पृथ्वीवर असा एक प्रदेश जिथे ३०० दिवस विजेची वादळे होतात

catatumbo lightning
catatumbo lightningSaptahik Sakal
Updated on
Summary

व्हेनेझुवेलातील आकाशात सातत्याने दिसणारा विजेचा आविष्कार अनेक दर्यावर्दी लोकांना मार्गदर्शक म्हणूनही उपयोगाला येत असतो. त्याच्या साहाय्याने समुद्रावर प्रवास करण्याचे मार्ग नक्की करणे सोपे जाते असा या भागातल्या दर्यावर्दींचा दावा आहे! मारकैबो सरोवराच्या आजूबाजूच्या विस्तृत परिसरातून ह्या विजा नेहमी दिसत असल्यामुळे त्यांना ‘मारकैबोचा दीपस्तंभ’ असे म्हटले जाते.

डॉ. श्रीकांत कार्लेकर

आपल्या पृथ्वीवर असा एक प्रदेश आहे जिथे वर्षातल्या १५० ते १८० रात्री म्हणजे वर्षातले पाच ते सहा महिने सतत आकाशातील ढगांत विजा चमकत असतात आणि वर्षातल्या ३६५ पैकी ३०० दिवस विजेची वादळे (Lightning Storms) होतात! ढगात तयार होणाऱ्या या विजेचा वेग आणि वारंवारिता हे एक मोठे नवलच आहे. दर दिवशी १० तास आणि दर तासाला २८० वेळा दिसणाऱ्या या विजा ही दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुवेला प्रांतात दिसणारी एक विलक्षण वातावरणीय घटना आहे.

व्हेनेझुवेलातील मारकैबो तलावाला उत्तर कोलंबियात उगम पावणारी कॅटाटुम्बो नदी जिथे मिळते तिथे नदीच्या मुखाच्या प्रदेशावर आणि केवळ तिथेच ही वातावरणीय घटना घडते आणि म्हणूनच जगभरात त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आढळून येते. कॅटाटुम्बो (Catatumbo) नदीच्या नावावरून याला कॅटाटुम्बो लाइटनिंग असे म्हटले जाते.

या विवक्षित भागांतच इतक्या सातत्याने अशा विजा का दिसतात याची अनेक कारणे आजपर्यंत हवामान शास्त्रज्ञांकडून  दिली गेली आहेत. कॅटाटुम्बो नदी जिथे मारकैबो सरोवराला मिळते तिथे एक विस्तृत असा दलदलीचा प्रदेश (Bog) तयार झाला आहे. त्यापासून एक हजार मीटर उंचीवर नेहमीच वादळी ढग तयार होत असतात. त्यामुळेच त्यात सतत वीज निर्माण होत असावी, असे अनेकांना वाटते.

मात्र ही संकल्पना अनेक हवामान तज्ज्ञांना मान्य नाही. सर्वच मोठ्या वादळांत विजेची वादळे (Thunderstorms) दिसतात. ती आणि त्यावेळी विजेला दिसणारा नारिंगी, पिवळा व तपकिरी रंग ही इथल्या विजेची वैशिष्ट्ये आहेत, असा दावा केला जातो. पण तेही  तितकेसे बरोबर नाही कारण जगात इतरत्र दिसणाऱ्या वादळांतही हे गुण आढळतात. ही वीज एका विशिष्ट भागातच जवळजवळ रोजच तयार होत असते, हे मारकैबो तलावाच्या प्रदेशातील या वीजयुक्त वादळाचे वैशिष्ट्य आहे!

स्थानिक भूरूपिकी (Geomorphology) आणि नजीकच्या समुद्राचे हवामान या घटकांचा त्यात अर्थातच मोठा वाटा आहे. नवीन संशोधनातून असेही लक्षात आले आहे, की वर्षभरात वीज तयार होण्याच्या वारंवारितेत जसा बदल होत जातो तशी वेगवेगळ्या वर्षांत त्याची संख्याही कमी जास्त होत असते.

वर्ष २०१०मध्ये जानेवारी ते मार्च या काळांत या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळात ही वीज एकदाही दिसली नव्हती. त्यामुळे ती कायमचीच नाहीशी झाली असावी अशी शंकाही व्यक्त करण्यात आली होती.

