सतीश पाकणीकर
काही अनुभव सोडले तर बावीस वर्षांचा आणि पंचवीस कॅलेंडर्सचा प्रवास सुरेल झाला असे नक्कीच म्हणता येईल. माझ्या प्रकाशचित्रकलेच्या आणि संगीताच्या छंदाच्या मधे उभे असलेले ‘थीम कॅलेंडर’ हे प्रकरण मला कधी स्वस्थ बसू देणार नाही. नवनवीन विषयांची साद सतत येतच राहणार. त्यासाठी माझा कॅमेरा, माझे मन आणि माझे हृदय कायम तत्पर राहणार याची मला खात्री आहे...!
सन १८३९च्या ऑगस्ट महिन्याच्या १९ तारखेला फ्रेंच चित्रकार लुई जॅक मांद दागेर याने पॅरिसमध्ये ज्या प्रकाशचित्रकलेचा श्रीगणेशा केला, त्याच परंपरेतील मी एक अत्यंत लहानशी कडी आहे. शास्त्र, तंत्र आणि कला या तिन्हीचे उत्तम मिश्रण असलेली ही विद्या माणसाचा आधुनिक जगातला तिसरा डोळा ठरली.
याच गोष्टीचे आकर्षण मनात धरून मीही या कलेच्या प्रांगणात पाऊल ठेवले आणि इंडस्ट्रियल फोटोग्राफर म्हणून व्यावसायिक सुरुवात केली. भारतीय अभिजात संगीताच्या आवडीमुळे मला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त श्रवणानंद घेण्याचा नाद शालेय जीवनातच जडला होता.
आता तर गळ्यात कॅमेऱ्याची भर पडली. त्यामुळे सवाईच्या प्रचंड श्रोतेवर्गातून मी थोडा बाहेर आलो आणि धिटाईने स्टेजजवळ जात कलावतांची प्रकाशचित्रेटिपू लागलो.
तेथे आपली कला सादर करणारे कलाकार, त्यांची देहभाषा, आविर्भाव, स्वरमुद्रा अगदी जवळून पाहताना, त्या गाण्याच्या अथवा वादनाच्या अलौकिकत्वासमोर नतमस्तक होताना त्यांचे ते भाव कधी माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाले याचेही भान राहत नसे. सन १९८३ ते १९८६ या दरम्यान माझ्या संग्रहात जवळजवळ पन्नास कलावंतांच्या शेकडो मुद्रा अंकित झाल्या होत्या.
मित्र, रसिक अथवा नातेवाईक यांना ती प्रकाशचित्रे दाखवताना त्यांना होणारा आनंद मी अनुभवू शकत होतो. अशातच माझा एक मित्र मला म्हणाला, “किती दिवस तू असे एक-दोन फोटो लोकांना दाखवत बसणार? त्यापेक्षा एक जंगी प्रदर्शनच का करीत नाहीस?” त्याने माझ्या मनात किडा सोडला खरा, पण त्यासाठी लागणारा वेळ, आर्थिक बळ या गोष्टी जुळवायला काही काळ जावा लागला.
१९८६च्या जून महिन्यात मी स्वरचित्रांच्या काठावरती.... या नावाने माझे पहिलेच प्रकाशचित्र प्रदर्शन आयोजित केले. त्या प्रदर्शनाला संगीतप्रेमी, मित्र-हितचिंतक, अनेक कलावंत तर आलेच, पण अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडेही प्रदर्शन पाहण्यास आवर्जून आले. सर्वप्रकाशचित्रे पाहून माझे खूप कौतुक केले आणि अभिप्राय लिहिला, “या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात. अभिनंदन!”
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच अशा व्यक्तीकडून असा अभिप्राय मिळणे ही नशिबाचीच गोष्ट! आपली प्रकाशचित्रे लोकांना आवडत आहेत व अनेकांना त्यांच्या रियाजाच्या खोलीमध्ये त्यांच्या आवडत्या कलाकाराचे किंवा गुरूचे प्रकाशचित्र लावण्याची इच्छा आहे हे मला समजत होते. पण एनलार्जरवर मोठे प्रिंट करणे, त्यांना लॅमिनेशन करणे या बाबी खर्चिक असल्याने अनेकांना ते हवे असूनही परवडत मात्र नसे. यावर उपाय काय? विचार करत असताना मला प्रथम कॅलेंडर या माध्यमाने साद घातली.
