सुहास किर्लोस्कर
अॅक्शन चित्रपटांमध्ये मारधाड, स्टंट असे प्रसंग असतात, तर क्राईम चित्रपटांमध्ये गुन्हा घडलेला असतो. हॉरर चित्रपटांचा उद्देश प्रेक्षकांना भीती दाखवण्याचा असतो, आणि पुढे येऊ घातलेल्या काळामध्ये काय होईल, अशी कल्पना करून वैज्ञानिकदृष्ट्या तर्कशुद्ध विचार करून केलेले चित्रपट सायन्स फिक्शनमध्ये मोडतात.
चित्रपट कोणत्या प्रकारचा आहे हे कशावर ठरते? प्रथमतः चित्रपटाची कथा काय आहे, त्यानुसार पटकथा लेखक -दिग्दर्शक चित्रपटाची हाताळणी कशी करावी, त्याचा वेग कसा असावा, प्रकाश योजना कशी असावी याबद्दल निर्णय घेतात. प्रेमकथा असेल तर तो चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकाची प्रेमकथा पाहण्याची मानसिक तयारी असते.
चित्रपटामधील प्रसंग कोणत्या काळात घडतो त्याचाही विचार चित्रपटाचे शूटिंग-संकलनाच्यावेळी केला जातो, तसाच प्रेक्षक कोणत्या काळातला आहे याचाही विचार चित्रपटाचे शूटिंग करताना केला जातो.
त्या तिथे, पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे... अशा पद्धतीचे गाणे सन २०००नंतरच्या चित्रपटामध्ये असणार नाही, किंवा जिथे सागरा, धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पहाते... असा प्रसंग आत्ताच्या चित्रपटात असणार नाही.
उदाहरणार्थ, २००२मध्ये देवदास हा चित्रपट केला त्यावेळी निर्मात्यांच्या डोळ्यांसमोर २००२ सालचे प्रेक्षक होते. १९३६चा (के एल सैगल) किंवा १९५५चा (दिलीपकुमार) देवदास बघणाऱ्या प्रेक्षकांचा विचार २००२मध्ये केलेला नसतो. असे असले तरीही चित्रपटांचे प्रकार फक्त चित्रपटाच्या कथेवर अवलंबून नसतात.
लगान, दंगल, रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क अशा चित्रपटांचा रंग मातकट असतो, तसा रंग हम दिल दे चुके सनम, प्रिटी वूमन किंवा ‘बॉण्ड’पटाला असणार नाही. अर्धसत्य, भोसले अशा चित्रपटांमध्ये अंधाराचे साम्राज्य ‘शोभून दिसते’ परंतु इन्व्हीक्टस, ऑल द प्रेसिडेंट्स मेनसारख्या चित्रपटामध्ये राष्ट्राध्यक्षांची केबिन, वृत्तपत्र कार्यालय इत्यादी ठिकाणी लख्ख प्रकाश नेमका परिणाम साधतो. सायको चित्रपटाचे पार्श्वसंगीत वेगळे आणि अपोलो-13 या चित्रपटाचे पार्श्वसंगीत वेगळे.
बॉर्न आयडेंटिटी चित्रपटाचा वेग अ ब्यूटिफुल माइंडला असणार नाही. जॅकी चॅन अभिनित रश अवर चित्रपटासारखे वेगवान संवाद द कराटे किड चित्रपटामध्ये शोभणार नाहीत, कारण वेगवान चित्रपटाचा उद्देश प्रेक्षकांना विचार करायला उसंत न देणे हा आहे तर द कराटे किडचा उद्देश प्रेक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा असा आहे. म्हणूनच चित्रपटाचा प्रकार बघून, त्याबद्दल माहिती घेऊन चित्रपट बघणे केव्हाही श्रेयस्कर.
अॅक्शन
अॅक्शन चित्रपटांमध्ये मारधाड, स्टंट, पाठलाग असे प्रसंग एकामागोमाग एक पडद्यावर येत राहतात. अरनॉल्ड अभिनित ट्रु लाईज किंवा सिल्व्हेस्टर स्टेलोन अभिनित रॅम्बो चित्रपट या प्रकारातील आहेत. ब्रूस ली, जॅकी चॅन यांच्या चित्रपटांमध्ये मार्शल आर्ट पद्धतीची अॅक्शन असते त्यामुळे अशा चित्रपटांना ‘वॉक्सा अॅक्शन’ म्हणतात.