आकाशात सातत्याने दिसणारा हा विजेचा आविष्कार अनेक दर्यावर्दी लोकांना मार्गदर्शक म्हणूनही उपयोगाला येत असतो. त्याच्या साहाय्याने समुद्रावर प्रवास करण्याचे मार्ग नक्की करणे सोपे जाते असा इथल्या समुद्रावर भ्रमण करणाऱ्या दर्यावर्दींचा दावा आहे! मारकैबो सरोवराच्या आजूबाजूच्या विस्तृत परिसरातून ह्या विजा नेहमी दिसत असल्यामुळे त्यांना ‘मारकैबोचा दीपस्तंभ’ असे म्हटले जाते.

catatumbo lightning
Africa Splitting : आफ्रिकेतील जमिन दुभंगतेय? निसर्गाच्या इच्छेचा थरारक व्हिडीओ!

या विजेचे विवक्षित क्षेत्र साडेआठ अंश उत्तर अक्षांश व ७१ अंश पश्चिम रेखांश आणि पावणेदहा अंश उत्तर अक्षांश व ७३ अंश पश्चिम रेखांश असे आहे. आजूबाजूला असलेल्या पेरीजा पर्वत (उंची २,५५६ मीटर) आणि मेरीडा  पर्वत (२,६६० मीटर) यांनी बंदिस्त केलेल्या सपाट मैदानी प्रदेशावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचाही या वीज निर्मितीत मोठा वाटा आहे. या प्रदेशावर तयार झालेल्या ढगांची उभ्या दिशेने वाढ होते व त्यांत सहजगत्या वीज निर्माण होते.

सततच्या वीज निर्मितीमुळे या प्रदेशावरच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर ओझोन तयार होतो. नवीन संशोधनानुसार या वीज निर्मितीची दलदलीच्या प्रदेशांत तीन केंद्रस्थाने आहेत.

नेल्सन फाल्कन या शास्त्रज्ञाच्या मते, इथल्या दलदलीच्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर तयार होणारा मिथेन वायू आणि तेलयुक्त अवसाद यामुळेही ढगांत वीज निर्माण व्हायला आणि त्यांत विशिष्ट रंग दिसायला मदत होते.

मारकैबो खोऱ्याच्या अंतरंगात पृष्ठभागाखाली विस्तृत असे तेलक्षेत्र (Oilfield) आहे आणि मूळ खडकांत (Bed Rock) युरेनियम आहे. त्यामुळेही इथला रोजचा विजेचा आविष्कार रंगीबेरंगी दिसत असावा.

दरवर्षी पावसाळ्यात कोसळणाऱ्या विजा ही एक फार मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी माणसाच्या प्रयत्नांच्या आवाक्याबाहेर असलेली घटना वाटावी इतके ह्या विजेचे भयंकर रूप असते.

catatumbo lightning
Electric Vehicles Care : पावसाळ्यात Electric गाड्यांची काळजी कशी घ्यायची?

आकाशातून कोसळणारी वीज हा अतिशय शीघ्र गतीने वाहणारा विद्युतभारीत कणांचा प्रवाह असतो. तो दर सेकंदाला शंभर वेळा पृथ्वीवर येतो, असा पूर्वीचा अंदाज होता.

आज या विजेची नोंद करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांमुळे ही वारंवारिता सेकंदाला केवळ ४० ते ५० इतकीच असल्याचे  लक्षात आले आहे. पृथ्वीभोवतालच्या वातावरणात तयार झालेल्या पर्जन्य मेघांकडून निमिषार्धात हा प्रवाह जमिनीकडे झेपावतो!

पृथ्वीवर कोसळणाऱ्या नैसर्गिक विजांचे वितरण खूपच असमान आहे. विजांच्या ७० टक्के घटना भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात घडतात. कारण पृथ्वीच्या याच भागात जास्तीत जास्त वादळे  होतात व प्रचंड झंझावाती ढगांची निर्मिती होते.

नैसर्गिकरित्या विजा निर्माण होताना विस्तृत प्रदेशात विद्युत चुंबकीय प्रारणे (Electromagnetic Radiations ) तयार होतात. विजेचे उत्सर्जन जिथे होत असते अशी अनेक ठिकाणे या प्रारणामुळे शोधता येतात. अमेरिकेत संपूर्ण देशात वीज उत्सर्जनाची अशी ठिकाणे शोधून त्याचे एक जाळेच तयार करण्यात आले आहे.

ह्या विजेची अनिश्चितता हा या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार वीज कोसळण्याची शक्यता असलेली वीजप्रवण ठिकाणे सांगता येत असली तरी त्याच ठिकाणी नेहमी वीज पडेल याची शक्यताही फारच कमी!