मी झपाटून कामाला लागलो. संजय पवार नावाच्या लेखक-चित्रकार मित्राने त्याच्या संरचनेची जबाबदारी घेतली. पण एका दिवाळी अंकाच्या कामानिमित्त त्याला मुंबईला जावे लागल्याने मला सर्व साहित्यानिशी कॅलेंडरच्या कामात उतरणे भाग पडले. अनोळखी प्रिंटिंग प्रेस, अनोळखी प्रोसेसर्स व सर्वच एजन्सी मला नवीन असल्याने त्यांच्याशी माझे ट्युनिंग काही जमले नाही. पण त्यामुळे अनमोल असे अनुभव मात्र पदरात पडले.
या तंत्रावर आपली पूर्ण हुकूमत येईपर्यंत या वाटेला आता जायचे नाही याची खूणगाठ मनाशी बांधली. १९८७ सालासाठी म्युझिकॅलेंडर प्रकाशित झाले; ते रसिकांना आवडले, पण मी थांबणार होतो. २००२ साली सवाई गंधर्व महोत्सव ५०व्या वर्षात पदार्पण करणार होता. मी एका प्रदर्शनाचा प्रस्ताव घेऊन पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे गेलो.
त्यांनी माझे म्हणणे शांत चित्ताने ऐकले. पण ज्या वास्तूत मी प्रदर्शन भरवू इच्छित होतो, तिथे चाललेल्या बांधकामामुळे काही अपघात होऊ शकतो याची शक्यता विचारात घेत पंडितजींनी नकार दिला. माझे मन जरा खट्टू झाले. पण त्यांनी एक द्रष्टा आयोजक कसा विचार करू शकतो याचे उदाहरणच दाखवले होते.
मी तेथून बाहेर पडलो. घराकडे येत असतानाच माझ्या मनात परत एकदा कॅलेंडर काढण्याची कल्पना घोळू लागली. आता माझ्या दिमतीला कॉम्प्युटर होता. माझ्या संग्रही असलेल्या निगेटिव्ह्जचे डिजिटायझेशन करायला उत्तम दर्जाचा स्कॅनर होता, छपाईचे तंत्र विकसित झाले होते आणि महत्त्वाचे म्हणजे माझा आत्मविश्वासही वाढला होता.
मनात कलावंताची यादी तयार होत होती. उ. बिस्मिल्ला खाँ, पं. रविशंकर, ख्याल गायिका गंगुबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, उ. विलायत खाँ, पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया, विदुषी मालिनी राजूरकर, उ. अमजद अली खाँ व उ. झाकीर हुसेन... कॅलेंडरवर फोटो वापरण्यासाठी या सर्वांची रीतसर परवानगी घेतली. सर्वांनी ती आनंदाने दिली.
या कलावंतांचे संगीतविषयक तत्त्वज्ञान किंवा विचार असे काही फोटोबरोबर द्यावे असे वाटत होते. मग मुंबईच्या एनसीपीएच्या लायब्ररीत धाव घेतली. तिथले भांडार पाहून दिपून गेलो. डेक्कन क्वीन पकडून तिथे जायचे, दिवसभर कलावंतांबद्दलचे साहित्य, मुलाखती शोधायच्या, नोट्स घ्यायच्या असा परिपाठ सुरू ठेवला.
तेव्हा त्या कामासाठी मी मुंबईच्या सात-आठ फेऱ्या तरी केल्या असतील. पण त्याचे सार्थक झाले. कलावंतांच्या सुरांइतकेच अर्थपूर्ण शब्दही हाती आले. उ. बिस्मिल्ला खाँ म्हणतात, “Music transcends religions, making us all equal before its melodies.” पं. शिवकुमार शर्मा म्हणतात, “There is no difference between music and spirituality.” तर अत्यंत साध्या-सरळ स्वभावाच्या गंगुबाई हनगल आपल्यालाच प्रश्न विचारतात व उत्तर देतात, “ You eat food, don’t you? Music is my food.”
कॅलेंडरची डमी तयार केली. धडधडत्या अंतःकरणाने पं. भीमसेनजींना दाखवायला घेऊन गेलो. भीमसेनजी खूश झाले. सवाई गंधर्व महोत्सवात प्रकाशन करण्यास त्यांनी होकार दिला. कॅलेंडरची छपाई झाली. पाच हजार कॅलेंडरचा डोंगर पाहून छातीच दडपून गेली.
