अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवसाची संध्याकाळ देशातल्या पक्षीप्रेमींसाठी एक चांगली बातमी घेऊन आली होती. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्यादिवशी तामिळनाडूतल्या नंजरायन आणि कालुवेली ह्या दोन पक्षी अभयारण्यांना आणि नर्मदेची उपनदी असणाऱ्या मध्य प्रदेशातल्या तवा नदीवरील जलाशयाला रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्याची घोषणा केली होती. भारतात आता पंचाऐंशी रामसर स्थळे आहेत आणि ह्या सगळ्या रामसर स्थळांनी मिळून साडेतेरा हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भूभाग व्यापला आहे.