Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक असावी का? किती असावी? गुंतवणुकीचा मूलभूत नियम कोणता? जाणून घ्या

सोने हा जागतिक धातू आहे. नुसत्या भारतातील नाही, तर जगामधील अनेक घटनांवर हे भाव अवलंबून असतात...
Gold Investment
Gold InvestmentEsakal
Updated on

सुहास राजदेरकर

सोन्याकडे विम्यासारखे पाहावे. म्हणजेच, इतर सर्व मालमत्तांचे दर खाली गेले, की सोन्याचे दर वर जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे, संपूर्ण गुंतवणुकीच्या पाच ते सात टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये, म्युच्युअल फंड गोल्ड फंडद्वारे करणे योग्य वाटते.

रविवारी सकाळी सात वाजताच अमितचा फोन आला, ‘‘हे सोन्याचे भाव कोठे जाऊन थांबणार आहेत, सर? तीन-चार वर्षांतच वैशालीचे, माझ्या मुलीचे, लग्न येऊन ठेपेल. काय करावे?’’

‘‘अमित, हा विषय फोनवर बोलण्याइतका छोटा नाही रे बाबा. भेटलो की सविस्तर बोलू.’’ मी त्याला म्हणालो.

‘‘आत्ता येऊ का भेटायला, सर?’’ अमित फारच काळजीत पडला होता हे स्पष्टच होते, त्यामुळे मी त्याला, ‘ये’ म्हटले.

‘‘हे पाहा अमित, आज सोन्याचे भाव आत्तापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. साधारण २,२०० अमेरिकी डॉलर एक औंस आणि ६,५०० रुपये एक ग्रॅम. अर्थात एक औंस म्हणजे साधारण २८.३५ ग्रॅम. प्रचलित भाषेत आपण जरी १० ग्रॅम म्हणजे एक तोळा समजत असलो, तरीही ते खरेतर ११.६६३८ ग्रॅम असतात.

सोन्याच्या वापरामध्ये जगामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. बहुतेक लोकांचा असा गैरसमज असतो, की सोन्याचे भाव कायम वाढणारे आहेत. परंतु सोन्याच्या भावामध्येसुद्धा चढ-उतार असतात. सोने हा जागतिक धातू आहे. नुसत्या भारतातील नाही, तर जगामधील अनेक घटनांवर हे भाव अवलंबून असतात.

त्यामुळेच सोन्याचे भाव नक्की कोणत्या कारणांनी वर किंवा खाली जाऊ शकतात, हे समजून घेणे आवश्यक आहे.’’ मी अमितला समजावून सांगू लागलो...

सोन्याला ‘सेफ हेवन’ अर्थात सर्वात सुरक्षित मालमत्ता समजले जाते. जेव्हा इतर सर्व मालमत्तांचे दर खाली घसरतात, तेव्हा सोन्याचा दर वर जातो. त्यामुळे अस्थिर वातावरणात लोक सुरक्षित अशा सोन्याकडे धावतात. सोन्याचे भाव चढे राहण्यात ‘अस्थिरता’ हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

आज जगामध्ये सोन्याचे भाव वर जात आहेत आणि सध्या ते सर्वोच्च पातळीवर आहेत. भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत उत्तम काम करीत असल्याने आपले शेअर बाजारसुद्धा वर जात आहेत आणि सध्या भाव चढे असल्याने सराफा बाजार मात्र थोडा थंड होताना दिसतो आहे. दुबई बाजार ठप्प झाला आहे, कारण लोक भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत.

भारतामध्ये सोन्याचे दर आयात शुल्कामुळे १५ टक्के (इम्पोर्ट ड्युटी) जास्त आहेत. सरकारने हे शुल्क कमी केले तर भाव कोसळतील. परंतु हे शुल्क कमी होण्याची शक्यता कमी आहे, कारण वर म्हटल्याप्रमाणे आपण सोन्याच्या वापरामध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहोत. कच्च्या तेलानंतर आज आपण सर्वाधिक आयात सोन्याची करतो.

