वाढप : ४ व्यक्तींसाठी
साहित्य :
आठ-दहा लहानसर बटाटे.
चाटसाठी
पुदिना चटणी, चिंच-खजूर चटणी, जिरेपूड, मिरपूड, चाट मसाला, लाल तिखट, दही, मीठ आवडीप्रमाणे.
बटाटे स्वच्छ धुवावेत. गॅसवर लोखंडी कढईत पाऊण कढई भरेल एवढी वाळू घ्यावी व ती मध्यम आचेवर साधारण ५ ते ८ मिनिटे तापवावी. नंतर बटाटे कढईत मध्यावर ठेवावेत व त्यावर कालथ्याने वाळू टाकून झाकून ठेवावेत.
नंतर ५ मिनिटांनी बटाटे एका बाजूला घ्यावेत व पुन्हा ५ मिनिटे झाकून ठेवावेत. परत ही कृती करावी. चिमट्याने एक बटाटा बाहेर काढून पूर्ण भाजला गेला आहे का हे तपासावे, नसल्यास परत वाळूमध्ये ठेवावा.भाजलेले बटाटे बारीक जाळीच्या चाळणीत ठेवून, चाळून सर्व वाळू काढून टाकावी.
बटाटे अर्धे कापावेत व सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवावेत. त्यावर पुदिना व हिरव्या मिरच्यांची चटणी, चिंच-खजूर चटणी घालावी. दही आवडीप्रमाणे घालावे. मीठ, भाजलेली जिरे पूड, चाट मसाला, लाल तिखट व स्वादानुसार कणभर मिरपूड पेरावी. (चेरी टोमॅटोचे तुकडे व बारीक चिरलेला कच्चा कांदाही घालू शकता.)
टीप : या भाजक्या बटाट्यांची नेहमीसारखी भाजी किंवा रस्सा भाजीही किंवा मसाला स्टफ बटाटेही करू शकता.
वाढप : एका व्यक्तीसाठी
साहित्य
एक कप मका दाणे, अर्धा टीस्पून तूप, अर्धा टीस्पून चाट मसाला, १ टीस्पून पेरी पेरी मसाला व लिंबूरस, मीठ, गरम मसाला/ जिरावन मसाला/ किचन किंग मसाला, सजावटीसाठी - बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो (ऐच्छिक).
ज्याप्रमाणे बटाटे भाजून घेतले, त्याचप्रमाणे एकावेळी १ कप मका दाणे भाजून घ्यावेत. ४ वेगवेगळ्या सर्व्हिंग फ्लेटमध्ये ठेवावेत.
बाऊलमध्ये तूप, चाट मसाला लिंबू रस आणि मीठ घालून आवडीचा मसाला घालावा व मिश्रण तयार करावे. प्लेटमध्ये ठेवलेल्या दाण्यांवर हे मिश्रण घालावे, चांगले आसडावे. आयत्यावेळी कांदा, टोमॅटो घालून खायला द्यावे.
वाढप : एका व्यक्तीसाठी
साहित्य
वाळू जरुरीप्रमाणे, पाऊण कप गरम पाणी, १ टेबलस्पून चहा पावडर, अर्धा कप दूध, १ टेबलस्पून किंवा आवडीप्रमाणे साखर, प्रत्येकी पाव टीस्पून सुंठ पूड, वेलची पूड, लवंग-दालचिनी पूड.
कृती :
गॅसवर एका मोठ्या लोखंडी कढईत वाळू तापवावी. मधोमध स्टीलची लहान पातेली ठेवून त्यात पाणी ओतावे. त्यात चहा पावडर व इतर मसाले घालून चांगले उकळावे. आता दूध घालून पातेले गोलाकार फिरवावे. चांगली उकळी आल्यावर कुल्हडमध्ये गाळून गरमागरम चहा प्यावयास द्यावा.
वाढप : ४ व्यक्तींसाठी
साहित्य
एक लाल सिमला मिरची, १ कडक टोमॅटो, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १ चिंचेचे बुटुक, ३ टीस्पून भाजलेले जिरे, ४-५ लसूण कळ्या, मीठ व साखर स्वादानुसार.
