किशोर पेटकर
विश्वकरंडक स्पर्धेत खेळत असताना केवळ भारतासाठीच नव्हे, तर साऱ्याच संघांसाठी खेळाडूंची तंदुरुस्ती हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. भारतीय संघासाठीही ही डोकेदुखी आहेच. फलंदाजीत भारताकडे चांगले पर्याय आहेत, परंतु विश्वकरंडक सुरू असताना एखाद्या हुकमी गोलंदाजावर शरीर रुसले, तर बाजू कमजोर होण्याबरोबरच समतोलही बिघडून जाईल..
भारताने एकदिवसीय सामन्यांचा शेवटचा विश्वकरंडक जिंकल्याला आता एक तप उलटून गेले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जगज्जेतेपदाचा जल्लोष केला. ते वर्ष होते २०११.
त्यानंतरच्या दोन विश्वकरंडक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीही पार करता आली नाही. खरं म्हणजे, २०१५ व २०१९मध्ये टीम इंडिया विश्वकरंडक विजेतेपदासाठी संभाव्य स्पर्धक होती, परंतु अपेक्षापूर्ती काही झाली नाही. आता बारा वर्षांनंतर भारतात पुन्हा विश्वकरंडक स्पर्धा रंगणार आहे.
यजमान या नात्याने साहजिकच भारतीय संघावर अपेक्षांचा मोठा दबाव असेलच. यावेळच्या विश्वकरंडकात प्रत्येक संघातील साखळी फेरी मोहीम खूप लांबलचक आहे. प्रत्येक संघाला नऊ सामने खेळावे लागतील. त्यासाठी तब्बल महिनाभर जोश आणि सातत्य टिकवून ठेवावे लागेल.
८ ऑक्टोबरला चेन्नई येथे पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची विश्वकरंडक मोहीम सुरू होईल. १२ नोव्हेंबरला बंगळूर येथे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळेल.
सर्वाधिक ताण पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादेत खेळताना असेल. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी देशांतील क्रिकेटप्रेमींच्या नजरा १४ ऑक्टोबरकडे लागलेल्या आहेत.
पाकिस्तानने जिगरबाज इम्रान खानच्या नेतृत्वाखाली १९९२ साली विश्वकरंडक जिंकला. त्यानंतर प्रत्येकी ५० षटकांच्या सामन्यातील स्पर्धेत पाकिस्तान पुन्हा जगज्जेता ठरू शकला नाही. भारताने १९८३ साली कपिल देवच्या करारी नेतृत्वाखाली अनपेक्षितपणे विश्वकरंडक जिंकला.
त्यावेळच्या यशाचे एक शिल्पकार रॉजर बिन्नी यांचे मत जाणून घेण्याची संधी नुकतीच मिळाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘१९८३मधील देदीप्यमान कामगिरीने भारतीय क्रिकेटकडे पाहण्याची दृष्टी बदलली, आदरभाव वाढला. त्यानंतर प्रत्येक विश्वकरंडकात भारताकडे संभाव्य विजेते याच नजरेने पाहिले गेले.’ १९८७ साली पाकिस्तानसह सहयजमान असताना भारत विश्वविजेतेपद राखणार अशीच चिन्हे होती.
घरच्या मैदानावर बलवान असूनही भारताला उपांत्य फेरी पार करता आली नाही. १९९६मध्ये पुन्हा होम ग्राऊंडवर भारताने ऐनवेळी उपांत्य लढतीत नांगी टाकली. २००३मध्ये दक्षिण आफ्रिकेत अंतिम फेरी गाठूनही ऑस्ट्रेलियाच्या झंझावातासमोर टिकाव लागला नाही. मात्र २०११ साली भारतीय खेळाडू लक्ष्य निर्धारित करून त्वेषाने खेळले, साहजिकच भारतात विश्वकरंडक पुन्हा विराजमान झाला.
मात्र त्यानंतर विराट कोहलीसारखा असामान्य गुणवत्तेचा खेळाडू संघात असूनही भारतीय संघ उपांत्य फेरी पार करू शकला नाही. घरचे वातावरण, परिचित खेळपट्ट्या, पाठीराख्यांचे उत्स्फूर्त प्रोत्साहन इत्यादी बाबी भारतासाठी अनुकूल असतील, फक्त निर्णायक टप्प्यावर कच खाणे हानिकारक ठरेल.
विश्वकरंडक विजेते देश
ऑस्ट्रेलिया (५) ः १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५
वेस्ट इंडीज (२) ः १९७५, १९७९
भारत (२) ः १९८३, २०११
पाकिस्तान (१) ः १९९२
श्रीलंका (१) ः १९९६
इंग्लंड (१) ः २०१९
विश्वकरंडकासाठी आत्मविश्वास
खेळाडू या नात्याने राहुल द्रविड यांना एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वकरंडक कधीच जिंकता आला नाही. वीस वर्षांपूर्वी संधी होती, परंतु अखेरीस उपविजेतेपदच हाती आले. आता द्रविड टीम इंडियाचे मार्गदर्शक आहेत.
किमान प्रशिक्षक या नात्याने विश्वकरंडक जिंकल्याचे समाधान लाभावे यासाठी ते प्रयत्नशील असतील. भारतीय संघाचा आत्मविश्वास, उत्साह वाढविणाऱ्या घटनाही हल्लीच्या काळात घडल्या आहे. विश्वकरंडक नजरेसमोर ठेवून वर्ष-दीड वर्षांच्या कालावधीत भारतीय क्रिकेट संघात खूपच प्रयोग झाले, काही अंगलटही आले. कित्येक खेळाडू अजमावले गेले.