सोन्याचे भाव वर जाण्याची कारणे

भूराजकीय अशांतता : सोन्याचे भाव वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. बहुतेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. २०१४पासून सुरू असलेले आणि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी मोठ्या प्रमाणात पेटलेले रशिया-युक्रेन युद्ध, ७ ऑक्टोबर २०२३पासून सुरू असलेले इस्राईल-हमास युद्ध, १९५४पासून धुमसत असलेले आणि अधून-मधून डोके वर काढीत असलेले चीन-तैवान यांच्यातील मतभेद आणि नोव्हेंबर २०२३पासून लाल समुद्रामध्ये माल वाहून नेणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर येमेनमधील हुथी बंडखोरांकडून होणारे हल्ले. या सर्व संघर्षांचे खूप गंभीर परिणाम बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर होऊ शकतात.

चीनची खरेदी : कोविडनंतर मागील तीन वर्षांत चीनमध्ये शेअर बाजार आणि रिअल इस्टेट मोठ्या प्रमाणावर खाली घसरले आहेत. त्यामुळे चीनमधील मध्यवर्ती बँक तसेच सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करीत आहेत.

अर्थव्यवस्थेमधील मंदी : आज भारताची अर्थव्यवस्था जरी चांगली सशक्त असली, तरीही जगामध्ये जपान आणि ब्रिटनसारख्या अन्य सात बलाढ्य देशांमध्ये प्रत्यक्ष मंदी आहे. यामुळे सोन्याचे भाव वर दिसतात.

चलनवाढ : कोविडच्या काळामध्ये बहुतेक सर्व देशांनी व्याजदर खाली आणले आणि नोटा छापल्या. आज याचे परिणाम म्हणून बहुतेक सर्वांना चलनवाढीला सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे लोकांचा विश्वास नोटांपेक्षा सोन्यावर जास्त आहे.

निवडणुका : अमेरिका आणि भारत धरून संपूर्ण जगामध्ये या दोन वर्षांत ४० देशांमध्ये मध्यवर्ती निवडणुका आहेत, त्यात काही ठिकाणी राजकीय अस्थिरतेची भीतीही दिसून येते.

काही मोठे फंड आणि अल्गोरिदम ट्रेडर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करीत आहेत.

या सर्व कारणांमुळे सोन्याचे भाव आज सर्वोच्च स्थानावर असलेले दिसत आहेत.

भारतात सोने खरेदी कशासाठी होते?

सोने आणि चांदी हा विषय बहुतेक भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आणि जवळचा असतो. साधारणपणे तीन कारणांसाठी सोने खरेदी केले जाते.

  • लग्न किंवा इतर समारंभात घालण्याकरिता दागिने करण्यासाठी,

  • स्त्रीधन म्हणून मुलीला तिच्या लग्नामध्ये देण्यासाठी (आजही, मुलगी जन्माला आली की तिचे पालक सोने साठवायला लागतात),

  • गुंतवणुकीसाठी.

बहुतेक लोक प्रत्यक्ष सोने खरेदी ही लग्न आणि इतर समारंभात त्याचे दागिने करून घालण्यासाठी करताना दिसतात. परंतु, आजची तरुण पिढी या ‘यलो मेटल’ अर्थात सोन्याच्या दागिन्यांपासून दूर जाताना दिसत आहे. त्याची जागा आता सफेद सोने आणि प्लॅटिनम दागिन्यांनी घेतलेली दिसते.

त्याचप्रमाणे पुष्कर, रुबी अशा हिऱ्यांना आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनासुद्धा ठरावीक लोकांची पसंती मिळत आहे. त्यामुळे फक्त लग्न व इतर समारंभाकरिता सोन्याचे दागिने घालण्यासाठी सोने घेणार असाल, तर तुमच्या मुली/ मुलगे हे दागिने वापरातील का, याचा परत विचार करा. तुम्ही केलेल्या दागिन्यांचे डिझाईन तुमच्या मुलांना आवडेलच असे नाही. काळ बदलतो, फॅशन बदलते.

