सुजाता नेरुरकर, सुतेजा सुभाष दांडेकर, सुप्रिया सुधाकर खासनीस
पारंपरिक उकडीचे मोदक
वाढप : साधारण २१ मध्यम आकाराचे मोदक
साहित्य :
सारणासाठी : दोन मध्यम आकाराचे नारळ (खोवून), १ चमचा तूप, दीड कप गूळ, अर्धा कप साखर, थोडी खसखस, १ टीस्पून वेलची पूड, अर्धा कप सुकामेवा (काजू-बदामाचे तुकडे, किसमिस).
आवरणासाठी : दोन कप तांदळाचे पीठ (मोदकाचे रेडिमेड पीठ घेतले तरी चालेल), २ टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार.
कृती :
सारणासाठी : ओला नारळ खोवून घ्यावा व गूळ चिरून घ्यावा. एक कढई गरम करायला ठेवावी. त्यामध्ये तूप, ओला नारळ व गूळ घालून मिक्स करावे. गूळ विरघळेपर्यंत गरम करावे. गूळ विरघळल्यावर व सारण थोडेसे चिकट झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड, खसखस व सुकामेवा घालून मिक्स करावे.
आवरणासाठी : एका जाड बुडाच्या भांड्यात २ कप पाणी गरम करावे. त्यामध्ये २ चमचे तेल किंवा तूप, चवीनुसार मीठ घालावे. मग तांदळाची पिठी व मैदा मिक्स करावा. त्यावर अर्धा कप साधे पाणी घालून झाकण ठेवावे व अर्धा मिनिट गरम करून मग विस्तव बंद करावा. भांडे तसेच एक मिनिट झाकून ठेवावे. तयार तांदळाची उकड प्लेटमध्ये काढावी. हाताला पाणी लावून पीठ चांगले मळून घ्यावे. मग त्याचे छोटे छोटे एकसारखे गोळे करावेत.
मोदकांसाठी : मोदकाचा साचा घेऊन त्यामध्ये आवरणाचे पीठ भरावे. मधे पोकळी करून त्यामध्ये नारळाचे सारण भरावे. वरून परत तांदळाच्या उकडीचे पीठ लावून साचा बंद करावा. साच्यातून हळुवारपणे तयार मोदक काढावा. सर्व मोदक करून घ्यावेत. मोदकपात्रामध्ये २ मोठे ग्लास पाणी गरम करावे. वरच्या चाळणीवर केळीचे पान किंवा हळदीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. प्रत्येक मोदकावर केशराची एकेक काडी ठेवावी. वरून केळीचे पान ठेवून मोदक पात्राचे झाकण लावावे. १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्यावेत. गरम गरम मोदक तुपाबरोबर खायला द्यावेत.