प्रा. मंजिरी घरत
प्रतिजैविक युगाचे जनक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी याच शोधासाठी त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक स्वीकारताना ‘जपून वापरा प्रतिजैविके’ असा इशारा दिला होता.
तो आपण गांभीर्याने घेतला नाही आणि आज प्रतिरोधाचा टाइम बॉम्ब समोर उभा आहे. आपल्याला प्रतिजैविकांचे भान आता तरी येईल का?
या वर्षीच्या एक जानेवारीला केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने एक आवाहन प्रसिद्ध केले. प्रिस्क्रिप्शनमध्ये जेव्हा अँटिबायोटिक (प्रतिजैविक) औषधे लिहाल तेव्हा ती का देत आहात याचे कारण म्हणजे थोडक्यात रोगनिदान लिहा, असे आवाहन सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्टरांना (ते खरेतर सर्वच डॉक्टरांसाठी असायला हरकत नाही) केले आहे.
तसेच फार्मासिस्टनीही रुग्णांना प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक देऊ नयेत, असेही केंद्रीय आरोग्य विभागाने त्या आवाहनात नमूद केले आहे.
अँटिबायोटिक औषधांचा विवेकी, तार्किक वापर व्हावा जेणेकरून अँटिबायोटिक प्रतिरोध कमी होण्यास मदत होईल या उद्देशाने हे आवाहन आहे.
इतर अनेक देशांत डॉक्टरना अँटिबायोटिक औषधे प्रिस्क्राईब करताना –लिहून देताना – त्याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे असतेच आणि अँटिबायोटिक फार काळजीपूर्वकच वापरावी लागतात. आरोग्य विभागाच्या या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अँटिबायोटिक औषधे आणि प्रतिरोध याविषयी अधिक जाणून घेऊ.
शरीरातील उपद्रवी जीवाणूंचा (बॅक्टेरिआ) नायनाट करणे हे प्रतिजैविकांचे काम असते. पूर्वी जंतुसंसर्गावर (इन्फेक्शन) मात करण्यास आपल्याकडे काही अस्त्र नव्हते.
१९४०च्या सुमारास पेनिसिलीनच्या रूपाने पहिले अँटिबायोटिक हाती आले आणि आजमितीला दोनशे ते अडीचशे प्रतिजैविके आणि त्यांची मिश्रणे उपलब्ध आहेत.
यातील काही अँटिबायोटिक नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे जीवाणूंच्या थोड्याच जातींविरुद्ध काम करतात. उदाहरणार्थ, पेनिसिलीन हे मुख्यतः ‘ग्राम पॉझिटिव्ह’ (उदाहरणार्थघसा, श्वसनमार्ग यांच्या संसर्गाला कारणीभूत ठरणारे स्ट्रेप्टोकोकाय हे जीवाणू) प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयुक्त ठरते. तर काही प्रतिजैविके ‘ब्रॉड स्पेक्ट्रम’ म्हणजे जीवाणूंच्या बहुविध प्रजातींविरुद्ध उपयुक्त आहेत.
उदाहरणार्थ, सिप्रोफ्लोक्सासिन गटातील किंवा सेफ्लॉस्पोरीन गटातील बहुतांशी प्रतिजैविके ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह अशा विविध जीवाणूंविरुद्ध प्रभावी आहेत.
प्रतिजैविकांची निवड ही संसर्गाच्या प्रकारानुसार, लक्षणे, आजाराची गुंतागुंत, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, वय असे अनेक घटक पाहून करणे गरजेचे असते.
विशिष्ट कालावधीत विशिष्ट मात्रेत प्रतिजैविकांचा ‘कोर्स’ करायला सांगितले जाते, जेणेकरून सर्व जंतूंचा नायनाट होईल. क्षयरोगसारख्या संसर्गात कमीत कमी सहा ते आठ महिने औषधे घ्यावीच लागतात.
जेव्हा या प्रतिजैविकांचा अतिप्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, तेव्हा रुग्णाच्या शरीरातील जीवाणूंना प्रतिजैविकांची काम करण्याची पद्धत जोखण्याची मुबलक संधी मिळते. या संधीचा फायदा घेत ते अत्यंत चतुराईने स्वतःत बदल (म्युटेशन) घडवून आणतात.
जीवाणूंमध्ये नैसर्गिकरित्यासुद्धा म्युटेशन होत असतात, पण प्रतिजैविकांच्या अतार्किक वापराने त्यांना चालना मिळते. अशा स्थितीत प्रतिजैविकांनाही चकवा देणाऱ्या जीवाणूंच्या प्रजाती निर्माण होतात. थोडक्यात, जीवाणूंच्या नवीन पिढ्या या निर्ढावलेल्या आणि बंडखोर असतात.
