शशिकांत सावंतप्रत्येक पुस्तकप्रेमीला आपला पुस्तकसंग्रह प्रिय असतो. एखादा धनिक माणूस जसा गुपचूप लॉकर उघडून आजूबाजूला कोणी पाहत नाही ना याची खात्री करून मग लॉकरमधल्या मौल्यवान वस्तू पाहील, तसा हा पुस्तकप्रेमी आपला खजिना अधूनमधून पाहत असतो..अमेरिकेतील डॅनियल वेशलर आणि जॉर्ज कोपलमन हे कल्चर्ड ऑयस्टर या कंपनीद्वारे दुर्मीळ पुस्तकांची खरेदी विक्री करतात. एप्रिल २००८मध्ये एक दिवस १५८० साली प्रसिद्ध झालेली, एक डिक्शनरी विक्रीला आली. जॉन बॅरेटने ती संपादित केलेली होती. विक्रेता अशा वेळी विक्रीला आलेल्या दुर्मीळ पुस्तकाची १०-१२ पानं रिलीज करतो. जेणे करून ती पानं पाहून खरेदीदारांना पुस्तकाचा अंदाज यावा. आज आपण जी डिक्शनरी बघतो ती १७५७ साली सॅम्युअल जॉन्सनने आणि मग १८५७ साली ऑक्सफर्डने आणि वेबस्टरने तयार करायला घेतली. या डिक्शनऱ्यांमध्ये एखाद्या शब्दाचा उगम कधी झाला इथपासून ते तो शब्द किती प्रकारे चालतो वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. पण त्या काळच्या म्हणजे १५-१६व्या शतकातल्या डिक्शनऱ्यांत शब्दाला प्रतिशब्द एवढंच होतं. प्रामुख्याने लेखक वगैरे मंडळीच अशा डिक्शनऱ्या वापरत असत. या डिक्शनरीची जी काही १०-१२ पानं समोर आली त्याच्यात अगदी शब्दाशब्दांवर वापरणाऱ्याच्या खुणा होत्या. एका पानावर बऱ्याच खुणा. याचाच अर्थ एखाद्या लेखकाने ती कसून वापरली होती.पंधराव्या शतकातला असा मोठा लेखक कोण, तर शेक्सपिअर. त्यामुळे वेशलर आणि कोपलमन यांनी विचार केला, की शेक्सपिअरने ही डिक्शनरी वापरली असेल का? ते ठरवण्यासाठी त्यांनी समग्र शेक्सपिअरमध्ये म्हणजे त्याच्या अडतीस नाटकांमध्ये जे शब्द आले आहेत ते त्या डिक्शनरीमध्ये आले आहेत का, याचा शोध घेतला. आता त्यातले म्हणजे काही शब्द डिक्शनरीत असणारच पण शेक्सपिअरच्या कथानकांमधला एखादा वैशिष्ट्यपूर्ण शब्द त्यात आला आहे का, असा विचार करून तो शब्द शोधताना शेक्सपिअरने ‘समरड्राऊट’ हा वैशिष्ट्यपूर्ण शब्द वापरला आहे असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ती डिक्शनरी विकत घ्यायची ठरवली.शेक्सपिअरने ती डिक्शनरी अगदी कसून वापरली होती, अनेक शब्दांखाली टिपा दिल्या होत्या आणि या डिक्शनरीत झालेल्या चुका, तशीच चुकीची स्पेलिंग शेक्सपिअरने वापरली होती. वेशलर आणि कोपलमन जोडगोळीनं त्या डिक्शनरीचा पूर्ण अभ्यास केला. ती विकणं किंवा स्वतःपाशी ठेवणं त्यांना सहज सोपं होतं. पण त्याऐवजी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला.ती डिक्शनरी पुन्हा प्रसिद्ध करण्याचा. त्या डिक्शनरीत शेक्सपिअरच्या ज्या टिपा होत्या किंवा प्रत्येक शब्दापुढे शेक्सपिअरनं दिलेलं स्पष्टीकरण होतं ते या नव्या डिक्शनरीत समाविष्ट करायचं, असं त्यांनी ठरवलं आणि Shakespeare's Beehive या नावाने ती प्रसिद्ध केली आणि आता ती केवळ सातएकशे रुपयांना विकत मिळते. .