संजय करकरे, नागपूर
देशातील व्याघ्र संवर्धनाच्या वाटचालीला ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. शास्त्रीय पद्धतीने केलेल्या संवर्धनामुळे वाघांची संख्या १,४००वरून ३,६०० अशी दुपटीने वाढली. व्याघ्र संवर्धनाचं एक यशस्वी मॉडेल भारतानं जगापुढे ठेवलं. जगातील ७५ टक्के वाघ भारतात आहेत.
वाघांचा मागोवा आणि संख्येचा अंदाज घेण्यासाठी कॅमेरा ट्रॅप या सर्वात अचूक आणि शास्त्रीय पद्धती जगात सर्वात पहिल्यांदा भारताने वापरली. आपल्या देशाचा विचार केला, तर १७ राज्यांमध्ये वाघाचं अस्तित्व आहे. व्याघ्र गणना, वाघांची वाढणारी संख्या, त्यांचे व्यवस्थापन आणि वाढते वनपर्यटन याचा वेध..
घटना २००५च्या मार्चमधील. या एका घटनेनं संपूर्ण देशातील व्याघ्र संवर्धनाच्या चळवळीला जबर धक्का बसला. राजस्थानातील सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील सर्व वाघ संपले, असं जाहीर करण्यात आलं. एखाद्या व्याघ्र प्रकल्पातील वाघ नष्ट झाल्याची ही देशातील पहिलीच घटना होती.