अरविंद परांजपे
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात तंत्रज्ञानक्षेत्राने शब्दशः एक मोठी झेप घेतली. ती म्हणजे माणसाने सौरमालेतील पृथ्वीव्यतिरिक्त दुसऱ्या घटकावर ठेवलेले पाऊल. आणि याच बरोबर सूर्यमालेतील घटकांच्या अन्वेषणास सुरुवात झाली. सूर्यमालेतील वेगवेगळ्या ग्रहांच्या जवळ जाऊन, तिथे उतरून तिथल्या परिस्थितीच्या अभ्यासाची सुरुवात झाली.
आतापर्यंत आपण सूर्यमालेच्या शोधाची चर्चा केली ती पृथ्वीवरून घेतलेल्या निरीक्षणांच्या आधारे. या निरीक्षणांतून आपण बरेच काही शिकलो, सूर्यमालेच्या घटकांबद्दल खोलात जाऊन माहिती मिळवली. पण एक अपवाद वगळता ही सर्व माहिती आपण विद्युतचुंबकी लहरी, दृष्य प्रकाश, रेडिओ लहरी वगैरेंच्या साहाय्याने मिळवली. अपवाद म्हणजे उल्का पाषणांचा अभ्यास.