दिपाली देसाईसुमारे तीन हजार फूट चढाई पूर्ण झाली. त्यापैकी एक हजार फूट टप्प्याटप्प्याने रॉक क्लाइंबिंग करून लिंगाणा सुळक्यावर पोहोचलो, तेव्हा जो आनंद झाला तो अवर्णनीयच! खूप भारी वाटत होते आणि विश्वासच बसत नव्हता की आपण या अवघड सुळक्यावर पोहोचलो! .माझी बहीण कांचन आणि मी, आम्हा दोघींना २०२१नंतर ट्रेकिंग फारच आवडायला लागले. पुण्याजवळच्या ट्रेकसाठी आम्ही दोघी दुचाकीवरून जातो. सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, केंजळगड, लोहगड, तिकोना, मल्हारगड, पुरंदर किल्ल्यांवर आम्ही दुचाकीवरूनच गेलो. तर दूरच्या ट्रेकसाठी ट्रेकिंग ग्रुपबरोबर जातो, जेणेकरून प्रवास, जेवण व राहायची सोय होते, नवीन ओळखी होतात.सह्याद्रीतील अवघड समजला जाणारा लिंगाणा ट्रेक करायचा असे आम्ही दोघींनी ठरवले. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका, हा सुळका दोरीच्या साहाय्याने चढता येतो. रायगड जिल्ह्यातला लिंगाणा पुण्यापासून साधारण १३५ किमी अंतरावर आहे. एका व्यावसायिक ट्रेकिंग ग्रुपकडे पैसे भरून ट्रेकसाठी नोंदणी केली आणि आम्ही ग्रुप लीडरसोबत आदल्या दिवशी संध्याकाळी मोहरी गावात पोहोचलो. एकूण पंधरा लोकांची बॅच होती. यात एक ६८ वर्षांचे तरुण होते अन् आम्ही दोघी महिला. ग्रुप लीडरने आम्हाला सूचना दिल्या आणि सेल्फ-अँकर (टेप स्लिंग आणि कॅराबिनेर), हार्नेस, डिसेंडर, हेल्मेट कसे घालायचे ते दाखवले. आमच्या शंकांचे निरसन केले. नंतर आम्ही जेवून झोपलो. .पहाटे नाश्ता करून सेल्फ-अँकर लावून आणि हेल्मेट घालून पावणे चारला ट्रेकला सुरुवात केली. आमच्या बॅगेत दोन लिटर पाणी, कोरडा खाऊ, पॅक्ड लंच, नॅपकिन, मिटन पेअर, डिसेंडर, हार्नेस होते व डोक्याला टॉर्च लावला होता. अंधारातून पटापट पावले उचलत आम्ही खाली बघत पुढे असणाऱ्या ट्रेकर्सच्या मागे मागे चालत होतो. मोहरी गावातून बोराट्याची नाळ गाठायला पाऊण तास लागला. बोराट्याची नाळ हा एक स्वतंत्र ट्रेक असतो, हे आम्हाला नंतर समजले. बोराट्याची नाळ सुरू झाल्यावर आमच्या लक्षात आले, की नाळेची ही वाट मोठमोठ्या दगडांची आणि खडतर आहे. एका ठिकाणी तर लोखंडी साखळीच्या साहाय्याने उतरावे लागले. नाळ उतरून लिंगाणा पायथ्याला यायला एक तास लागला. नंतर रायलिंगी पठाराला वळसा घालून कातळाला लावलेल्या लोखंडी वायरला सेल्फ-अँकर लावून पुढे जावे लागले. सगळेच नवीन होते अन् भन्नाटही!पायथ्याला आल्यावर बॅगेतील हार्नेस काढून अंगावर चढवले आणि ते लीडरकडून चेक करून घेतले. इथून पुढे टेक्निकल ट्रेकला सुरुवात झाली. सुरक्षित चढाई करताना सेल्फ-अँकर दोरीला लावूनच चढाई करायची, हे पक्के ध्यानात ठेवले होते. (ग्रुप लीडरने आदल्या दिवशी गडावर जाऊन दोरी लावली होती.) सरळ उभी चढाई असल्याने दमछाक होत होती. जिथे खडा कातळ असायचा, तिथे लीडर बिले लावून रोपला पकडून चढाई करायला सांगायचे, सूचना द्यायचे, त्यामुळे चढाई सोपी व्हायची. बोचरा वारा असल्याने नाकातून पाणी येत होते. गडावर जायची वाट अरुंद आणि दोन्ही बाजूला खोल दरी. दरी पाहून भीती वाटायची, पण डोंगरदऱ्या हेच तर सह्याद्रीचे सौंदर्य असेही वाटायचे. तेच तर पाहायला, अनुभवायला आपण आलो आहोत या विचाराने ऊर्जा मिळायची. .आम्ही छोट्या गुहेपाशी पोहोचलो तेव्हा मनमोहक सूर्योदय पाहायला मिळाला. डावीकडे असणारे पाण्याचे टाके मी पाहून आले, पण कांचन नको म्हणाली. थोडी विश्रांती घेतल्यावर पुन्हा ट्रेक चालू झाला. रॉक पॅच आला, की चढायला वेळ लागायचा. आमच्या बॅचमधील काही लोक दुसऱ्यांदा लिंगाणा ट्रेक करणारे होते. ते पक्के ट्रेकर्स होते, त्यामुळे ते पटापट चढायचे. खडा कातळसुद्धा जलद पार करायचे. तर काहींना दोराच्या साहाय्याने कातळ चढताना आधार द्यावा लागत होता. कारण त्यांना स्वतःचे शरीर वरच्या दिशेने ढकलण्यासाठी जोर लावणे अवघड जात होते. माझे वजन कमी असल्याने माझे काम थोडे सोपे होते.