जागतिक वाङ्मयावर आपला ठसा उमटविणारा मार्क ट्वेन त्याच्या विनोदाइतकाच प्रसिद्ध आहे तो त्याच्या प्रवास-कथांसाठी. उपद्व्यापी मुलांच्या जागतिक मांदियाळीत अढळ स्थान मिळवणाऱ्या टॉम सॉयरच्या या जन्मदात्याच्या द इनोसन्ट्स अॅब्रॉड किंवा लाइफ ऑन दि मिसिसिपीसारख्या प्रवास-कथा आजही साहित्य रसिकांना आनंद देऊन जातात.
पर्यटनाबद्दल मार्क ट्वेनच्या स्वतःच्या अशा काही कल्पना आहेत. ‘पूर्वग्रह, हटवादीपणा आणि संकुचित विचारांसाठी पर्यटन अत्यंत घातक ठरतं’, हा खास ट्वेन शैलीतला पर्यटकांसाठीचा ‘वैधानिक’ म्हणता येईल असा इशारा.
प्रवास आणि पर्यटनाबद्दल ट्वेन साहेब पुढे म्हणतात, (केवळ) पृथ्वीच्या एका कोपऱ्यात भाजीपाल्यासारखं पडून राहून सर्वसमावेशक, कल्याणप्रद आणि उदार दृष्टिकोन नाही मिळवता येत.