डॉ. वर्षा वर्तक
पॅरिसचे रस्ते, स्विस आल्प्सचे डोंगर, रोममधील ऐतिहासिक स्थळं आणि भूमध्य समुद्राचे किनारे त्यांना खुणावत होते. तिथं त्यांना उत्साहानं हिंडायचं होतं; न दमता, न थकता एन्जॉय करायचं होत. आणि यासाठी लागणारा कॉन्फिडन्स त्यांना फिजिओथेरपिस्टनं दिला होता.
नितीन आणि सीमा जोशी - एक मध्यमवयीन हरहुन्नरी जोडपं. दोघांनाही साहसी पर्यटनाची (Adventure Tourism ) आवड. त्यामुळे वेळ मिळाला की कुठेतरी ट्रेकिंगला जा, कुठे सायकलिंगला जा, कुठे सफारीला जा असं चालूच असायचं.
दोघांनीही आता पन्नाशी पार केली होती, त्यामुळे आता घरच्या, नोकरीच्या जबाबदाऱ्याही थोड्या कमी झाल्या होत्या. मुलंही इंडिपेंडंट झाली होती.
थोडी गंगाजळीही साठली होती. त्यामुळे सध्या तर भटकंती जोरात चालू होती. काटेकोर नियोजन करून कुठे राहायचं, काय पाहायचं, काय खायचं, काय शॉपिंग करायचं असा सगळा आखीवरेखीव आणि शिस्तबद्ध कार्यक्रम करण्यात दोघंही एक्स्पर्ट होते. आता जोडीला त्यांनी मित्रमंडळीही जमवली होती.
पाठीला सॅक लावून हिमाचल प्रदेशात मनसोक्त वॉकिंग ट्रेल्स करून येतायत, तोपर्यंत त्यांच्या मित्रमंडळींनी पुढचा कार्यक्रम मध्य प्रदेशातील अभयारण्यामध्ये फिरण्याचा ठरवला, आणि दोघं पुन्हा निघाले! खूप साऱ्या सफारी प्लॅन केल्या होत्या.
बरोबर समवयस्क मित्रमंडळींचा सहवास होता. थोडी जागरणं, थोडी प्रवासाची दगदग, नेहमीपेक्षा वेगळं खाणंपिणं यामुळे हळूहळू तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. नितीनला थोडा पाठदुखीचा त्रास सुरू झाला. एक खांदाही जरा आखडला होता.
विशेषतः सकाळचा सफारी जीपचा प्रवास सहन होत नव्हता, पण सफारी मिस करायच्या नव्हत्या. पेनकिलर गोळ्या चालू होत्या, मसाज चालू होता, पण हे सगळं करून तात्पुरतं बरं वाटत होतं. त्यातच सीमाची पायदुखीची तक्रार सुरू झाली.
पोटरीत अचानक क्रॅम्प येऊ लागले, गुडघेही जरा कुरकूर करू लागले. मग कुठे शेक घे, कुठे क्रेप बँडेज बांध, कुठे नी कॅप वापरून बघ, कधी बाम लावून चोळून बघ असेही उपाय सुरू झाले. पण दुखणं काही जात नव्हतं.
दिवसभर सफारीला जाऊन आल्यावर रात्री सगळेजण कॅम्प फायरभोवती गप्पा मारायला जमले होते. दिवसभराचे अनुभव शेअर करत होते. हळूहळू गप्पांची गाडी दिवसभराच्या श्रमाने दुखणाऱ्या मान, पाठ, कंबर इत्यादीवर आली.
कोणाची मान दिवसभराच्या सफारी जीपच्या धक्क्यांनी दुखत होती, कोणाची जरा कंबर धरली होती, कोणाचे गुडघे कुरकूरत होते, तर कोणाला खूप वेळ सफारी जीपमधून आणि उन्हातान्हात फिरल्यामुळे जरा डिझीनेस आला होता.
मग काय, पेन किलर, अँटासिड अशी औषधं घे किंवा एखाद्या बामनं मसाज कर, असे सुचतील ते उपाय सगळेजण एकमेकांना सुचवत होते.
