टेक्निशियनच्या चुकीने मुलाचे वडीलच बदलले; एका तपासणीतून झाला भलत्याच वारश्याचा उलगडा

आपण नाही, तर त्या मुलाचा पिता कोण? मुलाच्या वडिलांना पडला होता प्रश्न
Fathers DNA
Fathers DNAEsakal
Updated on

डॉ. बाळ फोंडके

डीएनए या आनुवंशिक रसायनाचा शोध लागल्यानंतर, आणि दोन किंवा अनेक डीएनएमधील साम्य शोधण्याचं तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर, कुळ शोधण्याच्या शोधाला बळ मिळालं आहे. तसंच तो अधिक अचूक करण्याची सोयही झाली आहे.

ॲलेक्स हेली या लेखकाचं रूट्स हे पुस्तक जगभर गाजलं होतं. ॲलेक्स हेली हा कृष्णवर्णीय किंवा आताच्या सांसदीय भाषेत सांगायचं तर आफ्रिकन अमेरिकन वंशाचा लेखक. त्याला आपलं कूळ शोधण्याची आत्यंतिक इच्छा झाली.

त्यासाठी त्यानं आफ्रिकेत जाऊन शोध घेतला. ही शोधाशोध बहुतांश उपलब्ध दस्तावेज आणि इतरांकडे असलेल्या मौखिक माहितीवर अवलंबूनच करावी लागली.

तरीही त्याला आपल्या मूळपुरुषाचा आणि अमेरिकेत स्थलांतर करून स्थाईक झालेल्या आदिपुरुषाचा पत्ता लागला. हे अभियान राबण्यासाठी त्यानं केलेल्या अथक प्रयत्नांची मनोवेधक कहाणीच त्यानं रूट्समध्ये सादर केली आहे.

अशारितीनं आपला कुलवृत्तांत तयार करण्याची ओढ अनेकांना लागत असते. आपल्याकडेही अनेक कुटुंबांनी असे दस्तावेज तयार केले आहेत.

त्यासाठीही त्यांना उपलब्ध बखरीसारखे दस्तावेज आणि नातेवाईकांजवळच्या माहितीवर अवलंबून राहावं लागत होतं. त्यातही मौखिक माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहण्याचा निःसंदिग्ध मार्ग उपलब्धच नव्हता.

पण डीएनए या आनुवंशिक रसायनाचा शोध लागल्यानंतर, आणि दोन किंवा अनेक डीएनएमधील साम्य शोधण्याचं तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर, या शोधाला बळ मिळालं आहे. तसंच तो अधिक अचूक करण्याची सोयही झाली आहे.

त्यातही पुरुषत्वाचं लक्षण असलेल्या वाय गुणसूत्राचा वारसा केवळ पित्याकडून मुलग्याला, त्याच्याकडून त्याच्या मुलग्याला मिळत असल्यामुळं त्याचा मागोवा घेत पैतृक कुळाची अचूक माहिती मिळवणं शक्य झालं आहे. अर्थात तो केवळ पुरुष संततीपुरताच मर्यादित असतो हा एक अडसर आहे.

तसंच शरीरातल्या सर्वच पेशींमध्ये असणारं मायटोकाँड्रिया हे ऊर्जा पुरवठा करणारं उपांग केवळ मातेकडूनच आपल्या संततीला मिळत असतं. मुलगा तसंच मुलगी, दोन्ही अपत्यांना त्या वारशाचा लाभ होतो.

माता त्याबाबतीत कोणताही दुजाभाव करत नाही. त्या उपांगातही त्याचा स्वतंत्र डीएनए असतो. त्याचा मागोवा घेत गेलं तर मातृक कुळाची उपपत्ती लावता येते.

वाय गुणसूत्र आणि मायटोकाँड्रिया या दोन्हीतील डीएनएचा पाठपुरावा करत संपूर्ण वंशवृक्षाची उभारणी करणं शक्य होतं. पण अशा काही प्रयत्नांत कधी कधी धक्कादायक सत्याला सामोरं जावं लागतं.

अमेरिकेतील डोना आणि व्हानेर जॉन्सन या दांपत्याला अशाच धर्मसंकटाचा सामना करावा लागला. त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म नैसर्गिक पद्धतीनंच झाला. तो मुलगा झाल्यानंतर व्हानेरवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली.

ती यशस्वी झाली खरी, पण तिचा परिणाम त्याच्या वृषणातील शुक्राणूनलिकेत अडथळा निर्माण होण्यात झाली. त्यामुळं वृषणात शुक्राणूंचं उत्पादन होऊनही त्यांची बाहेर पडण्याची वाट बंद झाली. साहजिकच नैसर्गिकरित्या दुसऱ्या अपत्याला जन्म देणं अशक्य होऊन बसलं.

पण तोवर शरीरबाह्य फलनाचं म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्रज्ञान विकसित झालं होतं. त्यात स्त्री बीज आणि पुरुष बीज म्हणजेच शुक्राणू यांचं मीलन शरीराबाहेर घडवून त्यातून भ्रूणाची उत्पत्ती केली जाते. एका काचेच्या बशीत ही प्रक्रिया पार पाडली जाते.

त्या भ्रूणाच्या पहिल्या काही दिवसांची वाढ शरीराबाहेरच झाल्यानंतर त्याची स्थापना मातेच्या गर्भाशयात केली जाते. तिथंच त्याचा पुढचा प्रवास सुरळीत पार पडून नैसर्गिकरित्या संतानप्राप्ती होते. मातेचं गर्भाशय काही कारणानं विकल झालं असेल तर सरोगेट मदरची म्हणजेच भाडोत्री मातेची व्यवस्था करता येते.

