अरविंद परांजपे
नेपच्यूनच्या शोधानंतर अनेक खगोल निरीक्षक त्याही पलीकडे असू शकणाऱ्या अज्ञात ग्रहाचा शोध घेऊ लागले होते. या ‘प्लॅनेट एक्स’साठी सुरू केलेल्या शोधाला यश आले ते १८ फेब्रुवारी १९३० या दिवशी. या नव्या ग्रहामुळे आपली सूर्यमाला आता नऊ ग्रहांची झाली होती.
विल्यम हर्शेल या इंग्लंडच्या खगोलशास्त्रज्ञाला १३ मार्च १७८१ या दिवशी एका नवीन खगोलीय पदार्थाचा शोध लागला आणि तो शनीच्या पलीकडे असलेला एक ग्रह आहे हे सिद्ध झाले.
त्या नव्या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर टीटीयस-बोडच्या नियमाप्रमाणे बरोबर जुळत होते. त्या ग्रहाला युरेनस हे नाव देण्यात आले, हे आपण गेल्या लेखात बघितले. (टीटीयस-बोडचा नियम –सकाळ साप्ताहिक –प्रसिद्धीः १३ जानेवारी २०२४)
खरेतर युरेनस आपल्याला दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकतो. पण अगदी जेमतेम. हर्शेलच्या आधी युरेनस अनेकांनी बघितला होता, हे नंतर लक्षात आले.
गॅलिलियोच्या निरीक्षणांत याची नोंद सापडते. पण युरेनसची पृथ्वीवरून दिसणारी गती इतकी मंद आहे, की हा एक ताराच आहे असाच समज होता. आणि आपल्याला माहीत असलेल्या ग्रहांच्या व्यतिरिक्त आणखी एखादा ग्रह असू शकेल हा विचार तसाही कोणाच्या डोक्यात फारसा आला नव्हता.
पण युरेनसच्या शोधानंतर अनेकांनी त्याचा वेध घेण्यास सुरुवात केली आणि एक नवीन समस्या समोर आली. निरीक्षणांच्या आधारे जेव्हा युरेनसच्या कक्षेचे गणित मांडण्याचा प्रयत्न होऊ लागला तेव्हा कितीही आकडेमोड केली तरी त्याच्या कक्षेचे गणित सुटत नव्हते.
युरेनसच्या कक्षेचे गणित आणि प्रत्यक्ष निरीक्षण यात ताळमेळ बसत नव्हता. म्हणजे आज रात्री युरेनस अमुक ताऱ्याच्या जवळ दिसेल असे गणिताच्या आधारे सांगावे, पण प्रत्यक्षात मात्र तो भाकीत केलेल्या जागेपासून दूरच असायचा.
भविष्यात हा ग्रह कोणकोणत्या जागी दिसू शकतो याचे भाकीत करण्याकरिता गणितज्ञानी ग्रहांच्या गुरुत्वीय बलांचाही विचार केला होता.
गणितज्ञ इतके हताश झाले होते, की न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत अजून कदाचित पूर्णत्वाला गेलेला नसावा, असे त्यांना वाटू लागले.
इंग्लंडमध्ये जॉन कूच अॅडम्स (John Couch Adams, 1819-92) आणि फ्रान्समध्ये अर्बन ल’व्हेरिये (Urbain Le Verrier, 1811-77) यांनी स्वतंत्रपणे एक वेगळा विचार केला.
समजा युरेनसच्या पलीकडे एखादा ग्रह असेल तर त्याच्या गुरुत्वीय बलाचा परिणाम स्वाभाविकपणे युरेनस आणि त्याच्या कक्षेवर होणार. त्यामुळे युरेनसच्या जागेतही बदल होणार.
जर आपल्याला युरेनसच्या जागेत बदल होताना दिसत आहे तर तो बदल घडवणारा ग्रह कसा आणि कुठे असेल हे आपल्याला उलट गणित मांडून काढता आले पाहिजे.
असा विचार करून त्यांनी युरेनसच्या कक्षेत बदल करणाऱ्या त्या अज्ञात ग्रहाचा गणितीय शोध घेण्याचे ठरवले.