तर पुस्तकांचं जग हे असं असतं. कुठून तुमच्या हाती काय घबाड लागेल हे सांगता येत नाही. क्रिकेटप्रेमासारख्या छंदात किंवा दारूच्या व्यसनात कसलाही साठा होत नाही. अर्थात तुम्हाला क्रिकेटपटूंचे फोटो वगैरे जमवायचा छंद असेल तर बात वेगळी. पण पुस्तकाचं मात्र असं नाही. पुस्तकप्रेमींना सतत आपल्याजवळ पुस्तकं हवी असतात. त्यामुळे पुस्तकं रद्दीत द्यायला ते नाखूश असतात. अर्थात त्यामुळे आधी बायको, मग मुलं, नंतर इतर नातेवाईक कटकट करतात. शिवाय पुस्तकांच्या छंदात अफाट पैसा जातो ते वेगळंच. माझ्या एका मित्राला अलीकडेच जवळपास जगातल्या ज्या मोठ्या डिक्शनऱ्या आहेत, म्हणजे ज्या टेबलावर ठेवता येतात, त्यापैकी एक रँडम हाऊस डिक्शनरी हवी होती. त्याच्याकडे ती होती पण वापरून वापरून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. त्याने खूप शोधली. ऑनलाइन तिची किंमत ४० हजार रुपये होती. मग त्याने मला ती शोधायला सांगितली. प्रत्येक पुस्तकप्रेमी व्यक्तीला येतात तसे अनुभव मलाही येतात. म्हणजे तुम्ही काहीतरी शोधत असता आणि तेव्हाच तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता आणि तिथे ते पुस्तक असते. मी वाशीत जिथे राहतो तिथे जुन्या पुस्तकांचं दुकान आहे. कंटाळा आला, की मी तिथे फेरी मारायला जातो. अर्धा-पाऊण तास पुस्तकांच्या सहवासात घालवला की आपण फ्रेश होतो. तिथे चुकून माझी पावले वळली आणि तिथेच ती डिक्शनरी माझी वाट पाहत होती. मित्राने मी मागितलेल्या किमतीला ती विकत घेतली. ती रक्कम माझ्या दृष्टीने भरघोस होती, पण चाळीस हजारांच्या मानाने कमीच होती.डिक्शनऱ्या, बायबल, ज्ञानेश्वरीच्या जुन्या प्रती, एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या वेगवेगळ्या एडिशन्स, ऑक्सफर्ड किंवा वेबस्टर यांचे शब्दकोश, खिशात मावतील अशी पुस्तकं, गोल्डन ट्रेझरीच्या वेगवेगळ्या आवृत्त्या, महाभारताच्या आणि रामायणाच्या विविध आवृत्त्या या सगळ्या पुस्तकवेड्या मंडळींच्या जमवाजमवीच्या गोष्टी आहेत. माझ्याकडे रिचर्ड फाईनमनच्या आत्मचरित्राच्या तीन-चार आवृत्या आहेत, पण काळी पॅन्ट, पांढऱ्या शर्टातल्या फाईनमनचा मागे फळा असलेला फोटो असलेली पुस्तकं मला आवडतात. मी त्याच्या मिळेल तितक्या कॉपीज विकत घेतो आणि वाटत सुटतो. हीच गोष्ट अलीकडच्या ब्रिफ हिस्टरी ऑफ नियरली एव्हरीथिंग या पुस्तकाची आहे. जुन्या बाजारात ह्याच्या प्रती केवळ दीडदोनशे रुपयाला विकत घेता येतात, मी त्या घेतो आणि दिसेल त्याला वाचायला देतो. याच पुस्तकाची एक मोठी सचित्र प्रत मागे एका चॅनल प्रमुखाला दिली होती. त्यांच्याकडून ती हरवली म्हणजे त्यांच्या टेबलावरूनच नाहीशी झाली. अगदी अलीकडे मला त्या पुस्तकाची तशीच सचित्र पण हार्डबाऊंड प्रत मिळाली. त्यात पानोपानी रंगीत फोटो आहेत आणि उत्तम चित्रे आहेत. ग्रह, नोव्हा, सुपरनोव्हा यांचे फोटो आहेतच पण विविध क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ, त्यांनी तयार केलेले तक्ते, जिऑग्राफिक सोसायटीमधल्या मंडळींचे गटागटाने फोटो. हे सगळं चाळताना वारंवार तेच तेच वाचलं जातं. ते वाचताना आपल्याला मजा येते. .