पृथ्वीवर कोणते तरी संकट येणार अशा पद्धतीच्या संकल्पनेवर आधारित द डे आफ्टर टुमॉरोसारख्या चित्रपटांची वर्गवारी डिझास्टर अॅक्शन प्रकारामध्ये केली जाते. साहसी मोहीम हाती घेतलेले लॉरेन्स ऑफ अरेबियासारखे चित्रपट ‘अॅडव्हेन्चर अॅक्शन’ असतात.
लष्करी कारवायांवरील प्रहार, द हर्ट लॉकर अशा चित्रपटांची गणना ‘मिलिटरी अॅक्शन’मध्ये केली जाते. बॉण्डपटांना ‘हेरगिरी’चे चित्रपट (Espionage) म्हणतात. जॉन वू, रिंगो लॅम दिग्दर्शित हॉंग कॉंग अॅक्शन चित्रपटांमध्ये कुंग फू ऐवजी बंदुकांचा वापर केल्यामुळे भयानक रक्तपात होत असतो. अशा चित्रपटांची वर्गवारी ‘हिरॉइक ब्लडशेड’मध्ये केली जाते. स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन अशी पात्रे असलेले चित्रपट सुपरहीरोंचे अॅक्शनपट असतात. एकूणच अॅक्शन चित्रपटांमधील वर्गवारी जाणून घेतल्यास पुढे काय वाढून ठेवलेले असेल, याची कल्पना येते. मात्र मार्टिन स्कोर्सेसी आणि क्वान्टीन टोरंटीनो दिग्दर्शित चित्रपटांची वर्गवारी निव्वळ अॅक्शनपटांमध्ये करणे गैर आहे.
क्राईम
अॅक्शन आणि क्राईम चित्रपटांमध्ये फरक असतो. क्राईम चित्रपटांमध्ये गुन्हा घडतो, त्याच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांना समजतात, परंतु त्यात कायदेशीर काय, बेकायदेशीर काय याबद्दल न्यायव्यवस्थेच्या अनुषंगाने चर्चा होत नसते. मार्टिन स्क्रॉर्सेसी दिग्दर्शित टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटामध्ये गुन्हेगाराच्या मानसिकतेचा मागोवा घेतला आहे.
ओशन्स इलेव्हनसारख्या केपर क्राईम चित्रपटांमध्ये दरोडा घालण्याचे नियोजन आणि त्याबरहुकूम प्रत्यक्ष दरोडा दिसतो. अशा चित्रपटांमध्ये खून-हाणामारीपेक्षा त्या कटांची आखणी आणि त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आखलेल्या योजना यामध्ये प्रेक्षकाला गुंतवून ठेवले जाते.
बेव्हर्ली हिल्स कॉप्स; त्यावर आधारित जलवा, हिटसारख्या चित्रपटांमध्ये गुन्हेगार आणि पोलिस यांच्यामधील उंदीर-मांजराचा खेळ रंगतदारपणे दाखवला जातो. वक्त, अ टाइम टू किलसारख्या चित्रपटांमध्ये कोर्टरूम ड्रामा आणि क्राईम यांचा संगम घडलेला दिसतो. एखादा गुन्हा /गुन्ह्यांची मालिका घडल्यावर त्याचा गुप्तहेरांकडून होणारा तपास दाखवणारे मनोरमा सिक्स फिट अंडरसारखे चित्रपट भारतामध्ये कमी तयार होतात कारण आपल्याकडे गुप्तहेर नेमण्याचे प्रमाण फार कमी आहे.
तलवारसारख्या चित्रपटांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने तपास केला जातो त्याला प्रोसिजरल क्राईम म्हणतात. तलवार चित्रपटामध्ये राशोमान पद्धतीप्रमाणे एकाच प्रसंग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दाखवला आहे.
प्रेक्षकांना भीती दाखवणे हा हॉरर चित्रपटांचा उद्देश असला तरीही भीती दाखवण्यासाठी पार्श्वसंगीत आणि धक्का तंत्राचा वापर अधिक केल्याचे जाणवते. ‘डरना मना है’ हे माहीत असूनही प्रेक्षक ‘डरना जरूरी है’ आविर्भावात अशा चित्रपटांना गर्दी करतात, हे विशेष. भुताची भीती (पोल्टरगीस्ट, द कॉज्युरिंग), राक्षसाची भीती (किंग कॉंग, जॉज, प्रिडेटर), माणसाचा कोल्हा होण्याची भीती (वूल्फ), माणसाचे रूपांतर रक्तशोषक वटवाघळात/ भुतामध्ये होण्याची भीती (ड्रॅक्युला), अज्ञात शक्तीची भीती (इव्हिल डेड), झोंबी (आय ॲम लिजंड), सीसीटीव्हीमध्ये शूट झालेले भीतीदायक प्रसंग (फाउंड फुटेज – पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी) असे भीतीदायक चित्रपटांचे अनेक प्रकार आहेत. धारदार हत्याराने चित्रपटातील पात्रांच्या एकामागोमाग एक होणाऱ्या हत्या दाखवणाऱ्या सायको, द आयडेंटिटी, फ्रायडे द थर्टिन्थसारख्या चित्रपटांची स्लॅशर हॉररमध्ये गणना होते.
पुढे येऊ घातलेल्या काळामध्ये काय होईल, मंगळावर माणूस गेला तर काय होईल अशी कल्पना करून वैज्ञानिकदृष्ट्या तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून तयार केलेल्या चित्रपटांना साय-फाय म्हणजेच सायन्स फिक्शन म्हणतात. चित्रपट ही कलाच मुळात विज्ञानाचा आविष्कार आहे. त्यामुळे विज्ञान आणि बदलत्या तंत्रज्ञानाचे चित्रपटाशी दृढ नाते आहे. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञान या विषयावर काढलेले चित्रपट भविष्यावर भाष्य करतात.
काँटजीअन हा २०११मध्ये रिलीज झालेला चित्रपट एखादा आजार झाल्यामुळे घराबाहेर पडण्यावर बंदी आली तर काय होईल अशा संकल्पनेवर तयार झाला होता. याचे वर्गीकरण साय-फाय-डिझास्टर चित्रपटामध्ये करता येईल. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही वर्षांनी कोरोनामुळे जगभरातील व्यवहार ठप्प झाले, त्यावेळी अनेकांना या चित्रपटाची आठवण झाली होती.
अंतराळामध्ये सफर करणे (स्टार ट्रेक, स्टार वॉर्स, इंटरस्टेलर), भविष्यकाळामध्ये प्रवास करून पुन्हा वर्तमानकाळामध्ये येण्याचा प्रयत्न करणे (बॅक टू द फ्युचर, इंटरस्टेलर, अॅव्हेंजर्स ःएण्डगेम), परग्रहावरील जीव (एलियन, ई.टी.), मिलिटरी साय फाय (अरायव्हल, इंडिपेंडन्स डे, प्रिडेटर), भविष्यकाळात घडणाऱ्या भयंकर घटनांमुळे पृथ्वीतलावर काय होईल याचा कल्पनाविलास असलेले चित्रपट अपोकॅलिप्टिक साय फाय (द मार्शियन, द डे आफ्टर टुमॉरो)असे काही प्रकार सायन्स फिक्शन चित्रपटांचे आहेत. भविष्यातील जग हे आदर्शवादी असू शकेल किंवा सर्वांना माणसाने केलेल्या प्रदूषणासारख्या अनेक कुकर्माची फळे भोगावी लागतील असा विचार करून तयार केलेल्या चित्रपटांना अनुक्रमे युटोपियन आणि डिस्टोपियन (Utopian – Dystopian) म्हणतात.
मायनॉरिटी रिपोर्ट, हर, द ट्रुमन शो, टोटल रिकॉल असे चित्रपट या प्रकारातील आहेत. विज्ञानाने लावलेल्या शोधामुळे मानवाला कोणत्या संकटास तोंड द्यावे लागणार आहे याचा विचार करून तयार केलेल्या ए.आय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मॅट्रिक्ससारख्या चित्रपटांना सायबरपंक साय-फाय चित्रपट म्हणतात. एकोणिसाव्या शतकामध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. त्यामुळे माणसाच्या जीवनावर काय परिणाम झाले, त्या अनुषंगाने पुढे काय बदल होतील याचा मागोवा घेतलेल्या ह्युगो, द प्रेस्टीज सारख्या चित्रपटांना स्टीमपंक असेही म्हटले जाते.
फँटसी
स्वप्नरंजन हा फँटसीचा एक प्रकार आहे. सत्य परिस्थितीला बगल देऊन अशक्य ते शक्य करून दाखवणे, जादूच्या झाडूवर बसून जगभर प्रवास करणे, अदृश्य होणे किंवा इच्छित स्थळी प्रकट होणे असे प्रकार फँटसी चित्रपटामध्ये सर्रास दिसतात.
आत्ताच्या युगातील फँटसी (हॅरी पॉटर चित्रपटमालिका), डार्क फँटसी (पॅन्स लॅबरीन्थ), हाय फँटसी (लॉर्ड ऑफ द रिंग्ज), पौराणिक चित्रपट किंवा आजच्या काळामध्ये ‘देव जरी मज कधी भेटला’ अशी फँटसी (ब्रूस ऑलमाईटी) असू शकते. लाइफ ऑफ पाय हा चित्रपट फँटसी असला तरीही पाय पटेल (इरफान खान) ज्या पद्धतीने कथेचा शेवट सांगतो तो लक्षपूर्वक ऐकल्यास फँटसी आणि सत्य परिस्थिती यामधील सीमारेषा धूसर होते, असे जाणवते.
