वाढप : ४-६ व्यक्तींसाठी
साहित्य -
अडीच वाट्या जाड पोहे, दीड वाटी साखर (साखर आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात), पाऊण वाटी पाणी, आवडीच्या सुकामेव्याचे तुकडे, तूप, वेलची पूड, खाण्याचा केशरी रंग.
कृती :
प्रथम पोहे तीन ते चार मिनिटे भाजून घ्यावेत. गार झाल्यावर ते मिक्सरमधून रवाळ वाटावेत. नेहमीच्या रव्याप्रमाणे असावेत. नंतर कढईत दोन ते चार चमचे तूप घालून त्यात सुकामेवा परतून घ्यावा. त्याच कढईत बारीक केलेले पोहे, थोडे तूप घालून दोन मिनिटे परतावे.
नंतर त्यात पाऊण वाटी पाणी घालून चांगले हलवावे. पाणी पूर्ण आटल्यावर त्यात साखर घालून परतावे आणि एकसारखे करावे. सुकामेवा, खाण्याचा केशरी रंग व वेलची पूड घालावी आणि मग शिरा सर्व्ह करावा.
वाढप : मध्यम आकाराचे १०-१५ वडे
साहित्य -
एक वाटी जाड पोहे, पाव वाटी चण्याचे पीठ, १ कांदा, कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, पाव वाटी खोवलेले ओले खोबरे, हळद, जिरे, मीठ, तेल, साखर.
कृती :
पोहे धुऊन घ्यावेत. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, हळद, जिरे पूड, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. चवीनुसार मीठ व साखर घालून मिश्रण एकजीव करावे. चण्याचे पीठ पोह्यात मिसळून दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालावे.
तयार झालेले मिश्रण चांगले एकत्र करावे. गरज पडल्यास थोडे पाणी घालावे. मिश्रण वडे करण्याइतपत घट्ट असावे. नंतर वडे थापून तळून घ्यावेत. एखाद्या चटणीबरोबर खायला द्यावेत.
वाढप - १५-२० चकल्या
साहित्य : दोन वाट्या जाड किंवा पातळ पोहे, चवीनुसार मीठ, तिखट, हिंग, प्रत्येकी १ चमचा धने व जिरे पूड, तेल, पाव वाटी दही, चिमूटभर साखर.
कृती
प्रथम पोहे स्वच्छ निवडून धुऊन ठेवावेत. नंतर त्यात मीठ, साखर, तिखट, हळद, हिंग, धने-जिरे पूड, दही घालून मिश्रण चांगले मळून घ्यावे. मळताना थोडे थोडे दही घालावे. गरज लागली तर थोडे गरम पाणी घालून मळावे. या पिठाच्या चकल्या करून तळाव्यात. चवीला छान लागतात, प्रवासात उपयोगी पडतात.
वाढप : ४-६ व्यक्तींसाठी
साहित्य : दोन वाट्या जाड पोहे, दीड वाटी हरभरा डाळ, ७-८ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, तेल.
कृती
हरभरा डाळ दोन ते तीन तास भिजत घालावी. भिजल्यावर ती वाटावी, वाटताना त्यात मिरच्या घालाव्यात. म्हणजे तिखटपणा चांगला येतो. नंतर पोहे भिजवून ते डाळीच्या पिठात घालावेत.
तयार मिश्रणात हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून पीठ मध्यम सैलसर भिजवावे. नंतर ते पीठ चांगले फेटावे व त्याची भजी करून तळावीत. ही भजी फार खुसखुशीत होतात.
वाढप : (पान शोभेसाठी) ६-८ व्यक्तींसाठी
साहित्य : एक वाटी जाड पोहे, अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, १ चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ व साखर, अर्धा चमचा जिरे, लहान लिंबाएवढी चिंच, चिंचेएवढा गूळ, थोडा हिंग.
कृती :
पोहे थोडे भाजून घ्यावेत. खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. हिंग थोडा गरम करून घ्यावा. नंतर बाकीचे सर्व जिन्नस पोह्यात घालून ते मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे. तयार चटणी डब्यात भरून ठेवावी. चांगली टिकते, प्रवासात उपयोगी पडते.
वाढप : ४-६ व्यक्तींसाठी
साहित्य : एक लिटर दूध, ४ चमचे तूप, दीड वाटी जाड पोहे, दीड वाटी साखर (आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात), आवडीच्या सुकामेव्याचे तुकडे, वेलची पूड, खाण्याचा केशरी रंग (ऐच्छिक).
कृती :
दूध चांगले तापवून घ्यावे. तापवल्यावर आलेली साय काढू नये. तुपावर सुकामेवा परतून घ्यावा. नंतर त्याच तुपावर पोहे मंदाग्नीवर परतून फुलवावेत. दूध पुन्हा गरम करावे. नंतर त्यात फुलवलेले पोहे, साखर, सुकामेवा, वेलची पावडर, खाण्याचा केशरी रंग घालून एक उकळी आणावी. खीर तयार! छान लागते.
वाढप : लहान आकाराचे २० ते २५ लाडू
साहित्य : अर्धा किलो जाड किंवा पातळ पोहे, २ वाट्या सुक्या खोबऱ्याचा कीस, १ वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खसखस, पाऊण किलो गूळ किंवा साखर, आवश्यक तेवढे तूप.
कृती :
खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे, खसखस, भाजून घ्यावे. पोहे तुपात तळून घ्यावेत. गूळ किंवा साखरेचा दोनतारी पाक करून त्यात तळलेले पोहे, दाणे, खोबरे, खसखस घालून एकसारखे कालवावे. तयार मिश्रणाचे लाडू वळावेत. हे लाडू डिंकाच्या लाडवांसारखे लागतात. पुष्कळ दिवस टिकतात.
वाढप : ६-८ उत्तप्पे
साहित्य : दीड वाटी जाड पोहे, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दही, १ वाटी पाणी, चवीनुसार मीठ, कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर आवडीप्रमाणे.
कृती :
प्रथम पोहे, बारीक रवा, दही, पाणी घालून मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घ्यावे. दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. चवीनुसार मीठ घालून पीठ चांगले घोटावे. मिश्रण फार घट्ट वाटल्यास त्यात गरजेनुसार पाणी घालावे. तयार पिठाचे नेहमी करतो त्याप्रमाणे उत्तप्पे करावेत. खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्यावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.