ॲड. सीमंतिनी नूलकर
सूर्यफुलांचा रंग व्हिन्सेंट व्हॅन गॉगसाठी आनंद रंग होता, तर सूर्यफूल कृतज्ञतेचं प्रतीक होते. ‘पेंटर ऑफ सनफ्लॉवर्स’ व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या ‘सनफ्लॉवर्स’ या अजरामर चित्रमालिकेतून सूर्यफुलं अजरामर झाली की सूर्यफुलांच्या पेंटिंगनी व्हिन्सेंट व्हॅन गॉगला आयडेंटिटी मिळाली? व्हॅन गॉगचा चित्रकार मित्र पॉल गॅगवीन, गॉगच्या सूर्यफुलांबद्दल म्हणतो, “टोटली व्हिन्सेंट”.
लखलखीत सोनपिवळ्या प्रसन्न सूर्यप्रकाशात एकेकाळच्या वैभवशाली विजयनगरची राजधानी हंपी न्हाऊन निघाली होती. माझी सोलो हंपी मनमुराद चालली होती .
हिप्पी आयलंडवर तर काही क्षणी श्रावणातला गोवा आहे का मंगलोर असा गोंधळ उडावा इतकी हिरवीगार भात खाचरं, नारळाची झाडं! भर फेब्रुवारी महिन्यात!
पाहिजे त्या मंदिरात हवा तितका वेळ घालवावा, फोटो काढावे, मस्त फतकल मारून कुठेही बसावे. भूक लागली तर मधुर ‘सुगंधी जवारी’ किंवा ‘येलक्की’ केळी कुठेही मिळायची. एखाद्या घरात गरमागरम गुंडपंगलू-गुलीअप्पा किंवा इडली.
किष्किंधा, अनेगुंडी, पंपासरोवर, आदिमानवाने काढलेली हंपी परिसरातील शिल्प रेखाचित्रं! रोजचा दिवस नवा नजराणा घेऊन हजर व्हायचा. आज हे उत्कटतेने आठवायचं कारण म्हणजे सूर्यमुखी... मेक्सिकन झेंडू! Tithonia diversifolia.
माझ्या झाझेन या फार्म हाऊसवर मेक्सिकन झेंडू अनावर फुलला आहे. हंपीने मला दिलेली मधाचा नाजूक रेंगाळणारा दरवळ असलेल्या फुलांची भेट! हंपीच्या रस्त्यावरून निरुद्देश भटकताना तळहातापेक्षा मोठ्याच पिवळ्याधमक फुलांनी लक्ष वेधून नाही तर अक्षरशः खेचून घेतलं. एका नाल्यातून, पिवळ्याधमक फुलांनी लगडलेले, दहा- बारा फूट उंच, नेहमीच्या झेंडूपेक्षा उंच सणसणीत, झेंडूचे ‘झाड’ मान वर करून मला खुणावत होतं. मी बघता क्षणीच प्रेमात! हवंच! नुसतं फूल नव्हे तर झाड! माझ्या दारात त्यानं फुलायचंच आहे हे मी त्याला न विचारता ठरवून टाकलं.
आता त्यासाठी काहीही! नाल्यात उतरणंही मला मान्य होतं. सर्व प्रकारच्या कसरती केल्यावर एक बरीशी फांदी पदरात पडली. कुठे खरचटलं. रक्त आलं. इतना तो बनता ही है ‘उसके लिये’...
मूळची ही मेक्सिको मधली प्रजाती. आता जगभर बस्तान बसवून आहे. तिला Nitobe chrysanthemum असंही म्हणतात. माझा अजून दोन दिवस हंपीत मुक्काम होता. तोपर्यंत या सोनसख्याचा जिवापाड सांभाळ करायलाच हवा होता.
झाडांना जर प्रेमाने, हळूवारपणाने काहीही सांगितलं तर ती ऐकतात. यालाही हळूच सांगितलं, “तू माझ्या अंगणात फुलायचं आहेस... घरी जाईतोपर्यंत रोज नीट पाणी प्यायचं, तब्येत राखायची. रोज तुला तुझ्या लाडक्या सूर्यप्रकाशात न्हाऊ घालायचं, माझ्या बरोबर फिरवायचं, माझं तुला प्रॉमिस!”