डोना जॉन्सनचं गर्भाशय निरोगी होतं, सक्षम होतं. तसेच व्हानेरचे शुक्राणूही आपली ताकद राखून होते. फक्त त्यांचं मीलन शरीरात होण्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यावर मात करून आपल्या दुसऱ्या अपत्याला जन्म देण्यासाठी त्यांनी याच टेस्ट ट्यूब बेबीचा मार्ग अनुसरला.

त्या बेबीची रुजवात डोना आणि व्हानेर यांच्याच बीजपेशीतून झालेली असल्यामुळं त्यांना त्या मात्यापित्यांच्या जनुकीय वारशाचा लाभ झाला होता. निदान त्यांची आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीही, तशी रास्त समजूत होती.

दोन्ही मुलांचं पालनपोषण निर्वेध पार पडत होतं. त्यातून मुलं आणि आई-वडील यांच्यामध्ये जे भावबंध तयार होतात तेही जोमदारपणे होत होते. ही झाली २००८ची गोष्ट. बघता बघता अकरा वर्षं गेली. २०१९ साल उजाडलं.

त्यावेळी जॉन्सनना एक विलक्षण ऑफर मिळाली. त्यांच्या कुटुंबाच्या जनुकीय आरोग्याची विनामूल्य तपासणी करणं त्यातून शक्य होणार होतं.

साहजिकच त्यांना त्या ऑफरचा मोह पडला आणि त्यांनी आपली तशीच आपल्या कुटुंबाची जनुकीय छाननी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सर्वांचंच सध्याचं, तसंच भविष्यातलंही आरोग्य ठणठणीत असल्याची ग्वाही मिळेल, ही त्यांची स्वाभाविक अपेक्षा होती.

Fathers DNA
Human Genome :माणसातील या जनुकामुळे भाषेचा वापर करणे शक्य झाले..

ती पूर्ण झाली की नाही याची माहिती नाही. पण त्यांना आपल्या मुलांच्या वारशाबद्दल अतिशय धक्का देणारी बातमी त्यातून मिळाली. त्यांचा पहिला मुलगा त्यांचंच संतान होतं. दुसऱ्या मुलाची माता डोनाच होती.

तिनंच जन्म दिला हा पुरावा असला, तरी तिचा आणि त्या दुसऱ्या मुलाचा डीएनए जुळल्यामुळं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र व्हानेर त्याचा पिता नसल्याचं त्या परीक्षेतून दिसून आलं. हे कसं शक्य होतं? शुक्राणू तर त्यानंच दिले होते.

त्यांचाच वापर केला जायला हवा होता. पण ती परीक्षा तर सांगत होती की कोणा दुसऱ्याच पुरुषाच्या शुक्राणूंचं मीलन डोनाच्या बीजाशी होऊन त्यातून त्या मुलाचा जन्म झाला होता. मोठाच तिढा निर्माण झाला होता.

आपण नाही, तर त्या मुलाचा पिता कोण? अहवालात पित्याच्या जागी अज्ञात असं म्हटलं होतं. व्हान्नेरनं आपल्या मुलाला बाजूला घेऊन हे कटू सत्य समजावून सांगितलं. त्याची प्रतिक्रिया व्हान्नेरला सुखावून गेली.

तो म्हणाला, ‘तो रिपोर्ट काही म्हणो, तुम्हीच माझे वडील आहात.’ तरीही व्हान्नेरला खरा पिता कोण आणि हा घोटाळा कसा झाला, हा प्रश्न छळत होताच. त्यात तो खरा पिता आपल्या मुलाला आपल्यापासून हिसकावून तर घेणार नाही ना, या भीतीनंही त्याला पछाडलं होतं.

पण त्याच्या वकीलांनी त्याला त्याबाबतीत आश्वस्त केल्यानंतर त्यानं त्या अज्ञात पित्याचा शोध सुरू केला. त्यासाठी त्यानं पूर्वजांचा वारसा शोधून काढणाऱ्या एका कंपनीची मदत घेतली. त्याच्या मुलाच्या जनुकीय वारशाचा नमुना त्यांना दिला.

त्यावरून त्यांनी त्याच्याशी मिळता जुळता डीएनए असलेल्या एका स्त्रीची ओळख पटवली. ती त्या मुलाची आत्या असणार याविषयी शंका राहिली नाही.

तिच्या मदतीनं मग त्यानं तिच्या भावाची भेट घेतली. त्याच्याबरोबरच्या बोलण्यातून सारा उलगडा झाला. त्याही गृहस्थानं त्याच इस्पितळात त्याच वेळेस टेस्ट ट्यूब बेबीसाठी प्रयत्न केला होता. त्याचं वीर्य त्या प्रयोगशाळेत होतं.

तिथल्या टेक्निशियननं तेच चुकून दोन्ही स्त्रियांच्या बीजाशी मीलन घडवून आणण्यासाठी वापरलं असल्याचं सिद्ध झालं. या चुकीतूनच व्हान्नेरच्या मुलाला भलताच वारसा मिळाला होता.

----------------

Fathers DNA
DNA मधील बिघाड सुधारता येणार! अमेरिकेत नवीन तंत्रज्ञानाला मान्यता (CRISPR Genes Editing)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.