अॅडम्स एक तरुण गणितज्ञ होता. १८४३मध्ये तो केंब्रिजची ट्रापॉझ परीक्षा सीनियर रँग्लर म्हणून पास झाला होता. युरेनसच्या पलीकडे जर एखादा ग्रह असेल तर तो वेगवेगळ्या तारखांना कुठे दिसेल हे आकडे त्याने सप्टेंबर १८४५च्या सुमारास दोन वर्षांच्या आकडेमोडीनंतर काढले.
हे आकडे घेऊन तो अॅस्ट्रॉनॉमर रॉयल जॉर्ज एअरी (George Biddell Airy) आणि केंब्रिज वेधशाळेचे संचालक जेम्स चालिस (James Challis) यांच्याकडे गेला. या क्षेत्रात नवखा असलेल्या अॅडम्सच्या गणिताला या दोघांनीही महत्त्व दिले नाही. कारणे काहीही असोत.
तिकडे फ्रान्समध्येही असे गणित मांडण्याची कल्पना अॅरागो (François Arago) या शास्त्रज्ञाला सुचली होती पण हे गणित सोडवायला त्याला गरज होती एका तरुण आणि उत्तम गणितज्ञाची. त्याने अर्बन ल’व्हेरियेला हे गणित सोडविण्याचे आवाहन केले.
ल’व्हेरियेनेही अॅडम्सप्रमाणेच ते गणित सोडवले, पण त्यालादेखील अॅडम्ससारखाच अनुभव आला. फ्रान्समधल्या शास्त्रज्ञांनी त्याच्या गणिताकडे दुर्लक्ष केले. पण तो इथेच थांबला नाही.
त्याने बर्लिन वेधशाळेचे संचालक जॉन गॉटफ्राईड गॉल (Johann Gottfried Galle) यांना पत्रातून आपले आकडे पाठवले.
हे पत्र गॉलला २३ सप्टेंबर १८४६ रोजी मिळाले. त्याच रात्री त्यांनी आपला विद्यार्थी हेनरिख लुईस द अरेस्ट (Heinrich Louis d'Arrest) बरोबर या ग्रहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्यांना काही हा ग्रह सापडला नाही.
आणि आता पुरे म्हणून ते घरी जाण्याचा विचार करत असतानाच द अरेस्टने त्यांना नुकताच आलेला आकाशाचा नवीन नकाशा वापरण्याबाबत सुचविले.
आणि त्यांना हा नवा ग्रह ल’व्हेरियेने भाकीत केलेल्या जागेपासून एका अंशापेक्षा कमी अंतरावर सापडला. पुढे दोन दिवस त्यांनी या ग्रहाची निरीक्षणे घेतली.
हा तोच नवीन ग्रह आहे याची खात्री पटल्यावर त्यांनी ल’व्हेरियेला पत्र पाठवून त्याने सांगितलेल्या जागेच्या जवळच तो नवा ग्रह सापडल्याचे त्याला कळवले.
युरेनसचा शोध आकस्मिकपणे लागला होता, पण या नव्या ग्रहाचा शोध लावण्यात आला होता. एडमंड हेलीच्या धूमकेतूच्या कक्षेच्या शोधाबरोबर न्यूटनच्या गती आणि गुरुत्वीय नियमांची खात्री पटली होती. तसेच या ग्रहाच्या शोधाबरोबर त्या नियमांबद्दल शंका घेण्यास जागाच उरली नव्हती.
ही बातमी जेव्हा इंग्लंडमध्ये पोहोचली तेव्हा जेम्स चालिस आणि जॉर्ज एअरीवर अॅडम्सच्या गणिताकडे दुर्लक्ष केल्याबद्दल बरेच ताशेरे ओढण्यात आले. एअरीने तर गुपचूप आपल्या सहकाऱ्यांना सांगून त्यांच्याकडे या ग्रहाची पूर्वी झालेली निरीक्षणे सापडतात का याचा शोध घेण्यास सांगितले.
पण त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. हा शोध घेत असताना एअरीच्या सहकाऱ्यांना या नवीन ग्रहाच्या नोंदी दोनदा दिसल्यादेखील होत्या, पण त्यांना त्या ओळखताच आला नव्हत्या.
नवा ग्रह सापडल्यावर या ग्रहाला नाव देण्यावरून एक नवीन वादही सुरू झाला. सुरुवातीला याला ‘ल’व्हेरियेचा ग्रह’ म्हणून ओळखण्यात आले.