वन, टू, थ्री... इन्फिनिटी हे विज्ञानावरचं गाजलेलं पुस्तक. एक,दोन,तीन .. अनंत या नावाने अनंत राम कुलकर्णी यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मी नववीत असताना रोज एकएक रुपया जमवून पार्ल्याच्या जवाहर बुक डेपोमधून ते विकत घेतलं होतं. मॅजेस्टिक प्रकाशनाने जी अनेक पुस्तकं अनुवादित केली होती त्यात हे होतं. माझं आवडतं भटक बहाद्दरदेखील मॅजेस्टिकने प्रकाशित केलं होतं. अशी बरीच पुस्तकं मीसीसीपीवरील मुशाफिरी, पाडगावकरांनी अनुवादित केलेले वाटाड्या, माय अँटोनियाचा विद्याधर पुंडलिक यांनी केलेला अनुवाद, दि.बा.मोकाशी यांनी केलेला फॉर हूम द बेल टोल्सचा घणघणतो घंटानाद या नावाने केलेला अनुवाद, कॉनरॅड रिकटरची जीएंनी अनुवादित केलेली रान, शिवार, गाव ही कादंबरीत्रयी या सर्व त्या काळात अमेरिकेने दिलेल्या गव्हाच्या पैशातून प्रसिद्ध झाल्या होत्या. या अनुवादांनी मराठी वाचकाला जागतिक साहित्याची खिडकी उघडून दिली.रद्दीत, सेकंडहँड पुस्तकांच्या दुकानांत जी पुस्तकं मिळतात त्याच्यावर अनेकदा सह्या आढळतात. माझ्याकडे जोसेफ कॉन्ड्राक्टचा सव्वाशे वर्षांपूर्वीचा त्यानेच बनवून घेतलेला पुस्तकाचा शिक्का आहे. जुन्या दुर्मीळ पुस्तकांच्या व्यवसायात १००-१५० वर्षांपूर्वीच्या पुस्तकांनादेखील दुर्मीळ मानलं जातं. त्यासाठी वाटेल तितके पैसे मोजायला ग्रंथप्रेमी तयार असतात. अरेबियन नाईट्सची पहिली आवृत्ती तयार झाली, समजा, हजार-दोन हजारची असेल, तो १६ पुस्तकांचा सेट होता. पहिल्या सेटवर प्रत्येक पानावर एक नंबर टाकला होता, दुसऱ्या सेटवर दोन. माझ्याकडे १६८ क्रमांकाच्या सेटमधलं फक्त एकच पुस्तक आहे. गंमत म्हणजे पुस्तकातील अनेक पानं फाडलेलीही नाहीत. पुस्तकं फॉर्मच्या स्वरूपात छापली जातात ८ किंवा १६ पानांचा एक फॉर्म. पूर्वी कामाची एक पद्धत होती. पुस्तक छापल्यानंतर एक बाजू बाईंडिंगची असायची, त्याला लागून असलेल्या दोन बाजू कट केल्या जायच्या आणि मधल्या बाजूचे फॉर्म तसेच ठेवले जायचे. मग वाचताना एक मोठी सुई घेऊन प्रत्येक फॉर्म कापत कापत ते पुस्तक वाचायचं. म्हणून मराठीत असा शब्दप्रयोग आला, की पुस्तकाचं पानही फाडलेलं नाही. अर्थात इंग्रजीतही अशा न फाडलेल्या पानांना खूपच किंमत आहे. माझ्याकडच्या अरेबियन नाईट्समध्ये अशी पानं आहेतच. पण इंग्रेव्हिंज आहेत म्हणजे शिशाच्या किंवा लाकडाच्या वुडकटवर शाई लावून त्याचा उलटा छाप घेतलाय. अनेकदा इथे आपण बोट लावताच शाईचा काळा रंग अजूनही म्हणजे १०० वर्षांनंतर हाताला लागतो म्हणूनच मधे ट्रेसिंग पेपर टाकलेला असतो. .प्रत्येक पुस्तकप्रेमीला आपला पुस्तकसंग्रह प्रिय असतो. एखादा धनिक माणूस जसा गुपचूप लॉकर उघडून आजूबाजूला कोणी पाहत नाही ना याची खात्री करून मग लॉकरमधल्या मौल्यवान वस्तू पाहील, तसा पुस्तकप्रेमी समग्र शेक्सपिअर, बायबल, विल ड्युरांटचे ११ खंड, हिंदी-मराठी विश्वकोश असा आपला खजिना अधूनमधून पाहत असतो. तहान, भूक किंवा इतर मौजमजेपेक्षा हे पाहणं आणि बाळगणं त्याला अधिक सुखाचं वाटत असतं.