सतीश पाकणीकर, पुणे
‘द फॅमिली ऑफ मॅन’सारखे महत्त्वाकांक्षी प्रदर्शन जगाच्या इतिहासात आजपर्यंत कधीही झालेले नाही. या प्रदर्शनाने जगभरात काम करणाऱ्या प्रकाशचित्रकारांच्या शेकडो प्रतिमा एकत्र आणल्या होत्या. या प्रदर्शनात मानवी अनुभवाच्या सार्वत्रिक पैलूंचा जणू उत्सवच साजरा झाला.
आज एकविसाव्या शतकाची पंचविशी संपताना आपण जेव्हा गेल्या शतकातील घटनांचा मागोवा घेतो, तेव्हा ही शंभर वर्षे किती घटनांनी, नव्या शोधांनी, तंत्रज्ञानाच्या प्रगतीने व त्यामुळे जगाच्या उलाथापालथीने व्यापलेली आहेत हे पाहिले, तर मन आश्चर्याने थक्क होऊन जाते. जगात उलथापालथ तर झालीच, पण त्याबरोबरच जग कधी नव्हते इतके जवळही आले.