महोत्सवात पहिल्याच दिवशी सवाई स्वरमंचावरून पं. भीमसेनजी व डॉ. गोखले यांच्या हस्ते कॅलेंडरचे प्रकाशन झाले आणि रसिक पुणेकरांनी तासभर रांग लावून कॅलेंडर विकत घेतली. महोत्सवातच सर्वप्रती संपल्या. मग पुन्हा छपाई करावी लागली. त्यामुळे आजही मागे वळून पाहताना मला असे वाटते, की मला प्रदर्शनाला नकार देऊन माझ्या थीम कॅलेंडरच्या प्रवासाला भीमसेनजींनी आशीर्वादच दिले.
कॅलेंडर ही तशी भेट म्हणून देण्याची वस्तू. पण उत्तम सजावट, उत्तम निर्मिती मूल्ये, उत्तम छपाई यांचा मेळ जुळवून आणला तर रसिक ते विकतही घेऊ शकतात याची खात्री पटली. माझा उत्साह वाढला. थीम कॅलेंडरच्या अनोख्या प्रवासास छान सुरुवात झाली.
तीन दिवसांपूर्वी, १३ डिसेंबर रोजी ६९व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पहिल्याच दिवशी ख्यातकीर्त गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या शुभहस्ते आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या उपस्थितीत कालजयी कुमारगंधर्व या माझ्या २५व्या कॅलेंडरचे प्रकाशन झाले आणि माझ्या डोळ्यांसमोरून गेल्या बावीस वर्षांचा प्रवास एखाद्या चलत्-चित्राप्रमाणे सरकून गेला.
नुसती नावेच द्यायची झाली तर – म्युझिकॅलेंडर, आनंदयात्री पु.ल., दिग्गज, गुरू-शिष्य परंपरा, गंधर्व पर्व, स्वराधिराज, बज्म-ए-गझल, स्वरमंगेश, आनंदाचे डोही, सिंगिंग स्ट्रींग्ज, स्वरनक्षत्र, स्वरनायक, तालतत्त्व, स्वरदर्शी, स्वररंगी आशा, स्वरमैत्र, स्वरसाधक, स्वरनायिका, स्वर-रसराज, स्वर चित्र व स्वर भीमसेन, कालजयी कुमारगंधर्व आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या खासगी वितारणाकरिता केलेली तेरे सूर और मेरे गीत, एक मै और एक तू व हमसफर!
पंचवीस वेगवेगळ्या विषयांच्या थीम, त्यात वापरलेली गेलेली जुनी- नवी उत्तम दोनशे नव्याण्णव प्रकाशचित्रे, कॅलेंडरच्या पानांवर चिरंतन झालेले सत्तावीस लेखक-कवी यांचे अक्षर साहित्य, कुमार गोखले यांच्यासारख्या कलावंताचे सुलेखन, कुंदन रुईकर या झपाटलेल्या कलासक्त डिझायनरचे देखणे डिझाईन, रिच प्रिंट व दिशा मीडिया सोल्युशन्स यांची दर्जेदार छपाई, ती छपाई उत्कृष्ट व्हावी यासाठी संजय साळुंखे या जिवलग मित्राने घेतलेले अविश्रांत श्रम आणि रसिकांसाठी हे कॅलेंडर सवलतीच्या दरात मिळावे यासाठी आतापर्यंतच्या सर्व कॅलेंडरसाठी जाहिरातीद्वारे मदत केलेले सर्वच माननीय जाहिरातदार.... कोणाकोणाची आठवण काढू?
भिंतीवर लावण्याचे एक साधे कॅलेंडर. पण त्याच्या निर्मितीसाठी किती वेगवेगळे लोक काम करीत असतात. कॅलेंडरच्या पानांमधून भेटणारी चित्रे अथवा प्रकाशचित्रेटिपणारे चित्रकार किंवा प्रकाशचित्रकर, त्याला डिझाईनच्या कोंदणात बसवणारे डिझायनर, ऑफसेट छपाईसाठी लागणाऱ्या प्लेट बनवणारे, प्रत्यक्ष प्रिंटिंगच्या मशिनवर काम करणारे तंत्रज्ञ, छापलेले कागद योग्य आकारात कापणारे निष्णात कामगार, कॅलेंडरच्या पानांची जुळणी करणारे कामगार, वायर-ओ-वायरचे बाईंडिंग करणारे कामगार, कॅलेंडरसाठी पाकिटे बनवणारे कामगार.
या सर्वांची एक साखळीच असते. या साखळीतील प्रत्येकाने आपापले काम व्यवस्थित केले, तरच मग उत्तम दर्जाचे एक कॅलेंडर आपल्या भेटीला येते आणि वर्षभर आपल्याशी संवाद साधते.
