डॉ. राधिका टिपरे
पन्नाचं जंगल मला अतिशय आवडलं... भरपूर वाघ दिसले म्हणून नाही, तर त्या जंगलातील वैशिष्ट्यपूर्ण निसर्गसौंदर्यामुळे. मनापासून आवडली ती जंगलाच्या मध्यातून वाहणारी केन नदी. एकीकडे विंध्याचलाच्या कमी उंचीच्या पर्वतरांगांचं शुष्क कोरडेपण आणि दुसरीकडे काळ्या पाण्याचे खोल डोह असणाऱ्या केन नदीचे विस्तीर्ण पात्र... यामुळे हे जंगल कमालीचं सुंदर वाटतं.
या जंगलाची टोपोग्राफी इतर जंगलांपेक्षा खूपच वेगळी आहे, त्यामुळे आपसूकच आपण या जंगलाच्या प्रेमात पडतो. खोल दऱ्या, घळी यांमुळे दुभंगलेली शुष्क गवताळ पठारं आणि वळणावळणांचे घाट रस्ते यामुळे पन्नाच्या जंगलातील भटकंती आपली दमछाक करते, हेही तितकंच खरं!
पन्ना अभयारण्यातील वाघांचे फोटो पाहून या जंगलाला भेट द्यायलाच हवी असं मनात येत होतं. महाराष्ट्रातील पेंच, टिपेश्वर आणि ताडोबा या जंगलांना भेट द्यायचं ठरलं होतंच; मग तसंच पुढे मध्य प्रदेशातील पन्ना राष्ट्रीय उद्यानालाही भेट द्यावी या विचारांनी तिथल्या सफारींचं आरक्षणही करून टाकलं होतं.
खरंतर या दूरच्या प्रवासात उन्हाचा त्रास बऱ्यापैकी जाणवत होता... पण जंगल पाहण्यासाठी कायपण अशी मनाची तयारी झालेली होती. पेंचमधून भल्या पहाटे निघालो तरी पुढे मध्य प्रदेशातील पन्नाच्या जंगलापर्यंत पोहोचण्यासाठी आख्खा दिवस प्रवासात घालवावा लागला.
पहिल्यांदाच या जंगलात जात होते. मंडला हे पन्नाच्या जंगलात जाण्याचं एक प्रमुख प्रवेशद्वार असल्यामुळे त्याच्या जवळच असलेल्या मंडला जंगल कॅम्प या मध्य प्रदेश टुरिझमच्या छानशा रिसॉर्टमध्ये तीन दिवसांचं आरक्षण करून ठेवलं होतं. रिसॉर्ट छानच होतं. जंगलाला खेटूनच असल्यामुळे आणखीनच आवडलं. दुसरे दिवशी सकाळची सफारी होती. दिवसभराच्या प्रवासामुळे कंटाळलो होतोच, त्यामुळे रात्री पटकन झोपून गेलो.