ह्या आपत्तीची संभाव्य ठिकाणे शोधण्यासाठी आपत्तीचे नेमके स्वरूप कळणे फार महत्त्वाचे असते. आकाशातील विजेचा हा लोळ ताशी २ लक्ष २० हजार किलोमीटर वेगाने प्रवास करतो. याचे तापमान ३० हजार अंश सेल्सिअस इतके प्रचंड असते.

विजेचे हे लोळ तयार होण्यापूर्वी, अतिविशाल अशा पर्जन्य ढगात विद्युतभाराचे वितरण झालेले असते. वर जाणाऱ्या उबदार हवेत धनविद्युत भारीत अणुकेंद्रे  ढगांच्या माथ्याकडे जाऊन स्थिरावतात. त्यामुळे ढगांच्या पायथ्याकडे ऋणभाराचे प्राबल्य वाढते.

पृथ्वीच्या पृष्ठभागापाशी म्हणजे जमिनीवर असलेला धनभार व ढगांच्या तळाशी असलेला ऋणभार यात आकर्षण निर्माण होऊन विजेचा लोळ तयार होतो  व पृथ्वीवर प्रचंड वेगाने उतरतो. या बरोबरच गडगडाटी आवाजही होतो.

हवेची आर्द्रता, वारे, घर्षण, वायूभार याबरोबरच सौरवाऱ्यांचा  परिणाम आणि विद्युतभारीत सौरकणांचे एकत्रीकरण अशा अनेक घटकांचा या प्रक्रियेत विचार करावा लागतो. ढगांतील हिमकणांमुळे धन व ऋण विद्युतभाराचे पृथक्करण होते व त्यामुळे ही वीज निर्माण होते.

खाली येताना या लोळाच्या अनेक उपशाखा तयार होतात. पृथ्वीच्या जवळ विद्युत प्रवाहांचे प्राबल्य क्षेत्र वाढते. यामुळेच झाडे, मनोरे, उंच इमारती यातून हा लोळ झपाट्याने खाली येतो. याच वेळी आजूबाजूच्या हवेतही विद्युतवहनास अनुकूल असे अनेक प्रदेश तयार होतात.

विद्युतवहन मार्गांचे तापमान एकदम वाढून हवेचे प्रसरण होते. या प्रक्रियेतील कंपन एवढे तीव्र असते, की त्यातून गडगडाटी आवाज निर्माण होतो.

एका विद्युत लोळात कमीत कमी तीन उपप्रवाह असतातच. वातावरणातील विजेच्या प्रत्येक आविष्कारात ४० ते ५० मिलीसेकंदांचे अंतर असते. या सर्व घटकांचा विचार करून वीज कोसळण्याच्या ठिकाणांचा अंदाज करता येतो. मात्र हा केवळ अंदाजच असतो आणि तो चुकण्याची शक्यता जास्त असते!

कॅटाटुम्बो लाइटनिंग ही कॅटाटुम्बो नदीच्या मुखावर उद्‍भवणारी एक वातावरणीय घटना आहे आणि ती व्हेनेझुएलामधील माराकैबो सरोवरात संपते. ‘बारी’ लोकांच्या भाषेत कॅटाटुम्बोचा अर्थ ‘हाऊस ऑफ थंडर’ म्हणजे ‘गडगडाटाचे घर’ असा आहे.

माराकाइबो तलावाच्या परिसरातील विजेचा काही महिने अगोदर अंदाज लावणे शक्य आहे, असे २०१६च्या एका अभ्यासात दिसून आले आहे. वारा आणि  संभाव्य ऊर्जेच्या  निर्देशांकावर आधारित केलेले अंदाज अधिक अचूक असतात. मात्र इथे पडणाऱ्या विजेची वारंवारता वर्षभर बदलते आणि ती वर्षानुवर्षे वेगवेगळी असते, असेही दिसून आले आहे.

या क्षेत्राची वीज कोसळण्याची घनता २३२.५२ आहे. याचा अर्थ असा, की या भागात प्रति चौरस किलोमीटर प्रति वर्ष सरासरी २३२.५२ वेळा वीज कोसळते.

वीजकोसळण्याच्यासंदर्भात  दुसऱ्याआणितिसऱ्यास्थानावरअसलेल्याकाबरे (काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक) आणिकॅम्पेन (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) याठिकाणांची वीज कोसळण्याची घनता अनुक्रमे २०५.३आणि १७६.१आहे. व्हेनेझुएला आणि डेमोक्रॅटिकरिपब्लिकऑफकाँगोव्यतिरिक्त, कोलंबिया आणि कॅमेरूनमधील स्थाने जगातील टॉप टेन लाइटनिंग हॉटस्पॉटमध्येआहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.