आमचं सख्य जुळलं ते जुळलंच. या मैत्रीतून माझ्या या सख्याबद्दल बरंच काही समजत, उलगडत गेलं. त्यांचं मातीची धूप रोखणं, मातीचा कस वाढवणं, सेंद्रिय खत म्हणून मूक भूमिका बजावणं.
दोन वर्ष झाली. त्यानेही माझ्या अंगणात फुलायचं प्रॉमिस कसोशीने पाळलंय. यावर्षी तर कहर बहर आहे. ‘पेंटर ऑफ सनफ्लॉवर्स’ व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या ‘सनफ्लॉवर्स’ या अजरामर चित्रमालिकेतून सूर्यफुलं अजरामर झाली की सूर्यफुलांच्या पेंटिंगनी व्हिन्सेंट व्हॅन गॉगला आयडेंटिटी मिळाली? ‘पेंटर ऑफ सनफ्लॉवर्स’ अशी ओळख व्हॅन गॉगला हवी होतीच.
सूर्यफुलांचा रंग त्याच्यासाठी आनंद रंग होता, तर सूर्यफूल कृतज्ञतेचं प्रतीक होते. त्याच्या या चित्रांनी, चित्रकलेमधले रंगसंगतीचे मूलभूत नियमही धुडकावले. व्हॅन गॉगची पिवळ्या टेबलटॉपवरच्या पिवळ्या व्हासमधली, पिवळ्या भिंतीच्या पार्श्वभूमीवरची धमक पिवळी सूर्यफुलं दिप्तीमान प्रकाश परावर्तित करतात.
व्हॅन गॉगचा चित्रकार मित्र पॉल गॅगवीन, गॉगच्या सूर्यफुलांबद्दल म्हणतो, “टोटली व्हिन्सेंट”. मला माझ्या अंगणातल्या सोनसळी फुलांनी बहरलेल्या सूर्यफुलांकडे, त्यांनी सजवलेल्या फुलदाणीकडे पाहून तेच, तसंच वाटतं. ‘टोटली व्हिन्सेंट’.
सूर्यफुलात निसर्गाचं एक गुपित दडलेलं आहे ते वेगळंच.
सूर्यफुलाच्या बियांचा पॅटर्न म्हणजे हे गुपित... निसर्गाचा सार्वत्रिक नियम... फिबोनाची सिक्वेन्स! या सिक्वेन्सचं-शृंखलेचं नाव इटालियन गणिती लिओनार्दो फिबोनाचीच्या सन्मानार्थ दिलं गेलंय, पण इ.स. पूर्व २००मध्ये पिंगलाच्या गणितात या शृंखलेचा सर्वात प्राचीन उल्लेख आढळतो. लिओनार्दो फिबोनाचीपूर्वी हेमचंद्र, नारायण पंडित अशा अनेक भारतीय गणितींनी या सूत्राचा वापर केला आहे... अगदी संस्कृत साहित्यात कवितेच्या संदर्भातसुद्धा!
फुलझाडांपासून, चक्रीवादळांपासून, सर्पिल आकाशगंगेपर्यंत निसर्गात सार्वत्रिक आढळणारा हा नियम आहे. अगदी सूर्यफुलातही ठसठशीतपणाने आहे. सूर्यफुलातल्या बियांचे डावीकडे आणि उजवीकडे सर्पिल हस्त (Spiral Arms) असतात, पण त्यांचा आकडा वेगवेगळा असतो -२१ सर्पिल हस्त उजवीकडे तर ३४ डावीकडे. या रचनेमागे एक सुवर्ण प्रमाण किंवा गुणोत्तर (Golden Angle) आहे.
फिबोनाची क्रम म्हणजे संख्यांची मालिका, ज्यात प्रत्येक संख्या त्या आधीच्या दोन संख्याची बेरीज असते. म्हणजे ०. १. १. २. ३. ५... (०+१=१, १+१=२, १+२=३...) सौंदर्यासक्त माणूस आर्किटेक्चर, ग्राफिक डिझाइनपर्यंत कुठेही फिबोनाची क्रमाचा ‘गोल्डन रेशो’ म्हणून वापर करतोय.
मला माझ्या सूर्यमुखीने हे विराट दर्शन तर घडवलेच. पण प्रत्येक फूल स्वतःचा एक संदेश देत असतं. तशी ही मूळची मेक्सिकन सूर्यफुलं सुसंवाद, नैसर्गिक ठेहराव, मैत्रीचा संदेश देत माझ्या अंगणात फुलत आहेत, दरवळत आहेत.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.