कारण कुणालाच उद्याची सफारी बुडवायची नव्हती. पण प्रत्येकजण पुढच्या ट्रिपला जाण्याआधी नक्की फिट व्हायचं, असं मात्र मनोमन ठरवत करत होता.
कारण पुढची ट्रिप युरोपमध्ये करायचा प्लॅन ठरत होता. चॅलेंज मोठं होतं, खर्च मोठा होता आणि मुख्य म्हणजे ही ट्रिप आयुष्यात एकदाच होणार होती. त्यामुळे तब्येतीची कुरकूर मध्यात येऊन चालणार नव्हती.
पण फिटनेस वाढवायचा कसा? जिमला जायचं, चालायला जायचं, पळायला जायचं की योगा करायचा? आणि यामुळे कंबरदुखी, मानदुखी, टाचदुखी किंवा गुडघेदुखी टाळता येणार आहे का? बरं आत्ता खूप काही त्रास होतोय असंही नाहीये, पण १०० टक्के फिट आहोत का? तर खात्रीनं ‘नाही’ असंही वाटत नव्हतं.
मग नितीन आणि सीमानं मात्र फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यायचं नक्की केलं. मध्य प्रदेशातून परत आल्यावर नितीननं पाठदुखीवर फिजिओची ट्रीटमेंट सुरू केली. अद्ययावत मशीन आणि प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट असलेलं क्लिनिक शोधलं.
एक आठवड्यात दुखणं पूर्ण थांबलं. त्याच्या अनुभवामुळे सीमानंही आता गुडघ्यावर ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं. मुळात एक चांगली गोष्ट अशी होती, की दोघंही दुखणं फार दिवस अंगावर न काढता लगेच जागे झाले होते. त्यामुळे त्यांना ट्रीट करणं फिजिओथेरपिस्टला सोपं गेलं.
पेनफ्री झाल्यावर आता चॅलेंज होतं फिटनेसचं. दोघांची बेसिक फिटनेस टेस्ट केली, प्लस-मायनस पॉइंट नोट केले. नंतर फिजिओनं त्यांना त्यांचा गोल विचारला.
म्हणजे युरोपमध्ये रोज किती चालायचं आहे, किती चढ-उतार, डोंगर आहेत इत्यादी. त्याप्रमाणे एक फिटनेस रुटीन बसवून दिलं. रोज प्रॅक्टिस म्हणून किती स्टेप चालायचं ते सांगितलं. गुडघे स्ट्राँग करायचे व्यायाम सांगितले. योगा बेल्ट, फोम रोलरचा उपयोग कसा करायचा, स्ट्रेचिंग कसं आणि कधी करायचं, हे शिकवलं.
मान, कंबर, पाठ दुखू नये म्हणून कशी काळजी घ्यायची, त्यासाठी शरीराचं पोस्चर कसं असलं पाहिजे यांसारख्या अनेक गोष्टी या ट्रेनिंगचा भाग होत्या. फिजिओनं त्या नुसत्या तोंडी सांगितल्या किंवा चार्ट करून दिला असं नाही, तर हे सगळं त्यांना शिकवून त्यांच्याकडून करून घेतलं.
नितीनला त्याच्या स्नायूंची स्ट्रेंथ आणि तक्रारीप्रमाणे; तर सीमाला तिच्या गरजेनुसार शिकवलं. हळूहळू हेच व्यायाम आपापले, घराच्या घरी कसे करायचे हेसुद्धा शिकवण्यात आलं.
यात एक महत्त्वाची गोष्ट अशी असते, की हे व्यायाम सरसकट सगळ्यांनी करायचे नसतात. म्हणजे माझी पण पाठ दुखातीये तर मीपण हेच व्यायाम करतो, असं नसतं.
कारण अर्थातच पाठदुखीचं प्रत्येकाचं कारण वेगळं असतं, प्रत्येकाच्या स्नायूंची ताकद वेगळी असते.