अनेक जणांकडून मला वेळोवेळी अशी विचारणा झाली आहे की या थीम तुम्ही कशा ठरवता? एकतर जवळपास सर्वच थीम या संगीतविषयक व कलाकारांची प्रकाशचित्रे वापरून केल्या गेल्या. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या चार दशकांत मी टिपलेली कलावंताची प्रकाशचित्रे. जवळपास पाचशे पंचवीस कलाकारांच्या सुमारे ऐंशी हजार भावमुद्रा माझ्या कॅमेऱ्यात बद्ध झाल्या आहेत.
त्यात कलावंतांइतकीच विविधता त्यांच्या नोंदल्या गेलेल्या मुद्रांमध्ये असल्याने त्यातून थीम सुचू शकतात. याचे एक उदाहरण देता येईल, ते म्हणजे २०१८ सालचे स्वरमैत्र हे कॅलेंडर. पं. शिवकुमार शर्मा व पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मैत्री ही शास्त्रीय संगीत व सिनेसंगीत यांच्या मर्यादा पार करून कितीतरी पुढे गेलेली. एकदा पुण्यातील एका कार्यक्रमात दोघेही मुख्य पाहुणे म्हणून निमंत्रित.
दोघेही वेगवेगळ्या ठिकाणांहून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते. तेथे भेटेपर्यंत त्यांचे काही बोलणेही झाले नव्हते. दोघेही सामोरे आले असता, त्यांच्या व उपस्थित श्रोत्यांच्या असे लक्षात आले, की दोघांनीही एकाच निळ्या रंगाचा सारख्याच सिल्क कापडाचा झब्बा घातला आहे.
ते पाहून दोघांच्याही चेहऱ्यावर जे भाव उमटले तो अप्रतिम क्षण मी टिपू शकलो. याला टेलीपथी म्हणता येईल का? ते प्रकाशचित्रस्वरमैत्र या कॅलेंडरची प्रेणा ठरले.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासाठी केलेल्या तीन कॅलेंडरच्या वेळच्या आठवणी तर एका वेगळ्याच मोठ्या लेखाचा विषय. पण त्यातील तेरे सूर और मेरे गीत व एक मै और एक तू, ज्यामध्ये दीदी व संगीतकार आणि दीदी व त्यांचे सहगायक समाविष्ट होते त्या दोन्ही कॅलेंडरची थीम स्वतः पं. हृदयनाथ मंगेशकर यांनीच सुचवलेली.
तर दीदी व त्यांनी ज्या नायिकांसाठी पार्श्वगायन केले त्या मधुबाला ते माधुरी या नायिकांच्या फोटोंचा अंतर्भाव असणारे हमसफर या कॅलेंडरची थीम मी सुचवलेली. ती तीन वर्षे तर माझ्या आयुष्यातील सर्वाधिक संगीतमय वर्षे. एक आठवण आहे.
एकदा सवाई गंधर्व महोत्सवातून कॅलेंडर विकत घेऊन गेलेल्या एक बाई मला पुढच्या वर्षीच्या महोत्सवात भेटल्या. माझी त्यांची ओळख नव्हती. पण त्यांनी माझ्या हातात आंबा बर्फीचे एक खोके ठेवले. आणि म्हणाल्या, “हे खास तुमच्यासाठी!” मी कारण विचारल्यावर त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली, त्या उत्साहाने बोलू लागल्या, “मी नागोठणे गावात राहते.
तुमचे स्वरनक्षत्र हे कॅलेंडर मी गेल्यावेळी घेऊन गेले. त्यातील सर्वप्रकाशचित्रांच्या फ्रेम करून घेऊन मी आमच्या शाळेच्या संगीत विभागात लावल्या. नुकतीच आमच्या शाळेची इन्स्पेक्शन झाली. परीक्षक जेव्हा संगीत विभागात आले त्यावेळी सर्वजण एकदम खूश झाले. आमच्या शाळेला चांगली ग्रेड मिळाली.
ही किमया तुमच्या कॅलेंडरने केली आहे. त्यामुळे तुमचे आभार!” एका प्रामाणिक शिक्षकाच्या या भावना पाहून माझेही डोळे पाणावले. माझ्या या प्रवासात कॅलेंडरमध्ये सहभागी कलावंतानी मला प्रमाणाबाहेर सहकार्य केले यात शंकाच नाही. पण काही निराश करणारे अनुभवही आले. सगळेच काही ‘गुडी-गुडी’ नव्हते. पण अशा अनुभवांची संख्या मात्र अतिशय नगण्य होती हेही तितकेच खरे.