पूर्वी एखाद्या प्रकारच्या जीवाणूंना लीलया नामोहरम करणारी प्रतिजैविके मग या नव्या पिढीच्या बंडखोर जीवाणूंपुढे केविलवाणी होतात. त्यांची परिणामकारकता कमी होत जाते आणि संपतेदेखील. यालाच म्हणतात प्रतिजैविक प्रतिरोध किंवा अँटिबायोटिक रेझिस्टन्स.
अशा वेळी बंडखोर जंतूंमुळे झालेला संसर्गनियंत्रणात येत नाही, रुग्ण बरा होत नाही. परिणामी रुग्णाला अधिक क्षमतेचे प्रतिजैविक देण्याची वेळ येते. काही जीवाणू , सुपरबग्स मात्र सर्व प्रतिजैविकांना प्रतिकार करतात.
तसे झाल्यास आपल्याकडे काहीच उपाय राहत नाही. आज अनेक रुग्णांत सर्वाधिक प्रभावी समजली जाणारी, हाय एण्ड अँटिबायोटिक्सकार्बापिनिमनाही जीवाणू पुरून उरत आहेत. सूक्ष्म जंतू प्रबळ होत आहेत आणि प्रतिजैविके निष्प्रभ ठरत आहेत.
जंतुप्रादुर्भावनियंत्रण कठीण होत आहे आणि बरीच प्रतिजैविके त्यांच्या अस्तित्वाची लढाई हरत आहेत. मानवावरील उपचारांत आणि अन्नोत्पादक प्राण्यांमध्येवजनवाढीसाठी व जंतुप्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा अतिरेकी वापर होताना दिसतो आहे.
विविध कारणांमुळे पर्यावरणात जागोजागी प्रतिजैविकांचे अंश साठत गेले आहेत. मानव, प्राणी, वनसंपत्ती, अन्न, जमीन, पाणी हे सारेकाही परस्परांशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रतिजैविकांचा गैरवापर कुठेही झाला तरी संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा दुष्परिणाम होतो.
बंडखोर सूक्ष्मजीव पाणी, माती, मलमूत्र, दूषित वस्तू अशा माध्यमांतून लीलया एका रुग्णाकडून थेट दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्याचप्रमाणे त्यातील जनुकेही सहज एका जीवाणूतून दुसऱ्या जीवाणूत प्रवेश करतात.
ही बंडखोरी तेथील सर्वच जीवाणूंत पसरते. हे ‘बंडखोर’ यथावकाश इतस्ततः संक्रमित होतात. प्रतिरोध ही समस्यावैयक्तिक न राहता सामाजिक आरोग्याची बाब होते. या प्रसाराला कोणत्याच सीमा नाहीत.
त्यामुळे असा प्रतिरोध जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या टोकाला पसरायला वेळ लागत नाही. प्रतिजैविक प्रतिरोध हा मानवजातीसाठीचा एक जागतिक धोका आहे.
यासंदर्भातील प्रबोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २०१५पासून दर वर्षी नोव्हेंबरमध्ये जागतिक प्रतिजैविक जनजागरण सप्ताह आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.
जगात २०१९मध्ये १३ लाख रुग्ण थेट बंडखोर जंतुप्रादुर्भावाने मृत्युमुखी पडले. हे प्रमाण मलेरिया (६.५ लाख मृत्यू) किंवा एड्सपेक्षा (८.५ लाख मृत्यू) जास्त आहे, असे या संदर्भातील आकडेवारी सांगते.
प्रतिजैविके निष्प्रभ झाल्याने भारतात दर वर्षी तब्बल साठ हजार नवजात बालके मृत्युमुखी पडतात. कदाचित हा आकडा अधिकही असेल.
वैद्यकीय व्यावसायिक, फार्मासिस्ट आणि रुग्ण या तिन्ही घटकांमध्ये कोणतीही औषधे देताना, आणि घेताना औषधभान हवेच; पण प्रतिजैविकांबाबत ही जबाबदारी अधिक वाढते. प्रतिजैविकांच्या वापरासाठी प्रमाण मार्गदर्शक तत्त्वे असतात.
साधा घसा खवखवत असेल किंवा किरकोळ ताप असेल तर लगेच प्रतिजैविकांची गरज नसते. पोट बिघडल्यास प्रतिजैविके नव्हे तर जलसंजीवनी व तत्सम उपायांची गरज असते. सर्दी-पडसे अशा किरकोळ विषाणूजन्य आजारांसाठी तर प्रतिजैविके उपयोगाची नाहीतच.