पुढे हे दागिने मोडून नवीन डिझाईनचे करू म्हणाल, तर त्यामध्ये घडणावळीचा तोटा सहन करावा लागतो. सोने नंतर विकू म्हणाल, तर कोणाकडून घेतले आहे आणि कोणत्या श्रेणीचे सोने आहे त्यानुसार भाव कमी-जास्त दिला जातो.

अमित : मला जर सोन्यामध्ये तीन ते चार वर्षांकरिता गुंतवणूक करायची असेल, तर मी सरळ सोने विकत घेऊ का?

मी : नाही. गुंतवणुकीकरिता प्रत्यक्ष सोने विकत घ्यायची आवश्यकता नाही.

सोन्या-चांदीत गुंतवणूक कशी करावी?

गुंतवणूक कशाला म्हणावे? जी योग्य वेळेला विकून आपल्याला त्याचे पैसे करता येतात, त्याला गुंतवणूक म्हणावे. परंतु, विचार करा, तुम्ही गुंतवणुकीकरिता प्रत्यक्ष सोने खरेदी केले आणि त्याचे भाव खूप वर गेले, तर तुम्ही ते सोने मोडता का? याचे उत्तर बहुतेकदा ‘नाही’ असेच असेल. आपण शक्यतो एकदा घेतलेले सोने विकत नाही.

भाव वर गेल्यावर न मोडली जाणारी अशी गुंतवणूक काय कामाची? म्हणूनच सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? करावयाची असेल तर किती करावी? आणि मुख्य म्हणजे, प्रत्यक्ष सोने न घेता ती गुंतवणूक कशी करावी? हे समजून घ्यायला हवे.

सोने-चांदी याकडे आपण जेव्हा गुंतवणूक म्हणून पाहतो तेव्हा ते प्रत्यक्ष (फिजिकल) खरेदी करण्याची गरज नसते. किंबहुना तसे करूच नये.

कारण जेव्हा भाव वर जातात, तेव्हा ते विकण्याची मानसिकता नसते. सोने गुंतवणूक म्हणून खरेदी केले जाते, तेव्हा बहुतेक लोक प्रत्यक्ष सोने खरेदी न करता, ते पेपर किंवा डिजिटल स्वरूपात खरेदी करतात.

प्रत्यक्ष सोने न घेता सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे लॉकरचा खर्च वाचतो, शुद्धतेमध्ये फसण्याची तसेच चोरीची भीती राहत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाव वाढल्यावर भावना आड न येता ते विकून नफा सहज वसूल करता येतो.

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या पाच पद्धती

प्रत्यक्ष सोने खरेदी न करता सोन्यामध्ये खालील पाच प्रकारे गुंतवणूक करता येते

  1. कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)

  2. गोल्ड ईटीएफ

  3. सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड

  4. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट (ईजीआर)

  5. म्युच्युअल फंड गोल्ड योजना

अमित ः तुमच्या मते सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती?

मी : गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे म्युच्युअल फंडांच्या गोल्ड योजना. (तक्ता क्र. १ पाहा) या योजनेत गुंतवणूक केल्याने सोन्याची शुद्धता, सोन्याची साठवण, सोने चोरीला जाण्याची भीती या गोष्टींची चिंता गुंतवणूकदारांना करावी लागत नाही.

डीमॅट खाते किंवा सोने ठेवण्याकरिता बँकेत लॉकरची गरज लागत नाही. शुद्ध सोने कागदी स्वरूपात आपल्याजवळ साठवता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोन्याच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारांचा फायदादेखील घेता येईल. कारण, कागदी स्वरूपातील सोने म्युच्युअल फंडांकडे विकण्यामध्ये भावना आड येत नाहीत.

अमित : काय असतात या योजना? थोडे विस्ताराने सांगाल का?

मी : सांगतो.

म्युच्युअल फंड गोल्ड योजनांची वैशिष्ट्ये

प्रवेश भार नाही

लॉक इन काळ नाही

हवे तेव्हा पैसे परत मिळतात. पैसे काढण्याकरिता शेअर बाजारात जाण्याची आवश्यकता नाही. म्युच्युअल फंड कंपनीच निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार (एनएव्ही) पैसे परत करते.

शेअर बाजाराची जोखीम शून्य, कारण सर्व पैसे सोन्यामध्येच गुंतवले जातात.

कमीत कमी गुंतवणूक फक्त पाच हजार रुपये

एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारा महिन्याला फक्त ५०० रुपयांची गुंतवणूकही शक्य

लाभांश आणि वृद्धी पर्याय उपलब्ध

सतत खुली योजना (ओपन एन्डेड स्कीम)

योजनांमधील जोखीम

म्युच्युअल फंडांच्या सर्व योजनांमध्ये जोखीम (खरेतर अस्थिरता) आहे. गोल्ड योजनांमध्ये जोखीम म्हणजे योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) हे सोन्याच्या भावावर अवलंबून असेल. सोन्याचे भाव वर गेल्यास तुमचा फायदा होईल अन्यथा नाही.

जगामध्ये असलेल्या सोन्याच्या साठ्यापैकी सर्वात जास्त म्हणजे ८,१३३ टन अर्थात ८१,३३,४६० किलो सोने अमेरिकेकडे आहे. हीसुद्धा एक जोखीमच आहे. कारण अमेरिकेने हे सोने विकायला काढले, तर सोन्याचे भाव खाली जाऊ शकतात.

जगामधील भूराजकीय अस्थिरता संपुष्टात आली, चलनवाढ थांबली, अर्थव्यवस्था सुधारली तर सोन्याचे भाव कमी होतील.

अमित : मी नेहमी ज्या दुकानातून सोन्याचे दागिने घेतो, ते मला नेहमीच मासिक ठेव योजनेचा आग्रह करतात. सुरू करावी का?

सोने खरेदी मासिक ठेव योजना

बहुतेक सराफांकडे आणि सोने विक्री दुकानांमध्ये, सोने खरेदीसाठी मासिक ठेव योजना सुरू असतात. बँक खाते आणि इतर कागदपत्रांची आवश्यकता नाही, आयकर कपात नाही, नियमित बचत, आकर्षक व्याज, सोन्याचे आकर्षण आणि नगद (कॅश) व्यवहार यामुळे अनेक लोक अशा योजनांमध्ये भाग घेताना दिसतात.

काय असतात ह्या योजना आणि त्या कायदेशीर चौकटीमध्ये बसतात का? हे जाणून घेणे आवश्यक आहे. ह्या योजना साधारणपणे दोन प्रकारच्या असतात. पहिल्या योजनेनुसार दरमहा ठरावीक रक्कम सराफाकडे जमा करायची असते. योजनेचा शेवटचा हप्ता दुकानदार भरतात. योजना १२ ते ३६ महिन्यांची असते.

साठलेल्या रकमेतून गुंतवणूकदारांना सोने अथवा दागिने खरेदी करावे लागतात. उदारणार्थ, अनिलने दरमहा ₹ ५,००० सराफाकडे वर्षभर जमा केले. शेवटचा हप्ता (तेरावा) सराफाने भरला. वर्षाच्या शेवटी अनिलला ₹ ६५,००० (६०,००० + ५,०००) किमतीचे सोने अथवा दागिने खरेदी करता येतात.

दुसऱ्या योजनेनुसारसुद्धा मासिक हप्ते भरावयाचे असतात. परंतु इथे प्रत्येक हप्त्याच्यावेळी असलेल्या सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे गुंतवणूकदाराच्या नावावर प्रत्यक्ष सोने जमा होते. वर्षाच्या शेवटी जमा झालेल्या सोन्याचे दागिने अथवा प्रत्यक्ष सोने खरेदी करता येते. मात्र ह्या योजनेचा फायदा सोन्याचे भाव वाढले तरच होईल. पैसे परत मिळत नाहीत आणि सोने किंवा दागिने खरेदी करणे अनिवार्य असते.

कायदेशीर मान्यता

गतकाळात वेगवेगळ्या गैरव्यवहारांमध्ये करोडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्यामुळे भांडवली बाजार नियामक संस्थांची नजर सोने खरेदी मासिक ठेव योजनांवर पडली नसती तरच नवल.

नवीन कंपनी कायदा २०१३नुसार बारा महिन्यांवर ठेवी स्वीकारणाऱ्या योजनांना विशेष अटी लागू होतात, उदाहरणार्थ, योजनांवरील व्याज वार्षिक १२.५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे, कंपनीच्या संपूर्ण नेटवर्थच्या २५ टक्क्यांपर्यंतच्याच ठेवी स्वीकारण्यास मुभा आहे. कायद्याच्या चौकटीत राहण्यासाठी बऱ्याच नामांकित सराफांनी त्यांच्या १२ महिन्यांवरील योजना बंद केल्या आहेत.

तसेच, व्याजही कमी केले आहे. ग्राहक टिकवून ठेवण्याकरिता काही सोनार शेवटचा म्हणजेच बारावा हप्ता मोफत देत आहेत. फसवणूक झाली, तर पैसे वसूल करणे कठीण असल्याने गुंतवणूकदारांनी सावध राहणेच चांगले.

अमित : हल्लीच मी दै. सकाळच्या ‘धन की बात’मध्ये वाचले होते, की आपल्या मुंबई स्टॉक एक्स्चेंजने सोन्यासाठी ईजीआर असा नवीन पर्याय आणला आहे. तो काय आहे?

मी : होय.

सोने विकत घेण्याच्या पर्यायांमध्ये आता आणखीन एका नवीन पर्यायाची भर पडली आहे, ती म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट’ (ईजीआर).

नुकतेच सेबीने ‘बीएसई’ अर्थात मुंबई स्टॉक एक्स्चेंजला ईजीआर बाजारात आणण्याची परवानगी दिली. सप्टेंबरमध्ये सेबीने परवानगी दिल्यानंतर बीएसईने याच्या विविध चाचण्या व कसोट्या पार पाडल्या आणि दिवाळीच्या मुहूर्तावर, २४ ऑक्टोबर २०२२पासून बीएसईवर याची खरेदी-विक्री सुरू झाली.

यामध्ये गुंतवणूकदारांना शेअरसारखे सोने त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये घेता येईल. याची सुरुवात, ९९५ आणि ९९९ अशा दोन शुद्धतेच्या स्वरूपाच्या सोन्याने झाली आहे. कमीतकमी एक ग्रॅम आणि त्यापुढे खरेदी करता येईल.

महत्त्वाचे म्हणजे यामध्ये गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोन्याची डिलिव्हरीसुद्धा घेण्याचा पर्याय आहे, जो १० ग्रॅम आणि १०० ग्रॅममध्ये उपलब्ध आहे.

भारतामध्ये २२ शहरांमध्ये ‘व्हॉल्ट’ असतील, जे प्रत्यक्ष सोने साठविणे आणि डिलिव्हरीचे काम पाहतील. ईजीआर हा पर्याय नवीन असल्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये अजूनही सुस्पष्टता नाही. तसेच लिक्विडिटी अर्थात तरलता खूपच कमी असण्याची शक्यता आहे.

सोने आणि चांदी नेहमी हातात हात घालून चालतात, त्यामुळे चांदीविषयी थोडेसे.

चांदीला गरिबांचे सोने असेही म्हटले जाते. तसे पाहिले तर सोने आणि चांदी या दोन्हींचा एकत्र विचार केला जातो. सोने हा एक अनुत्पादक धातू असला, तरी चांदीचा उपयोग वाहने, इलेक्ट्रॉनिक्स अशा बऱ्याच उद्योगधंद्यांमध्ये केला जातो. सोन्याचा भाव चांदीच्या भावापेक्षा तुलनात्मकरित्या नेहमीच जास्त राहिला आहे.

त्याला बरीच कारणे आहेत. जसे की चांदीचे उत्पादन पुरेशा प्रमाणात होते आणि ते काही प्रमाणात इतर धातूंच्या उत्पादनामधूनसुद्धा घेता येते. उदाहरणार्थ, तांबे आणि जस्त. परंतु आता सोन्याचे भाव ज्या वेगाने वाढतील त्यापेक्षा जास्त वेगाने चांदीचे भाव वाढतील, असे संकेत आहेत. याची प्रमुख कारणे अशी:

चांदीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी राहिला तर भाव वाढतील.

तांबे आणि जस्त अशा धातूंचे उत्पादनसुद्धा घटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे चांदीचे उत्पादन कमी होऊ शकते.

उद्योगधंदे सुधारले तर चांदीची मागणी वाढेल.

तात्पर्य : थोड्या काळामध्ये काही कारणांनी सोन्याने सर्वात जास्त परतावा दिलाही असेल, उदाहरणार्थ कोविडकाळ. २०१९मध्ये ₹ ३५,००० तोळे असलेला भाव २०२०मध्ये ₹ ४८,०००वर पोहोचला, साधारणपणे ३८ टक्के परतावा. परंतु, दीर्घकाळामध्ये सोन्याने कधीही १० टक्क्यांच्या वर परतावा दिलेला नाही.

१९७९ साली, सोन्याचा दर प्रति तोळा ₹ ९४० होता. जो आज ₹ ६५,००० आहे. बीएसई सेन्सेक्स १९७९ साली १०० होती. आज ती ७३५०० आहे. दरसाल परतावा येतो, अनुक्रमे १० टक्के आणि १६ टक्के. या दोन मालमत्ता वेगळ्या असल्या, तरीही दोन्ही मालमत्तांमध्ये चढ-उतार होत असतात.

संपूर्ण गुंतवणूक एकाच मालमत्ता विभागात न ठेवता ती विभागून ठेवावी, हा गुंतवणुकीचा मूलभूत नियम आहे. म्हणूनच, सोन्यामध्ये गुंतवणूक असावी. परंतु किती? हा खरा कळीचा मुद्दा आहे. माझ्या मते, सोन्याकडे विम्यासारखे पाहावे. म्हणजेच, इतर सर्व मालमत्तांचे दर खाली गेले, की सोन्याचे दर वर जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे, संपूर्ण गुंतवणुकीच्या पाच ते सात टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये म्युच्युअल फंड गोल्ड फंडद्वारे योग्य वाटते.

gold rate from 1950
gold rate from 1950Esakal

तक्ता क्रमांक २

१९५०पासूनचे सोन्याचे दर *

वर्ष दर (रुपये)

१९५० ९९

१९५१ ९८

१९५२ ७६

१९५३ ७३

१९५४ ७७

१९५५ ७९

१९५६ ९०

१९५७ ९०

१९५९ १०२

१९६० १११

१९६१ ११९

१९६२ ११९

१९६३ ९७

१९६४ ६३

१९६५ ७१

१९६६ ८३

१९६७ १०२

१९६९ १७६

१९७० १८४

१९७१ १९३

१९७२ २०२

१९७३ २४२

१९७४ ३६९

१९७५ ५२०

१९७६ ५८५

१९७७ ४८६

१९७९ ८९०

१९८० १३००

१९८१ १८००

१९८२ १६००

१९८३ १८००

१९८४ १९००

१९८५ २०००

१९८६ २१००

१९८७ २५००

१९८९ ३१००

१९९० ३२००

१९९१ ३४००

१९९२ ४३००

१९९३ ४१००

१९९४ ४५००

१९९५ ४६५०

१९९६ ५१००

१९९७ ४७००

१९९८ ४०००

१९९९ ४२००

२००० ४४००

२००१ ४३००

२००२ ५०००

२००३ ५७००

२००४ ५८००

२००५ ७९००

२००६ ९०००

२००७ १०८००

२००८ १२५००

२००९ १४५००

२०१० १८०००

२०११ २५०००

२०१२ ३२०००

२०१३ २८०००

२०१४ २४५००

२०१५ २५०००

२०१६ २८०००

२०१७ २९६६७

२०१८ ३१४३८

२०१९ ३५२२०

२०२० ४८६५१

२०२१ ४८७२०

२०२२ ५२६७०

२०२३ ६५३३०

------------------------------

Gold Investment
Gold Mine Collapse : सोन्याची खाण ठरली जीवघेणी! मालीत भीषण अपघातात 70हून अधिक लोकांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.