भारतात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाची एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली जातात. संपूर्ण जगात तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. भारताच्या लोकसंख्येमध्ये दर एक लाख व्यक्तींमध्ये १९ जणांना या कर्करोगाची बाधा होत असते. पुरुषांमध्ये उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या कर्करोगांपैकी सर्वात जास्त प्रमाण तोंडाच्या कर्करोगाचे आढळते.
तर स्त्रियांमध्ये होणाऱ्या एकूण कर्करोगात हा तिसरा सर्वात जास्त उद्भवणारा कर्करोग आहे. भारतातल्या एकूण कर्करोगांच्या रुग्णांमध्ये १३ ते १६ टक्के रुग्ण याच आजाराचे असतात. मुखाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्णांचा कर्करोग हा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराशी संबंधित आहे.