ड्रामा
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी नाट्यमय प्रसंग आलेले असतात. अशा नाट्यमय प्रसंगांवर चित्रपट तयार होऊ शकतो. अर्थात कोणत्याही कथेमध्ये नाट्यमयताच नसेल तर ती कथा दोन तास लक्षपूर्वक बघितली जाणार नाही. मात्र वरील चित्रपट प्रकाराव्यतिरिक्त ड्रामा हा प्रकार पूर्णतः वेगळा आहे. चित्रपट बघताना डोळ्यात पाणी आणणारे हृदयद्रावक प्रसंग अधिक असल्यास त्याला मेलो-ड्रामा म्हणतात.
पूर्वीचे बरेच मराठी-हिंदी चित्रपट या प्रकाराचे होते. बॅबल, रेन मॅन, मिलियन डॉलर बेबी असे काही उत्कृष्ट मेलोड्रामा वारंवार बघण्यासारखे आहेत. मेडिकल ड्रामा (पॅच अॅडम्स आणि त्यावर आधारित मुन्नाभाई एमबीबीएस), लीगल ड्रामा (द फर्म, जॉली एलएलबी), पोलिटिकल ड्रामा (द पोस्ट, इन्व्हीक्टस, ऑफिशियल सिक्रेट्स), फिलॉसॉफीकल ड्रामा (द शॉशँक रिडम्प्शन) असे उपप्रकार ड्रामा चित्रपटामध्ये आहेत.
हिचकॉकचे अनेक चित्रपट उत्तम मिस्ट्री ड्रामा आहेत. कॅप्टन फिलिप्स सारखे चित्रपट उत्तम डॉक्युमेंटरी ड्रामा आहेत ज्यामध्ये घडलेल्या प्रसंगाचे चित्रीकरण नाट्यमयरित्या दाखवले आहे. अनेक मराठी, हिंदी चित्रपटांची नावे यामध्ये दिलेली नाहीत कारण भारतीय चित्रपटांमध्ये विषय आणि चित्रपट प्रकाराशी बांधिलकी पूर्ण चित्रपटामध्ये कायम राखली जातेच असं नाही.
थ्रिलर
चित्रपटातील गूढ उकलण्याकरिता प्रेक्षकांची उत्सुकता उत्तरोत्तर वाढत राहते आणि प्रेक्षक त्यामध्ये उत्सुकतेने गुंतून राहतात अशा चित्रपटांना थ्रिलर म्हणता येईल. चित्रपटामधील पात्रांच्या मानसिक अवस्थेचा वेध घेणाऱ्या गूढ चित्रपटाला सायकॉलॉजिकल थ्रिलर म्हणता येईल. डबल जिओपार्डी, त्यावर आधारित एक हसीना थी, द शायनिंग, द सायलेन्स ऑफ द लँब्ज असे अनेक उत्तम सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहेत.
एखादे गूढ उकलण्यासंबंधी चित्रपटांना मिस्ट्री थ्रिलर म्हणतात ज्यामध्ये मनोज नाईट श्यामालन दिग्दर्शित द सिक्स्थ सेन्स, साइन्स, आकिरा कुरोसावा दिग्दर्शित राशोमान या चित्रपटांचा अंतर्भाव होतो. कट कारस्थानाचा उलगडा करणारे स्पॉटलाईट, द पेलीकन ब्रीफ, अ फ्यू गुड मेन असे चित्रपट ‘कॉन्स्पिरसी थ्रिलर’ आहेत.
भूतबाधीत व्यक्तीचा मागोवा घेऊन ते गूढ उकलण्याचा प्रयत्न द एक्झॉर्सिस्ट चित्रपटामध्ये केला आणि त्या चित्रपटाने सुपर नॅचरल हॉरर थ्रिलर चित्रपटांचा एक मानदंड प्रस्थापित केला. बिहाइंड एनिमी लाइन्स, सोर्स कोड, सर्चिंग अशा थ्रिलर चित्रपटांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात केलेला दिसतो, त्याला टेक्नो-थ्रिलर म्हणतात. हे चित्रपट बघण्यासाठी थोडेफार कॉम्प्युटर तंत्र माहीत असणे गरजेचे असते.
ऐतिहासिक आणि न्वार चित्रपट प्रकारांची ओळख पुढील लेखामध्ये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.