पुस्तकं वाचण्यात आणि जमविण्यात नेहमीच विस्मयकारी आणि विलक्षण अनुभव येतात. पॉल थेरो हा ब्रिटिश लेखक-कादंबरीकार मुख्यतः प्रवासवर्णनासाठी ओळखला जातो. (ट्रेनचा प्रवास म्हणजे खरा प्रवास, विमानप्रवास म्हणजे निव्वळ वाहतूक, हे त्याचंच गाजेलेलं वाक्य) ग्रेट इंडियन रेल्वे बझार हे त्याचं गाजलेलं पुस्तक. होरे लुईस बोर्हेस या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखकाला भेटायला तो अर्जेंटिनामध्ये गेला. तिथे भेटल्यावर बोर्हेस म्हणाला, रोज सकाळी तू यायचं आणि पुस्तक वाचून दाखवायचं. (कारण बोर्हेसची दृष्टी तेव्हा अधू झालेली होती.) मग आपण जेवायला जायचं. त्याप्रमाणे गेल्यानंतर बोर्हेसने त्याला प्लेन टेल्स फ्रॉम द हिल्स हे रुडयार्ड किप्लिंगचं पुस्तकं वाचून दाखवायला सांगितलं. पुस्तक वाचून झाल्यावर दोघे जेवायला गेले. प्रचंड मोठ्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं. तिथे शेकडो माणसं जेवत होती. पण दारात बोर्हेसने पाऊल ठेवल्यावर सगळे गप्प झाले. खूप शांतता पसरली. बोर्हेस आपल्या टेबलावर जाऊन बसेपर्यंत सगळे शांत होते, कुणीही बोललं नाही. तो बसल्यानंतर सगळे बोलायला लागले. थेरोने लिहिलं आहे, लेखकाचा एवढा मोठा सन्मान मी पाहिला नाही.माझ्याकडे घर आणि ऑफिस मिळून दहा हजार पुस्तके आहेत. पण यापेक्षा कितीतरी अफाट संग्रह असणाऱ्या माणसांना मी भेटलो आहे. उदाहरणार्थ श्याम लाल. त्यांच्याकडे २२ हजार पुस्तके होती. दिल्लीला सिरी फोर्टच्या शेजारी ते राहत असत. त्यावेळी इफ्फी चित्रपट महोत्सवाला रोज येत असत. ओळख करून घेतल्यावर त्यांनी मला चहाला बोलावले. दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो. चहा आला. थोड्याफार गप्पा झाल्या. आणि बोलता बोलता त्यांनी एका पुस्तकात डोकं खुपसलं आणि मी तिथे आहे हे ते विसरूनच गेले आहेत हे माझ्या लक्षात आलं. मी पाऊल न वाजवता तिथून निघालो.यावरून मला एक गोष्ट आठवली. स्टीफन झ्वाईग हा ऑस्ट्रियन कादंबरीकार तरुण होता तेव्हा त्याला रोदँ या महान शिल्पकाराने भेटायला बोलावलं आणि बोलता बोलता तो मातीच्या शिल्पावर काम करू लागला. काही वेळाने तो दाराकडे निघाला आणि दार लावताना आत बसलेल्या झ्वाईगला तो म्हणाला ‘अरे तू कुठून आलास?’ झ्वाईगच्या वर्ल्ड ऑफ यस्टर्डे या आत्मचरित्रात ही गोष्ट आलेली आहे. याच चरित्रात आणखी एका प्रसंगाचा उल्लेख आहे. प्रसिद्ध फ्रेंच कवी पॉल वॅलेरी याच्याशी चांगली मैत्री झाल्यावर झ्वाईग त्याला म्हणाला, ‘तीस वर्षांपूर्वी मला तुझ्या कविता परिचित होत्या आणि काही मला खूप आवडल्या होत्या.’ तेव्हा वॅलेरी हसला आणि म्हणाला, ‘मला चकवायचा प्रयत्न करू नको .१९१६पर्यंत माझ्या कविता लोकांसमोर आल्या नव्हत्या.’ तेव्हा झ्वाईगने वॅलेरीला व्हिएन्नामधल्या छोट्या वाङ्मयीन मासिकात १८९८ साली आपल्याला पहिल्यांदा त्या कशा सापडल्या आणि त्या मासिकाचा रंग, आकार इत्यादी तपशील पुरवले. त्यावर चकित होऊन वॅलेरी म्हणाला, ‘पण तेव्हा तर पॅरिसमध्ये या कविता फारशा कोणाला ठाऊक नव्हत्या, मग तुला त्या व्हिएन्नात कशा मिळाल्या?’ त्यावर झ्वाईग म्हणाला, ‘तशाच ! जशा तुम्ही एका खेड्यात शिकत असताना विद्यार्थीदशेत असताना स्टीफन मलार्मच्या कविता मिळवल्यात, आणि त्याही तो कोणाला फारसा माहीत नसताना.’तर पुस्तक वाचणाऱ्यांचं आणि जमावणाऱ्यांचं जग हे असं असतं.---------------------------.Book Reading : वाचणारा माणूस हजार आयुष्यं जगत असतो; न वाचणारा एकच..!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.