कायम लक्षात राहील असा अनुभव दिला तोबझ्म-ए-गझल या कॅलेंडरनी. २००८ साली केलेले २००९साठीचे हे कॅलेंडर. बेगम अख्तर, मेहदी हसन, गुलाम अली, फ़रीदा ख़ानम, हरिहरन, पंकज उधास, तलत अझीज, अबीदा परवीन हे कलावंत गझलच्या या मैफलीत ‘शरीक’ झाले होते. मेहदी हसन, गुलाम अली, हरिहरन, पंकज उधास, तलत अज़ीज़ यांची प्रकाशचित्रे मी स्वतः काढली होती.
बेगम अख्तर यांचे फोटो डॉ. सुरेश नाडकर्णी यांनी आनंदाने दिले. कॅलेंडर प्रकाशित करताना मूळ फोटोग्राफरचे व संग्रहकाचे नाव देण्यासाठी मी आग्रही असतो. तसा ऋणनिर्देश करायला मी चुकत नाही. तलत महमूद यांचे पुण्यातील एक चाहते अनिल जोशी यांनी मला तलत साहेबांचा फोटो दिला.
मूळ प्रकाशचित्रकारचे नावही सांगितले, सूर्यकांत कुलकर्णी म्हणून. मूळ फोटोत काही तांत्रिक बदल करून मी कॅलेंडरसाठी तो ठाकठीक केला. कॅलेंडर घेऊन मी व अनिल जोशी दोघे सूर्यकांत कुलकर्णी यांना भेटण्यास गेलो.
वयोवृद्ध कुलकर्णी तो फोटो पाहून हर्षभरित झाले. माझ्याजवळचे आणखी काही फोटो देईन तुम्ही सवडीने या, म्हणाले. त्यांच्या हाती मानधनाचे पाकीट ठेवल्यावर मात्र त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाझरू लागले. पुन्हा सवडीने जाऊ म्हणेपर्यंत कुलकर्णी या जगात राहिले नव्हते.
या थीममध्येप्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांचा समावेश व्हावा म्हणून मी त्यांच्याशी संपर्क केला होता. फोटो वापराबद्दल अनुमती मागितली होती. बेगम अख्तर, मेहदी हसन, तलत महमूद, फ़रीदा ख़ानम अशा दिग्गजांची ही मालिका आहे हेही त्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. पण दुर्दैवाने त्यांनी नकार दिला.
कॅलेंडर प्रकाशित झाल्यावर जगजीत सिंह यांच्या एका निकटवर्तीयाने ते पाहिले. ते मला म्हणाले, “गझल गायकांचे कॅलेंडर आणि त्यात जगजीत सिंह नाही? मग या कॅलेंडरला काय अर्थ आहे?” मी शांतपणे त्यांना जगजीत सिंह यांचे नकाराचे पत्र दाखवले. पत्र पाहताच त्यांच्या तोंडून उद्गार आले, “He is very unfortunate!” मी काय समजायचे? ही माझ्या कामाला मिळालेली पावती आहे की संगीत रसिकाचे दुर्दैव? त्यातच माझे हे कॅलेंडर प्रसिद्ध होताना २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
या कॅलेंडरमध्ये चार पाकिस्तानी गायकांचे फोटो समाविष्ट होते. लोकभावना इतकी प्रक्षुब्ध होती की मुंबईच्या सर्व दुकानांत या गायकांच्या कॅसेटही टिकू दिल्या नाहीत लोकांनी, मग कॅलेंडरची काय बात? अतिशय देखण्या झालेल्या या कॅलेंडरच्या शिल्लक राहिलेल्या गठ्ठ्यांनी पुढे कित्येक दिवस माझ्या मनावर ओरखडे काढले.
“संगीत धर्मांच्या पलीकडे आहे, ते आपल्या सर्वांना सुरांपुढे समान बनवते,” हे उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे वाक्य मनात घोळत राहिले. असे काही विरळा अनुभव सोडले तर मात्र हा बावीस वर्षांचा आणि पंचवीस कॅलेंडरचा प्रवास सुरेल झाला असे नक्कीच म्हणता येईल. माझ्या प्रकाशचित्रकलेच्या आणि संगीताच्या छंदामध्ये उभे असलेले ‘थीम कॅलेंडर’ हे प्रकरण मला कधी स्वस्थ बसू देणार नाही.
नवनवीन विषयांची साद सतत येतच राहणार. त्यासाठी माझा कॅमेरा, माझे मन आणि माझे हृदय कायम तत्पर राहणार याची मला खात्री आहे. या येणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मात्र अंगात शक्ती राहावी ही त्या परमेश्वराजवळ प्रार्थना!
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.