अश्विनी बनसोडे
तवा फ्राय शेवगा
वाढप: २ व्यक्तींसाठी
साहित्य: दोन शेवग्याच्या शेंगा, तेल, हळद, मीठ, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ छोटा कांदा व थोडेसे खोबरे भाजून (याची पाणी घालून बारीक पेस्ट करावी).
कृती:
शेवग्याच्या शेंगांचे वरील साल काढावे व शेंगांचे पाच पाच तुकडे करून पाण्याने धुऊन ठेवावेत. लोखंडी तव्यावर फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल घालावे. तेल गरम झाले की मंद आचेवर आले-लसूण पेस्ट, कांदा व खोबऱ्याची बारीक केलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत फ्राय करावे.
नंतर लाल तिखट, हळद, मीठ व शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालून फ्राय करावे. दीड कप पाणी घालून मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घ्यावे. शिजताना त्यावर झाकण ठेवावे. म्हणजे वाफेमध्ये शेंगा छान शिजतात व त्यामध्ये मसालाही मुरतो. ५ ते ६ मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा परतून घ्यावे. करपणार नाही याची काळजी घ्यावी.
शेंग हाताने सहज दाबली गेली, की समजायचे शेंगा शिजल्या आहेत. शेवटी बारीक केलेली कोथिंबीर घालून रोटी किंवा चपातीबरोबर तवा फ्राय शेंगा सर्व्ह करावे.
--------------------------------