सोनिया उपासनी
जागतिक स्तरावर ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपल्या आयुष्यात असणाऱ्या महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची ही चांगली संधी असते.
अर्थातच ही कृतज्ञता ३६५ दिवस असायला हवी, एका दिवसापुरती नाही! आई, बहिणी, मुलगी, पत्नी, मावशी, काकू, वहिनी, सासू, सून, मैत्रीण, सहकारी अशा एक ना अनेक नात्यांच्या निमित्ताने महिला प्रत्येकाच्या आयुष्याला मोलाचा आधार देत असतात.
या प्रत्येकीने कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्यासाठी काहीतरी समर्पण केलेले असते. कुणाचे समर्पण व्यक्त होते, तर कुणाचे अव्यक्तच राहते.
ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक महिलेला शुभ संदेश व आपल्या परीने जमेल तशी छोटीशी का होईना, भेटवस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
खऱ्या, खोट्या दागिन्यांपासून इन ट्रेंड असलेले फॅशनेबल कपडे व सर्व प्रकारच्या ॲक्सेसरी, इलेक्ट्रॉनिक गॅजेट यातले काहीही भेट म्हणून देता येऊ शकते. तुमच्या बजेटप्रमाणे, तसेच तुमच्या आयुष्यातील तुमच्या आवडत्या व्यक्तीला काय आवडते त्यानुसार वस्तू निवडता येईल. कसे ते पाहू -
आईसाठी गिफ्ट निवडताना तुम्ही ज्वेलरीतील कुठलाही प्रकार म्हणजे इअरिंग, गळ्यातील छानसा सर, मल्टिपर्पज वापरता येणारी हँडबॅग, एखादी छानशी हँडलूमची साडी अथवा सिल्कची साडी निवडू शकता.
बहिणीसाठी गिफ्ट निवडताना तुमच्या बजेटप्रमाणे कुठलीतरी ज्वेलरी किंवा इन ट्रेंड असलेले सुंदरसे घड्याळ, कुर्ती, एखादा पंजाबी ड्रेस किंवा कुठल्याही प्रकारची ॲक्सेसरीही निवडू शकता. ह्यामध्ये हँड पर्स, परफ्यूम, पाउच, लेदर ॲक्सेसरीज अशा अनेक पर्यायांनी हल्ली बाजारपेठ भरलेल्या आहेत.
पत्नीसाठी गिफ्ट निवडताना ती वर्किंग वुमन आहे की हाऊसवाइफ ह्यावर वस्तू निवडावी. वर्किंग वुमन असेल, अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतील. अगदी लॅपटॉप बॅगपासून कॅज्युअल व फॉर्मल क्लोदिंग असे पर्याय उपलब्ध आहेत.
कोणत्याही प्रकारचे कपडे, ज्वेलरी, फुटवेअर व इतर ॲक्सेसरी, नोकरी करणाऱ्या आणि न करणाऱ्या सगळ्याच महिलांना आवडतात. त्यामुळे ज्वेलरी, ॲक्सेसरींच्या पर्यायांमधून निवड करू शकता.
जन्मदात्रीनंतर आयुष्यात दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पत्नी. स्वतःचे घर सोडून ती पतीच्या कुटुंबाला आपलेसे करून भरभरून आदर व प्रेम देते. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा ही संधी पतीमंडळींनी गमवू नये असे वाटते.
मुलीसाठी गिफ्ट निवडताना तिची प्रत्येक आवडनिवड जर लक्षात ठेवली तर लेक एकदमच खूश होऊन जाईल.
इन ट्रेंड असलेले सर्व फॅशनेबल कपडे, वनपीस ड्रेस, फ्रॉक; वाईड बॉटम, नॅरो स्ट्रेच, स्ट्रेट पँट अशा निरनिराळ्या प्रकारच्या जीन्स, निरनिराळे स्कर्ट व टॉप, ज्वेलरी आयटम, ॲक्सेसरींबरोबरच इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधूनही गिफ्ट निवडता येईल.
ह्याचप्रमाणे तुमची वहिनी, मावशी, काकू, भाची, पुतणी, मैत्रीण, सासू, सून ह्या सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन प्रत्येकासाठीच काही ना काही भेटवस्तू घेऊ शकता!
कोणालाही गिफ्ट देताना ते आरामदायी व उपयोगी असाव असे अपेक्षित असते. म्हणूनच जेव्हा स्त्रियांच्या फॅशनचा विषय येतो तेव्हा फक्त कुठल्याही एकाच गोष्टीचा विचार करून चालत नाही.
आत्ताचा ट्रेंड लक्षात घेता कुठलीही गोष्ट फॅशनेबल असण्याबरोबरच कम्फर्टेबल असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची पुर्तता होईल, अशी वस्तू निवडावी. कम्फर्टेबल जॉगर्स, लाउंजवेअरसारख्या आरामदायी कपड्यांचीसुद्धा निवड करू शकता.
ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये रेडी टू वेअर साड्या हल्ली फार ट्रेंडमध्ये आहेत. रॅप-अराऊंड ड्रेस सर्व सीझनमध्ये आरामदायी असतात. त्यामुळे हे कपडे गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय म्हणता येतील.
काहींना कपडे व इतर ॲक्सेसरी गिफ्ट म्हणून आवडत नाहीत. अशा लोकांसाठी हँडलूम फर्निशिंग आयटम व हँडीक्राफ्ट आयटम हे एक बेस्ट गिफ्टिंग ऑप्शन ठरू शकतो.
बेड शीट, बेड कव्हर, कॉर्नर शोपीस, वॉल हँगिंग, टेराकोटाच्या वस्तू, काळ्या अथवा लाल मातीपासून तयार केलेल्या, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू असे कितीतरी प्रकार उपलब्ध आहेत.
तुमच्या आप्तजनांसाठी ह्यामधील त्यांच्या आवडीची वस्तू निवडा व त्यांना ह्या जागतिक महिलादिनानिमित्त छोटेसे ‘टोकन ऑफ लव्ह ॲण्ड ॲप्रिसिएशन’ म्हणून भेट द्या.
मग बघा आनंद खुलून प्रत्येक चेहऱ्यावर हसू उमटेल. जागतिक महिलादिनाच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा...!
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.