व्यायाम तोच असेल पण किती वेळा करायचा याचं प्रमाण बदलू शकतं. शरीराला आवश्यक नसलेला व्यायाम करून अपाय जरी झाला नाही तरी उपयोग तरी व्हायला हवा ना!
यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की वयाच्या चाळिशीनंतर प्रत्यकाने आपली मस्क्युलोस्केलेटल (एमएसके) ॲसेसमेंट (Musculoskeletal Assessment) करून घ्यायला हवी.
आता मस्क्युलोस्केलेटल ॲसेसमेंट म्हणजे नक्की काय आणि ती कशासाठी करायची? तर चाळिशीनंतर सगळेच शुगर, बीपी अशा रक्त तपासण्या नियमित करतात. पण जे स्नायू, जी हाडं आपला भार वाहतात त्यांची काळजी नको घ्यायला? यासाठी ही तपासणी आवश्यक.
ही तपासणी तज्ज्ञ एमएसके फिजिओथेरपिस्ट करतो. ज्यात तुम्हाला तुमचे स्ट्राँग आणि वीक स्नायू कोणते ते कळतं. त्याचप्रमाणे आहे ती स्ट्रेंथ कशी टिकवायची किंवा वाढवायची ते ठरवता येतं.
वय जसजसं वाढत जातं, तसतशी स्नायूंची झीज होते, ताकद कमी होते. मग हाडांवरचा भार वाढतो आणि तीसुद्धा झीजू लागतात. म्हणजेच ओस्टिओपोरोसिस (Osteoporosis) होतो. पण नुसते कॅल्शिअम किंवा कॅल्शिअम सप्लिमेंट घेऊन हाडं मजबूत होत नाहीत, तर त्याला व्यायामाचीही जोड लागते.
व्यायाम करून आपण स्नायू मजबूत करू शकतो, जेणेकरून हाडंही मजबूत राहतात. पण चाळिशीनंतर अचानकपणे खूप व्यायाम सुरू केला, तर दुखापतही होऊ शकते. म्हणून ही मस्क्युलोस्केलेटल ॲसेसमेंट गरजेची आहे.
नितीन आणि सीमाची अशी पद्धतशीर तयारी बघून त्यांच्या ग्रुपलाही पटलं की आपणही आता फिटनेस वाढवला पाहिजे. कारण आपण जेव्हा ग्रुपनं प्रवास करतो, तेव्हा सगळे फिट असले तरच सगळे एन्जॉय करू शकतात.
चालताना, हिंडताना एकत्र राहू शकतात. मुख्य म्हणजे कोणालाच असं वाटत नाही की माझ्यामुळे इतरांना एखादी गोष्ट मिस करावी लागली. आता सर्वजण मिळून जोमाने फिटनेस रुटीन करत होते.
मग आता या ग्रुपच्या फिटनेस टूलकिटमध्ये काय काय होतं? योगा बेल्ट, फोमरोलर आणि स्ट्रेचिंग चार्ट. बस्स, एवढंच पुरेसं होतं. पण आता त्यांच्या डोक्यात ‘डूज्’ आणि ‘डोन्ट्स’ची, म्हणजेच काय करायचं आणि काय नाही, याची पक्की लिस्ट तयार होती.
युरोपला निघायची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतशी एक्ससाईटमेन्ट तर वाढतच होती, पण फिटनेसमुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता. पॅरिसचे रस्ते, स्विस आल्प्सचे डोंगर, रोममधील ऐतिहासिक स्थळं आणि भूमध्य समुद्राचे किनारे त्यांना खुणावत होते.
तिथं त्यांना उत्साहानं हिंडायचं होतं; न दमता, न थकता एन्जॉय करायचं होत. आणि यासाठी लागणारा कॉन्फिडन्स त्यांना फिजिओथेरपिस्टनं दिला होता. नुसती ही ट्रिपच नव्हे, तर यापुढील आयुष्यही एका वेगळ्याच उत्साहानं जगण्याची ऊर्जा त्यांना मिळाली होती.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.