मग गॉलने या ग्रहाला जेनस या रोमन देवाचे नाव सुचवले. या शब्दाचा एक अर्थ ‘सुरुवात’ असाही आहे. आपण वापरत असलेल्या इंग्रजी कॅलेंडरमधील जानेवारी महिन्याचे नाव या जेनसवरून आले आहे. इंग्लंडमध्ये चालिसने याला युरेनसचा पुत्र ओशोनसचे नाव दिले.
ल’व्हेरियेने ग्रहाला नाव देण्याचा आपला अधिकार वापरून ‘नेपच्यून’ हे नाव सुचवले, पण नंतर त्याने हे नाव बदलून त्या ग्रहाला स्वतःचेच नाव दिले.
तुम्हाला आठवत असेल, युरेनसलाही सुरुवातीला हर्शेलचे नाव देण्यात आले होते, आणि त्याला फ्रेंच मंडळींचा विरोध होता. पण आता परिस्थिती पालटली होती.
फ्रेंचांनी आपल्या पुस्तकांत तातडीने युरेनसचे नाव बदलून हर्शेल केले, आणि एकप्रकारे इंग्रजांकडून या नवीन ग्रहाला ल’व्हेरियेचे नाव देण्यास पाठिंबाच मागितला.
पण, वही होता है जो मंजूरे विज्ञान होता है। युरेनसच्या बाबतीत जसे घडले तसेच याही बाबतीत घडले.
याही वेळेस शास्त्रज्ञांनी परंपरेनुसार या ग्रहालासुद्धा रोमन कथांमधील देवाचे नाव देण्यात यावे, असा विचार केला. या नव्या ग्रहाला निळसर झाकही होती, आणि रोमन पौराणिक कथांनुसार नेपच्यून हा समुद्राचा देव. हे नाव सर्वमान्य होते.
नेपच्यूनचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर आहे ३०.०६ खगोलीय एकक आहे. तर टीटीयस-बोडच्या नियमाप्रमाणे हे अंतर ३८.८ ख. ए. येतं. या दोन आकड्यांतील फरक इतर ग्रहांच्या संदर्भातील आकड्यांच्या तुलनेत जरी जास्त असला तरी तो खूप जास्तही नाही.
सुरुवातीला नेपच्यूनच्या शोधाच्या श्रेयात अॅडम्सची भागीदारी फ्रान्सने संपूर्णपणे नाकारली होती. पण आता सर्व हेवेदावे बाजूला सारून अॅडम्सलाही या शोधाचे श्रेय दिले जाते.
अनेक खगोल निरीक्षक आता नेपच्यून पलीकडे अज्ञात ग्रहाचा शोध घेऊ लागले. पण दोन कारणांमुळे त्यांचा उत्साह कमी होत गेला.
एक म्हणजे नेमके कुठे शोधायचे याचे आकडे नव्हते आणि खगोलशास्त्रात वेगवेगळ्या प्रकारच्या निरीक्षणांची भर पडत होती. आणि शास्त्रज्ञ वेगवेगळे विषय हाताळत होते.
नेपच्यूनपलीकडे असू शकणाऱ्या या अज्ञात ग्रहाच्या शोधाला पुन्हा चालना दिली ती म्हणजे पर्सिव्हल लॉवेल (Percival Lowell) या अमेरिकेतील धनाढ्य उद्योगपती आणि हौशी खगोलअभ्यासकाने.
त्यांनी १८९४ साली अरिझोनामधील फ्लॅगस्टाफ येथे लॉवेल वेधशाळेची स्थापना केली होती. या वेधशाळेने १९०६मध्ये नेपच्यूनच्या पलीकडच्या शोधासाठी प्लॅनेट एक्स हा प्रकल्प सुरू केला. पण लॉवेलच्या मृत्यूपर्यंत (१२ नोव्हेंबर १९१६) तरी त्यांच्या प्रयत्नाला यश आले नव्हते.
लॉवेल यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी कॉन्स्टन्स लॉवेल आणि लॉवेल वेधशाळा यांच्यात वारसा हक्कावरून कायद्याची लढाई सुरू झाली, ती जवळजवळ दहा वर्षे चालली.
त्यानंतर वेधशाळेचे संचालक वेस्टो मेल्विन सिल्फर यांनी प्लॅनेट एक्स प्रकल्प परत सुरू केला. तोपर्यंत फोटोग्राफीचे तंत्र खूप पुढे गेले होते. शोध घेण्याची कल्पना मुळात सोपी होती. आकाशाच्या एक भागाचे चित्र घ्यायचे.
