पावसाळी झड न्हाली गुलालात माती, पंखपिवळ्या पानांत थेंब थेंब झाले मोती...’ या शब्दांचं सौंदर्य उलगडत, तर कधी बहिणाबाईंच्या अंगणातल्या प्राजक्ताच्या पावलाशी पडणाऱ्या मोती-पवळ्याच्या राशींत.प्राजक्ताच्या पावलाशी पडणारा फुलांचा सडा ज्यांनी अनुभवलाय त्यालाच या मोती-पवळ्याच्या राशीचा भारून टाकणारा मंदसा घमघमाट जाणवेल. आणि बहिणाबाईंच्या या मोती-पवळ्याच्या राशीसुद्धा कशा तर, ‘वैभवाला नाही अंत, सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत...’ असंच सांगणाऱ्या..मधेच कुठल्यातरी वळणावर, संदीप खरेंचे शब्द उसने घेऊन सांगायचे, तर ‘मन नाजुकशी मोतीमाळ, तुझ्या नाजुकशा गळ्यात’ किंवा, ‘कोई आँसू तेरे दामन पर गिरा कर, बूँद को मोती बनाना चाहता हूँ, अपने होंटों पर सजाना चाहता हूँ, आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ...’ अशा कतील शिफाईंच्या शब्दांच्या मिशानेही मोती मनात रुतून राहिला.मराठा साम्राज्याविषयी वाचताना पानिपताच्या तिसऱ्या लढाईच्या वर्णनात मोत्यांचा एक उल्लेख खूप वेगळ्या संदर्भाने येतो. मोती असे कुठेकुठे भेटत राहिले.मोत्यांचा एखादा साधासा अगदी एक किंवा दोन पदरी सरही सौंदर्य कसं खुलवतो, हे शब्दांत न गुंतताही मोतीच सांगत राहिले. आकांक्षांचे मोती स्वप्नांच्या धाग्यात गुंफताना नाजूक हातांनी त्या मोत्यांना वेज पाडण्याची हुनरही मग त्या मोत्यांनीच शिकवली.आज मात्र मोत्यांकडे पाहताना अस्सल मोत्याचं सारं सौंदर्य, त्याचं तेज, त्याची झळाळी मला एका वेदनेचं सौंदर्य वाटतं. आपल्या इंद्रधनुषी रंगांच्या छटा चमकवणाऱ्या भवतालात अनाहूतपणे शिरलेल्या आणि मग टोचत, खुपत राहणाऱ्या वाळूच्या अगदी डोळ्यांनाही न दिसणाऱ्या कणाभोवती आपल्याच अंगद्रव्याचे थर चढवत (विश्वकोशातल्या नोंदीत कॅल्शियम कार्बोनेटच्या या अंगद्रव्यासाठी ‘मुक्ताद्रव्य’ असा एक सुंदर शब्द योजला आहे) वेदना कमी करताना त्या शिंप्याच्या गाभ्यात मोती उमलतो. एक अनाहूत वेदना सोसताना...म्हणूनच बहुतेक अनेकविध मानवी संस्कृतींमधल्या परंपराकथांमध्ये मोती येतात ते ‘देवतांचे अश्रू’ म्हणून. वेदनेलाही एक देवदुर्लभ सौंदर्य प्राप्त करून देणारी ही वेदनेतून होणारी निर्मिती... म्हणूनच बहुतेक मोत्यांच्या सौंदर्याला एका गारुडाची श्रीमंती लाभली असावी.-----------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.