गरज नसताना प्रतिजैविके देणे, मोठ्या प्रतिजैविकांचा विनाकारण वापर, एका वेळी दोन प्रतिजैविकांचा मारा करणारी बरीच प्रिस्क्रिप्शन्स आढळतात. काही डॉक्टर, काही रुग्णालये मात्र या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करतात.
पण हे सार्वत्रिक चित्र नाही. चाचण्या करण्याची सुविधा सहज, माफक दरात उपलब्ध नसणे, झटपट गुण यावा ही रुग्णांची अपेक्षा आणि दबाव, औषधनिर्मिती कंपन्यांचे ‘प्रॉडक्ट प्रमोशन’, अपुरे वैद्यकीय ज्ञान, प्रतिजैविक प्रतिरोधासंबंधी माहिती नसणे किंवा निष्काळजी दृष्टिकोन अशा अनेक बाबींमुळे प्रतिजैविकांची प्रिस्क्रिप्शन तार्किकरितीने लिहून दिली जात नाहीत, असे अनुभव बऱ्याचदा ऐकायला मिळतात.
प्रतिजैविके ही केवळ प्रिस्क्रिप्शनने देण्याची औषधे (शेड्यूल एच आणि एच-१) असतानादेखील, रुग्णाने मागितली म्हणून, प्रिस्क्रिप्शनशिवाय (सन्माननीय अपवाद वगळता) अनेक औषध दुकानांत विकली जातात.
तशी न दिल्यास रुग्णही खट्टू होतो आणि दुसरीकडे जाऊन किंवा ऑनलाइन मागवतो. फार्मासिस्टने विनाप्रिस्क्रिप्शन प्रतिजैविके विकणे योग्य नाही. रुग्णांचे समुपदेशन करणे अपेक्षित आहे.
डॉक्टरांनी लिहून दिलेली किंवा स्वतःच्याच मनाने घेतलेली प्रतिजैविके रुग्णांकडून जबाबदारीने घेतलीही जात नाहीत. कोर्स अर्धवट सोडला जातो. जरा बरे वाटले की औषधे थांबवली जातात आणि त्यामुळे पुढे बंडखोर जंतुजन्य संसर्गांचा सामना करावा लागतो.
घरात उरलेली प्रतिजैविके लक्षणे सारखी वाटली म्हणून इतर कुटुंब सदस्यांनी घेणे असेही चुकीचे प्रकार होतात. कोविड महासाथीच्या सुरुवातीला जनजीवन घरातच बंदिस्त झाल्याने संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले.
अनेक देशांत प्रतिजैविकांचा वापर लक्षणीयरित्या घटला. आपल्याकडे मात्र कडक टाळेबंदी असतानादेखील प्रतिजैविकांचा खप वाढला. गरज असो नसो, अनेकांनी अझिथ्रोमायसिन हे प्रतिजैविक घेतले.
अझिथ्रोमायसिनच्या प्रतिरोधात लक्षणीय वाढ झाली तर नवल नाही. प्रतिजैविके वारंवार वापरून त्यांचे दुष्परिणाम होतातच.
आतड्यातील गुणी, उपयुक्त जीवाणूंच्या वसाहतींनाही धक्का पोहोचतो. उपद्रवी संधिसाधू जीवाणू, बुरशीच्या प्रजातींना संधी मिळते आणि त्यातून नवे आजार उद्भवतात. स्वतःच स्वतःचे डॉक्टर होऊन प्रतिजैविके घेणाऱ्यांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
फंगल (बुरशीजन्य) इन्फेक्शनमध्येही अँटिफंगल औषधांना प्रतिरोध मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रगत देशांत आणि अनेक विकसनशील देशांतही प्रतिजैविकांचा वापर फार काळजीपूर्वक केला जातो.
उगाच किरकोळ ताप, खोकला वगैरेसाठी पहिल्या दिवसापासून प्रतिजैविके देता येत नाहीत. डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही संयम बाळगावा लागतो. अगदीच गरज वाटलीच तरच (शक्यतो काही चाचण्या, तपासण्या करून) नंतरच वापर होतो. उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागतात.
रुग्णसुद्धा, ‘स्ट्राँग औषध द्या’, असा दबाव आणून प्रतिजैविके देण्यास डॉक्टरांना भाग पडू शकत नाहीत. फार्मासिस्टही प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैविके देत नाहीत, रुग्णाचे समुपदेशन करतात.
काही देशांत तर फार्मसीच्या दुकानातच रुग्णास संसर्ग आहे का याची शहानिशा करायला फार्मासिस्ट्स चाचण्या (पॉइंट ऑफ केअर टेस्टिंग) करतात. उदाहरणच द्यायचे तर सर्वात सामान्य असलेला घशाचा संसर्ग.
