“तुम्हाला पॉपकॉर्न आवडतात?” हा प्रश्न आज समजा कुठल्याही मल्टिप्लेक्समध्ये किंवा मुंबईच्या खऱ्याखऱ्या आणि बाकी गावोगावच्या नुसत्याच चौपाट्यांवर टाइमपास करताना बाकीच्या टाइमपास करणाऱ्यांना विचारला, तर “हा काय प्रश्न (झाला)?” अशी(च) प्रतिक्रिया विनाविलंब मिळेल.
खाद्योद्योगात अनेक खाद्यपदार्थांच्या तुलनेत कानामागून येऊन तिखट (किंवा सॉल्टी, चिजी, स्पायसी, लेमन आणि चॉकलेट फ्लेवर्डही) झालेला पॉपकॉर्न नावाचा पदार्थ घटकाभराच्या आनंदभरल्या मनोरंजनात आणि क्वचित एकटेपणातही आपल्याला ‘चवीने’ साथही देतो खरा, पण अगदी पॉपकॉर्नच्या डाय-हार्ड चाहत्यांच्या लेखीही पॉपकॉर्न या शब्दाचा खरा अर्थ एकच – माकडखाणे, निव्वळ टाइमपास. (म्हणूनच बहुधा पिटातल्या प्रेक्षकांच्या अभिरुचीला सुखावणाऱ्या चित्रपटांची संभावना ‘पॉपकॉर्न मूव्हीज’ अशी केली जाते.)
मग पॉपकॉर्नचे तुमच्या-आमच्या मेंदूशी काय नाते आहे? हातात येण्याआधी तडतड करत आपल्या रुचिकलिका उद्दीपित करण्याऱ्या पॉपकॉर्नची तुलना आता एका लाइफस्टाइल डिसिजबरोबर होते आहे.
सोशल मीडियाच्या अतिवापराच्या दुष्परिणामांबद्दल सातत्याने सावधानतेचा इशारा देणारे जगभरातले सर्व तज्ज्ञ आता कुठल्याही मार्गाने इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला पॉपकॉर्न ब्रेनपासून सावध राहण्याचे इशारे देत आहेत.