सिमला मिरची व टोमॅटो स्वच्छ धुवावेत व कोरडे करावेत. बटाटे ज्याप्रमाणे वाळूत भाजले, त्याचप्रमाणे सिमला मिरची व टोमॅटो भाजून घ्यावेत. चाळणीत गाळून पूर्ण वाळू काढून टाकावी. नंतर तुकडे करून मिक्सर जारमध्ये घेऊन त्यात इतर जिन्नस लावावेत. मऊसर चटणी वाटावी. वेगळ्या स्वादाची खमंग चटणी तयार.
वाढप : एका व्यक्तीसाठी
साहित्य
वाळू जरुरीप्रमाणे, अर्धा कप पाणी, १ कप दूध, १ टीस्पून कॉफी पावडर, अर्धा टीस्पून वेलची जायफळ पूड.
एका मोठ्या कढईत अर्ध्यापर्यंत वाळू तापवावी. नंतर मधोमध लहान स्टील पातेली ठेवावी व त्यात पाणी ओतावे. नंतर कॉफी पावडर घालून उकळावे. उकळल्यावर आता दूध ओतावे. त्यात वेलची जायफळ पूड घालून पातेले चिमट्याने गोलाकार फिरवावे. मिश्रण चांगले उकळेपर्यंत ही कृती करावी. गरमागरम कॉफी कुल्हडमध्ये ओतून प्यावयास द्यावी.
वाढप : २ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन मध्यम आकाराची गोलसर रताळी, १ कप वाफवलेले मोड आलेले मूग, अर्धा टीस्पून मिरपूड, मिक्स्ड हर्ब (रोझमेरी, थाईम इ.) पावडर आवडीप्रमाणे, १ टेबलस्पून लिंबू रस, सैंधव मीठ, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, बारीक शेव (ऐच्छिक).
रताळी स्वच्छ धुवावीत व ४ तुकडे करावेत. ज्याप्रमाणे बटाटे वाळूत भाजले, त्याचप्रमाणे रताळी भाजून घ्यावीत. यानंतर १ इंच लांबीचे व अर्धा इंच उंचीचे गोलाकार तुकडे करावेत. दोन प्लेटमध्ये हे तुकडे मांडावेत. प्रत्येकावर प्रथम तूप लावावे. नंतर वाफवलेले मोड आलेले मूग घालावेत. इतर साहित्य क्रमाक्रमाने घालावे व लगेच खावयास द्यावे.
वाढप : ४ व्यक्तींसाठी
साहित्य
एक कप रवा, अर्धा कप भाजलेले ओट, पाव कप बटर, अर्धा कप दूध, साखर आवडीप्रमाणे, पाव टीस्पून दालचिनी पूड, २ टेबलस्पून स्ट्रॉबेरी जॅम, ड्रायफ्रुटचे तुकडे, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा.
एका वाडग्यात स्ट्रॉबेरी जॅम, दूध, बटर व साखर रवीने घुसळून मऊसर मिश्रण तयार करावे. ओट मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावेत. बाऊलमध्ये ही भरड, रवा, दालचिनी पूड, बेकिंग सोडा व पावडर एकत्र करावे.
यात दूध-जॅमचे मिश्रण ओतून रवीने घुसळून एकजीव करावे.गॅसवर लोखंडी कढईत साधारण अर्ध्यापर्यंत वाळू घालावी व मध्यम आचेवर तापवावी. त्यावर १ प्लेट ठेवावी. सिलिकॉन कपकेक मोल्डना आतून तूप लावावे व त्यात वरील मिश्रण ओतावे व मोल्ड प्लेटवर ठेवावेत.
कढईवर झाकण ठेवून २० ते २५ मिनिटे ठेवावे. मग शिजले का हे तपासून बघावे. कपकेक छान फुलले पाहिजेत. तयार कपकेक मोल्डमधून काढावेत व थंड झाल्यावर सर्व्ह करावेत.
(लेखिका - वैशाली खाडिलकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.