फार्मासिस्ट यासाठी ‘स्ट्रेप थ्रोट’ चाचणी करतात. संसर्ग आढळल्यास डॉक्टरकडे पाठवतात. अनेक देशांत लेबलवर स्पष्टपणे अमुक औषधात प्रतिजैविके आहेत असे नमूद केलेले असते. त्यामुळे ग्राहकांनाही त्याची माहिती मिळणे सोयीचे होते.
प्रतिजैविकांवर आधारित औषधांची विविध मिश्रणे, त्यातही अनेक शास्त्रीयदृष्ट्या अतार्किक असण्याचीच शक्यता, ही भारतात मोठी डोकेदुखी आहे.
हा खास ‘ये है इंडिया’ प्रकार आहे. अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये फक्त दोन-चार मिश्रणे असतील तर आपल्याकडे ७०-८० असतात. जगात कुठेच असा मिश्रण औषधांचा सुळसुळाट नाही.
२०१५मध्ये झालेल्या ७५ देशांच्या सर्वेक्षणात भारतात सर्वांत जास्त म्हणजे तब्बल ८० प्रतिजैविक मिश्रणे बाजारात होती आणि त्यातही प्रगत देशांत न वापरली जाणारी मिश्रणे सर्वाधिक होती, असे आढळले होते. प्रतिजैविके प्रतिरोधाची समस्या अशी बहुआयामी आहे.
शासन, प्रशासन, डॉक्टर, औषध कंपन्या, फार्मासिस्ट, रुग्ण, रुग्णालये, अन्नोत्पादक अशा अनेक घटकांनी या गंभीर समस्येसाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.
या दृष्टीने प्रतिजैविक धोरण वगैरे अस्तित्वात आले आहे, पण अधिक ठोस उपाय व त्याची परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक आहे.
नवीन प्रतिजैविकांसाठी जोमाने संशोधनाची गरज आहे. प्रतिजैविके प्रतिरोध थोपवण्याचा सर्वांत कमी खर्चिक आणि सोपा उपाय म्हणजे ती कमीत कमी वापरावी अशी परिस्थिती निर्माण करणे, अर्थात संसर्ग होऊ न देण्याचा प्रयत्न करणे हाच होय.
सर्वांसाठी पायाभूत सुविधा, लसीकरणही महत्त्वाचे. स्वच्छता, रोगप्रतिकारशक्ती टिकवणे हे प्रत्येकाने केलेच पाहिजे. प्रतिजैविक युगाचे जनक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी याच शोधासाठी त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक स्वीकारताना ‘जपून वापरा प्रतिजैविके’ असा इशारा दिला होता.
तो आपण गांभीर्याने घेतला नाही आणि आज प्रतिरोधाचा टाइम बॉम्ब समोर उभा आहे. आता तरी आपल्याला प्रतिजैविकांचे भान येईल का?
थोडक्यात महत्त्वाचे
प्रतिजैविके ही शेड्ल एच आणि एच-१ अतंर्गत म्हणजे प्रिस्क्रिप्शनने व डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची औषधे आहेत, स्वतःच्या मनाने घेण्याची नाहीत.
अँटिबायोटिक औषधाच्या लेबलवर डावीकडे तांबडी रेघ, शेड्युल एच किंवा एच-१ असे चौकटीत लिहिलेले असते.
लवकर बरे व्हायचेय, स्ट्राँग औषध द्या, अँटिबायोटिक द्या, असा दबाव डॉक्टरांवर वा औषध दुकानात जाऊन फार्मासिस्टवर आणू नये. फार्मासिस्टनेही प्रिस्क्रिप्शनविना प्रतिजैविके विकणे योग्य नाही. रुग्णांनीही डॉक्टर व फार्मासिस्टना सहकार्य करणे आवश्यक आहे.
डॉक्टरांकडून निघताना प्रिस्क्रिप्शनमध्ये प्रतिजैविक लिहिले आहे का, असल्यास ते कोणते, त्याचा कोर्स किती दिवसाचा हे जाणून घ्यावे. फार्मसीमध्ये फार्मासिस्टलाही याबाबत विचारावे व मार्गदर्शन घ्यावे.
प्रतिजैविक औषधे घेतल्यानतर जरी त्वरित बरे वाटू लागले तरी प्रतिजैविकाचा सांगितलेला कोर्स अर्धवट सोडू नये. ५, ७, १०, १५ दिवस वगैरे जो कालावधी सांगितला आहे तो पूर्ण करावा.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.