संपादकीय
एमिली वॅप्निकची आणि आपल्यापैकी बहुतेकांची ओळख असण्याची शक्यता कमी आहे. टेड टॉक्स ऐकणाऱ्यांनी कदाचित हे नाव ऐकलं असेल. ही कॅनेडियन लेखिका, उद्योजिका. तिच्या टेड टॉकमध्ये मध्यंतरी तिनं एक कल्पना मांडली- मल्टिपोटेन्शिअलाइट असण्याची.
‘मोठी झाल्यावर कोण व्हायचंय/ काय व्हायचंय?’ या प्रश्नाचं उत्तर मला कधीच देता आलं नाही, असं एमिली सांगते. तिच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘खूप गोष्टी आवडायच्या. खूप गोष्टी करूनही बघितल्या.
एखादं काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यात पूर्णपणे झोकून दिलं जायचं, मग अगदी तळाशी गेल्यावर त्यातलं आव्हान संपल्यासारखं व्हायचं. मग... दुसरं काहीतरी. मग... त्यातलंही आव्हान संपून जायचं. मग... आणखी काहीतरी.’
एमिलीच्या मते मानवी स्वभावाचा हा भाग दुर्मीळ असतो, पण असतो; सापडतो बऱ्याचदा. खूप साऱ्या गोष्टी झोकून देऊन आणि अगदी समर्थपणे करणाऱ्यांना ती मल्टिपोटेन्शिअलाइट– बहुक्षमतावान म्हणते.
आणि बहुक्षमतावान असणे म्हणजे नुसताच एक ना धड...चा प्रकार नाहीये, तर एमिलीच्या मते ह्या बहुक्षमतानिष्णाततेमध्ये तीन गोष्टी असायला हव्यात– कल्पनासंयोग (आयडिया सिंथेसिस), रॅपिड लर्निंग (नवे काहीही विनाविलंब शिकणे) आणि अॅडॅप्टॅबिलिटी (नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे).