Wild Vegetables Recipe रानभाज्या

डोंगरकड्यावर, परसात, पठारावर, दगड-मातीतून उगवणाऱ्या रानभाज्यांचा वास, चव, रंग सगळ्यातच एक वेगळेपण असते.
Wild Vegetables Recipes
Wild Vegetables RecipesSakal
Updated on

- अमृता आर्ते

सर्वसाधारणपणे पालेभाज्या लसूण, मिरची व कांद्याच्या फोडणीवर परतून आणि वरून ओले खोवलेले खोबरे पेरून केल्या जातात. तर काही भाज्या पीठ पेरूनही केल्या जातात. डोंगरकड्यावर, परसात, पठारावर, दगड-मातीतून उगवणाऱ्या रानभाज्यांचा वास, चव, रंग सगळ्यातच एक वेगळेपण असते. त्यामुळे काही भाज्यांत व्यंजन म्हणून मूग डाळ, चणा डाळ, हरभरे, वालही घातले जातात.

दिंडा

श्रावणी सोमवारी दिंड्याच्या मोठ्या पानावर जेवण्याची प्रथा आहे. कोवळ्या पानांची भाजी पालेभाजीप्रमाणे केली जाते. तर दिंड्याचे कोवळे कोंब किंवा कोवळ्या फांद्या म्हणजे देठे सोलून (शेवग्याच्या शेंगेसारखे सोलून) त्याचीही भाजी केली जाते. 

Wild Vegetables Recipes
Janmashtami Special Recipe : जन्माष्टमीला पंचामृत या पद्धतीने बनवा, वाचा पंचामृताचे आरोग्यदायी फायदे

साहित्य 

एक जुडी दिंड्याची देठे,२ कांदे,१ छोटी सुक्या खोबऱ्याची वाटी, ८-१० लसूण पाकळ्या, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून जिरे, १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग, २-३ आंबोशीचे तुकडे किंवा अमसुले, चवीनुसार मीठ, तेल.

कृती

दोन कांदे, १ छोटी सुक्या खोबऱ्याची वाटी गॅसवर किंवा चुलीवर भाजून घ्यावी. कांद्याची साले काढावीत. कांदा आणि खोबरे खलबत्यात कुटावे. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करावे. त्यात जिरे घालावे.

Wild Vegetables Recipes
Sprouts Salad Recipe: हे स्प्राउट सॅलेड शरीरातील प्रोटीनची कमतरता करेल पूर्ण, व्हिडिओमध्ये पहा रेसिपी

जिरे तडतडले की ठेचलेला लसूण, त्यात दिंड्याचे सोललेले तुकडे घालावेत. त्यावर हळद, हिंग, मिरची पावडर, कुटलेला कांदा-खोबऱ्याचा मसाला घालावा. थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ आणि आंबोशीचे तुकडे घालून चांगले शिजवून घ्यावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.

टीप  

मुगाच्या बिरड्यात किंवा कोळंबीच्या रश्श्यात उकळताना सोललेले दिंड्याचे तुकडे घालावेत, वेगळीच छान चव येते.

टाकळा

साहित्य

एक जुडी टाकळा, २ बारीक चिरलेले कांदे, ८-१० लसूण पाकळ्या, ४-५ हिरव्या मिरच्या, पाव वाटी खोवलेले ओले खोबरे, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, तेल.

कृती 

टाकळ्याची कोवळी पाने घ्यावीत. भाजीचा उग्र वास आणि हलकी तुरट चव काढण्यासाठी टाकळ्याची पाने गरम पाण्यात स्वच्छ धुऊन काढावीत व नंतर बारीक चिरून घ्यावीत. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात ठेचलेला लसूण परतावा.

Wild Vegetables Recipes
Tomato poori recipe: टोमॅटोची चटणी खाऊन कंटाळात, मग ट्राय करा ही लुसलुशीत पुरी! जाणून घ्या रेसिपी

नंतर त्यात चिरलेला कांदा, मिरचीचे तुकडे घालून परतत थोडे शिजवून घ्यावे. त्यातच हळद, हिंग घालावे व परतावे. नंतर झाकण ठेवून कांदा शिजवावा. कांदा शिजला की नंतर चिरलेला टाकळा मिक्स करून शिजवावा. वरून मीठ, खोवलेले ओले खोबरे घालून परतावे.

भारंग

भारंगी खूप कडू आणि आंबट असते, म्हणून ही भाजी शिजवून, पाणी काढून करतात. 

साहित्य - एक जुडी भारंगीची कोवळी पाने (देठ नको), अर्धी वाटी चिरलेला कांदा, ५-६ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, अर्धी वाटी जाडसर भरडलेले शेंगदाणे (शेंगदाण्याऐवजी ओले खोवलेले खोबरेसुद्धा चालेल), पाव वाटी भिजवलेली हरभरा डाळ, ३-४ हिरव्या मिरच्या, मीठ, गूळ, तेल, हिंग, हळद. 

कृती

प्रथम भारंगीची पाने स्वछ धुऊन पाणी घालून कुकरमध्ये शिजवावीत. शिजलेली पाने पिळून, बारीक चिरून घ्यावीत. नेहमीपेक्षा जास्त तेलावर कांदा-लसूण, मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. त्यावर भिजवलेली हरभरा डाळ घालावी.

थोडेसे पाणी घालून ५-७ मिनिटे झाकण ठेवावे. नंतर त्यात चिरलेली भारंगीची पाने घालावीत. मिक्स करून झाकण ठेवावे व वाफ आणावी. पाण्याचा थोडा हबका मारावा. मीठ, हळद, थोडा गूळ व हिंग घालून शिजवावे आणि उतरवावे. 

टीप - भारंगीच्या फुलांचीसुद्धा पालेभाजीप्रमाणेच भाजी करता येते, छान लागते. 

कुर्डू

साहित्य - एक जुडी कुर्डूची भाजी, २ बारीक चिरलेले कांदे, ८-१० लसूण पाकळ्या, ४-५ हिरव्या मिरच्या, पाव वाटी खोवलेले ओले खोबरे, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, तेल.

कृती

कुर्डूची भाजी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात ठेचलेला लसूण परतावा. त्यात चिरलेला कांदा, मिरचीचे तुकडे घालून परतत कांदा थोडा शिजवून घ्यावा. त्यात हळद, हिंग व भिजवलेली मूग डाळ मिक्स करावी.

मूग डाळ परतून झाकण ठेवून शिजवून घ्यावी. नंतर त्यात चिरलेली कुर्डूची भाजी मिक्स करावी. वरून मीठ, खोवलेले ओले खोबरे घालून पुन्हा एकदा परतावे. 

कर्टोली

ही भाजी कार्ल्याप्रमाणे बारीक चिरून, गोल चकत्या कापून, मिरची घालून, मसाला घालून, नुसती तेल कांद्यात परतून किंवा डाळ, वाल घालून  कशीही करता येते. 

साहित्य 

बारीक चिरलेली १५-२० कर्टोली, १ वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी भिजवून, मोड आणून, सोललेले वाल, ३-४ हिरव्या मिरच्या, मीठ, गूळ, तेल, हळद, हिंग, खोवलेले ओले खोबरे.

कृती 

तेलावर जिरे, कांदा, मिरच्यांचे तुकडे परतावेत. त्यात हळद, हिंग, भिजवलेले वाल व थोडेसे पाणी घालून ५-७ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्यात चिरलेली कर्टोली घालावीत. पाण्याचा थोडा हबका मारावा. झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. मीठ, थोडा गूळ व खोबरे घालून शिजवून खाली उतरवावे.

शेवळं

शेवळाची चांगली तेलात परतून केलेली भाजी हवाबंद डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवून वर्षभर वापरता येऊ शकते. शाकाहारी पद्धतीत काळे वाटणे, हरभरे, भरडा (कणी - गहू आणि हरभरा डाळ भाजून), तर मांसाहारीमध्ये करंदी, कोळंबी, खिमा, सोडे घालून ही भाजी करता येते.

साहित्य

पंचवीस-तीस शेवळं, १२-१५ काकडं (आवळ्या सारखी दिसणारी पण आकाराला अगदी छोटी आणि चवीला तुरट फळे), २ मोठे चिरलेले कांदे, हळद, हिंग, १ वाटी खिमा, २ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, लाल मसाला, गरम मसाला, मीठ, तेल.

कृती 

शेवळं व्यवस्थित निवडून, बारीक चिरून, स्वच्छ धुऊन घ्यावीत. भाजी खाजू नये म्हणून त्यात काकडं किंवा आंबट पाला घालतात. काकडं बी काढून, ठेचून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावीत. पाला असेल तर स्वच्छ धुऊन मिक्सरमधून वाटून घ्यावा. खिमा स्वच्छ धुऊन ठेवावा.

कढईत दोन-तीन पळ्या तेल घालून त्यात भाजी घालून चांगली परतावी. वाटलेला काकडाचा ठेचा घालून चांगले परतून घ्यावे. कढईत तेल तापवून तमालपत्र घालावे आणि चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतावे.

हळद, हिंग, खिमा, आले-लसूण पेस्ट, लाल मसाला घालून शिजवून घ्यावे. खिमा शिजला की त्यात परतलेली शेवळं व काकडं घालून चांगले एकजीव शिजवून घ्यावे. गरम मसाला, मीठ घालून परतावे. 

टीप - आवडीनुसार कांदा-खोबरे भाजून त्याचे वाटणही घालू शकता.

कुलु (फोडशी)

साहित्य - एक जुडी कुलु, २ बारीक चिरलेले कांदे, ८-१० लसूण पाकळ्या, ४-५ हिरव्या मिरच्या, पाव वाटी खोवलेले ओले खोबरे, पाव वाटी भिजवलेली मूग डाळ, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, मीठ, तेल.

कृती

कुलुची भाजी स्वच्छ धुऊन बारीक चिरावी. कढईत तेल गरम करावे. ते तापल्यावर ठेचलेला लसूण परतावा. नंतर त्यात चिरलेला कांदा, मिरचीचे तुकडे घालून परतत थोडे शिजवून घ्यावे.

नंतर त्यात हळद, हिंग व भिजवलेली मूग डाळ मिक्स करावी. मूग डाळ परतून झाकण ठेवावे व डाळ शिजवून घ्यावी. मग त्यात चिरलेली कुलुची भाजी मिक्स करून शिजवावी. वरून मीठ, खोवलेले ओले खोबरे घालून परतावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()