मग चार पाच दिवसांनी परत त्याच भागाचे दुसरे चित्र घ्यायचे. मग ही दोन्ही चित्रे ब्लिक कंपॅरेटर नावाच्या एक उपकरणाच्या साहाय्याने आलटून पालटून पाहायची.
ताऱ्यांची जागा तर बदलत नाही, पण आकाशाच्या त्या भागात एखादा खगोल असा असेल की ज्याची जागा मात्र या दिवसांत बदलेली असेल आणि तो आपल्याला पुढे मागे होताना दिसेल, अशी या प्रयोगामागची कल्पना होती.
यासाठी त्यांना या कामास वाहून घेईल असा तरुण अभ्यासकच हवा होता. तो त्यांना २३ वर्षाच्या क्लॉएड टॉमबाघच्या (Clyde Tombaugh, 1906-97) रूपात मिळाला.
टॉमबाघ स्वतः एक हौशी आकाश निरीक्षक होता आणि स्वतःची दुर्बीण वापरून तो खगोलीय पदार्थांची चित्रे रेखाटत असे. त्याने रेखाटलेली चित्र पाहून सिल्फर खूपच प्रभावित झाला होता.
सिल्फरने हा शोध घेण्याची जबाबदारी टॉमबाघवर सोपवली. टॉमबाघने ६ एप्रिल १९२९ रोजी आपला शोध सुरू केला. हे सर्व काम त्याला एकट्यानेच करायचे होते. वद्य पक्षातल्या अष्टमीनंतर टॉमबाघ आपल्या वेधशाळेत जायचा.
कारण त्याकाळात चंद्रास्त मध्यरात्रीच्या सुमारास होतो. पुढे सुमारे दोन आठवडे आकाशात चंद्र नसताना तो आकाशाची चित्रे घ्यायचा. त्यानंतर मग आकाशात चंद्र असण्याच्या काळात तो ब्लिक कंपॅरेटर वापरून या चित्रांचा अभ्यास करायचा.
काम सुरू केल्यावर एका वर्षाच्या आतच टॉमबाघला यश मिळाले. जानेवारी १९३०च्या २३ आणि २९ तारखांना घेतलेल्या चित्रात त्याला प्लॅनेट एक्सचा शोध लागला. तो दिवस होता १८ फेब्रुवारी १९३०. मग आणखीन काही चित्रे घेऊन या शोधाची खात्री करण्यात आली व शेवटी १३ मार्च १९३० रोजी हा शोध प्रसिद्ध करण्यात आला.
लगेच जगभरातून या नव्या ग्रहालाही नावे सुचवण्यात आली. त्यातील तीन प्रमुख नावे होती मिनर्व्हा, प्लुटो आणि कोर्नस. या तिन्ही नावांचा ग्रीक पौराणिक कथांशी संबंध आहे. अंती एकमताने ‘प्लुटो’ हे नाव निवडण्यात आले.
हे नाव सुचवण्याचे श्रेय गेले इंग्लंडमधील एका ११ वर्षांच्या मुलीला. प्लुटो हे नाव सुचवणारी व्हेनेशिया बर्नी (Venetia Burney) ही पहिली व्यक्ती होती. युरेनस किंवा नेपच्यूनच्या नावासारखी या नावाची गत होऊ नये म्हणून ही नावे अमेरिकन अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीकडे पाठवली आणि दोन्ही संस्थांनी एकमतानी प्लुटो या नावाचा स्वीकार केला आणि १ मे १९३० रोजी हा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. सूर्यमाला आता नऊ ग्रहांची झाली होती.
पण प्लुटोचा शोध लागल्यानंतर काहीच दिवसांत हा इतर ग्रहांसारखा नाही, असे लक्षात आले. एकतर हा खूप लहान आहे आणि दुसरे म्हणजे याची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदते. पण इतर कुठलाही पर्याय नसल्यामुळे हा नववा ग्रह म्हणूनच ओळखला जाऊ लागला.
प्लुटोचे हे ‘ग्रहपद’ जवळ जवळ सत्तर वर्ष टिकले. ते का काढून घेण्यात आले, ते आपण पाहणार आहोतच...
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.