आम्ही जलद चढणारे ट्रेकर्स पुढे येऊन थांबायचो. ग्रुप लीडर इतर ट्रेकर्सना मदत करत असायचे. सगळ्यांना वर यायला वेळ लागायचा. आम्ही एका रॉक पॅचच्या खाली येऊन थांबलो आणि आजूबाजूच्या डोंगरदऱ्या पाहून सह्याद्रीच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागलो. भरपूर फोटो काढले. आम्हाला सुंदर रायलिंगी पठार पाहण्यासाठी वेळ मिळाला. या पठारावरून रायगड आणि लिंगाणा दिसतो म्हणून याला ‘रायलिंगी पठार’ म्हणतात. गंमत अशी झाली, की रायलिंगी पठारावर रात्री तंबूत राहिलेल्या लोकांचा तंबू वेगवान वाऱ्यामुळे उडून दरीत पडला होता. वरून ते काय आहे हे कळत नव्हते. बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर तो तंबू असल्याचे समजले. तो तंबू वारे येईल तसा वर वर जाऊ लागला. वारे इतके जास्त होते, की आम्हाला वाटले तंबू त्या लोकांपर्यंत वर जाईल. पण तसे काही घडले नाही. पण त्या तंबूमुळे आमचे बरेच मनोरंजन मात्र झाले. .मी जेव्हा कोणत्याही गडावर जाते, तेव्हा ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी मोठ्याने घोषणा देते. इथेही मी घोषणा दिली आणि सर्वांनाच सुंदर प्रतिध्वनी ऐकू आला. हा प्रतिध्वनी रायलिंगी पठारावर असणाऱ्या आमच्या ट्रेक आयोजकांनी ऐकला आणि त्यांनीही प्रतिसाद म्हणून घोषणा दिल्या. घोषणांचा घुमणारा आवाज सुखद होता.पुढे एका अवघड रॉक पॅचला झुलत्या शिडीवरून चढलो. त्यानंतरचा खडा कातळ पार करताना खूप दमछाक झाली. सुमारे तीन हजार फूट चढाई पूर्ण झाली. त्यापैकी एक हजार फूट टप्प्याटप्प्याने रॉक क्लाइंबिंग करून लिंगाणा सुळक्यावर पोहोचलो. तेव्हा कांचनला आणि मला जो आनंद झाला तो अवर्णनीयच! या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगडाचे दर्शन होते. खूप भारी वाटत होते आणि विश्वासच बसत नव्हता, की आपण या अवघड सुळक्यावर पोहोचलो!ट्रेक करताना वाऱ्याचा सामना करावा लागला. मला तर वाटायचे, की वाऱ्यामुळे मी उडूनच जाईन. आमच्या ग्रुपने सुरक्षिततेची पूर्ण दक्षता घेतल्याने मी निर्धास्त होते. उतरताना ज्या ठिकाणी रॅपलिंग करायचे होते तेथे लीडर सूचना देत. हळूहळू गड उतरत आम्ही गुहेपाशी आलो आणि जेवण केले. तिथे डावीकडे पाण्याचे टाके आहे. तिथून आमच्या सहट्रेकरने आम्हाला पाणी आणून दिले. गुहेत चक्क एक सायकल दिसली आम्हाला! ती सायकल तिथे कुणी, कशी आणि का आणली, हे आमचे प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिले. चार वाजेपर्यंत आम्ही पायथ्याला आलो. एकूण एक हजार फूट रॅपलिंग झाले होते. .आमच्यातील जलद चालणारे ट्रेकर्स दिसेनासे झाले, तेव्हा वाटले, की ते रायलिंगी पठारावर जाणार असावेत. आम्ही उरलेले ट्रेकर्स थकलो होतो, त्यामुळे आमची चाल निवांत होती. नंतर लक्षात आले अजून बोराट्याची नाळ चढायची आहे. नाळ पार करताना प्रश्न पडला की पहाटे अंधारातून आपण याच वाटेने आलो होतो का? मोठमोठ्या दगडधोंड्याची ती अवघड वाट. सांदण दरीसारखी.मोहरी गावात सातला पोहोचलो. जेवण तयारच होते. भाकरी, पिठले, मसूर, कढी, भात, लोणचे, पापड असे भरपेट जेवण करून परतीचा प्रवास चालू झाला. आम्ही दोघींनी ज्या ग्रुपसोबत लिंगाणा सुळका सर केला त्या ग्रुपचे आभारी आहोत. त्यांनी आमच्या सर्वांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली.वर्षभरात आम्ही दोघींनी देवकुंड, भीमाशंकर ते भोरगिरी, लिंग्या घाट, रायरेश्वर, केंजळगड, रोहिडा, तिकोना, लोहगड, सांदण दरी, सिंहगड, राजगड, रतनगड, वासोटा, आणि धोडप असे ट्रेक पूर्ण केले होते. मात्र लिंगाणा सर्वात कठीण आणि दमछाक करणारा ट्रेक होता, आणि त्याची चढाई अविस्मरणीय राहील यात शंकाच नाही.-------------.भारतात सेकंड हँड कार खरेदीचा ट्रेंड का वाढतोय? २०२३ या वर्षात झाली चक्क इतके टक्के वाढ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.