नावाजलेल्या खेळाडूंना वारंवार विश्रांती दिल्याने टीकाही झाली. भारतीय संघाबाबतचे नियोजन योग्य, की अयोग्य याबाबत मतभिन्नता असेलही, मात्र आता विश्वकरंडक संघाने कात टाकल्याचे दिसून येते. आशिया करंडक स्पर्धेत गोड फळ चाखायला मिळाले.
कोलंबोत श्रीलंकेचा अवघ्या ५० धावांत खुर्दा उडवून भारताने आठव्यांदा आशिया करंडक पटकावला. २०१८नंतर टीम इंडियाने जिंकलेली ही पहिलीच मोठी स्पर्धा ठरली. आशिया करंडकात बाजी मारल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावरील मालिका भारताने रोहित शर्मा व विराट कोहलीसारखे दिग्गज संघात नसतानाही खिशात टाकली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशाने मोठ्या प्रमाणात हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण पहिल्या दोन्ही सामन्यांत कांगारूंचा संघ पूर्ण क्षमतेने मैदानात उतरला नव्हता, तसेच त्यांची आताची गोलंदाजी पूर्वीप्रमाणे आग ओकणारी आणि खूप भेदकही नाही. तरीही, आपण ऑस्ट्रेलियासारख्या दर्जेदार संघाला झोडपू शकतो हे मानसिक बळ संघातील नवोदितांना नक्कीच प्राप्त झाले असेल.
धावांसाठी भुकेला आणि यष्टींमागे चपळ ठरलेल्या के.एल. राहुलची तंदुरुस्ती आश्वासक ठरली. राहुलचे आशिया करंडकातील सफल पुनरागमन संघासाठी स्फूर्तिदायक आहे. जसप्रीत बुमराही दुखापतीनंतर सावरताना मर्यादेत छान मारा करताना दिसतोय. धावांसाठी झगडणाऱ्या श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव या मुंबईकरांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय खेळपट्ट्यांवर फॉर्म गवसला. त्यामुळे फलंदाजीत संघातील जागेसाठी चुरस वाढलीच, शिवाय बेंच स्ट्रेंथही बळकट झाली. हार्दिक पंड्या पूर्वीप्रमाणे नेटाने गोलंदाजी टाकताना दिसतोय.
सलामीचा शुभमन गिल सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कालखंडात आहे. डावखुरा गोलंदाज कुलदीप यादवची जादुई फिरकी भारताच्या विजयी कामगिरीत मौल्यवान ठरत आहे. फक्त क्षेत्ररक्षणात भारतीय संघाने जास्त ध्यान देणे आवश्यक आहे. बलाढ्य संघाविरुद्ध मातब्बर फलंदाजांचे सुटलेले झेल सामन्याचे पारडे बदलणारे ठरू शकतात.
तंदुरुस्ती ठरणार कळीचा मुद्दा
विश्वकरंडक स्पर्धेत खेळत असताना केवळ भारतासाठीच नव्हे, तर साऱ्याच संघांसाठी खेळाडूंची तंदुरुस्ती हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. भारतीय संघासाठीही ही डोकेदुखी आहेच. श्रीलंकेत अक्षर पटेल ऐनवेळी जायबंदी झाला, त्यामुळे तातडीने वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोत पाचारण करावे लागले.
तुफानी फलंदाजीची क्षमता असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हल्लीच्या काळात झटपट क्रिकेटमध्ये आपली बॅट तलवारीप्रमाणे फिरवताना दिसलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ३७ वर्षीय रविचंद्रन अश्विनची चाचपणी झाली.
बुमरा, अय्यर यांनाही शारीरिक बाबतीत जागरूक राहावेच लागेल. संघ व्यवस्थापन सध्या बुमराला गोलंदाज म्हणून सावधपणे वापरताना दिसत आहे. फलंदाजीत भारताकडे चांगले पर्याय आहेत, परंतु विश्वकरंडक सुरू असताना एखाद्या हुकमी गोलंदाजावर शरीर रुसले, तर बाजू कमजोर होण्याबरोबरच समतोलही बिघडून जाईल.
यावेळच्या विश्वकरंडकात साखळी फेरीतील पहिल्या सामन्यापासून अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास प्रदीर्घ आहे. ३६ वर्षीय रोहित शर्माला पुन्हा विश्वकरंडक खेळण्याची संधी मिळेल का, कदाचित नाहीच. त्यामुळे तो यावर्षीच स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील असेल.
विराट कोहलीचा स्फोटकपणा अजूनही टिकून आहे, परंतु त्यात सातत्याचा अभाव असल्याचे जाणवते. त्यामुळे आता ३४ वर्षांचा असलेला हा महान फलंदाज आणखी चार वर्षांपर्यंत फॉर्म टिकवून ठेवेल का?
३८व्या वर्षापर्यंत झटपट क्रिकेट खेळण्यास प्राधान्य देईल का?... प्रश्न खूपच आहेत. त्यामुळे रोहित, विराट यांचा या विश्वकरंडकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आत्ता नाही, तर पुन्हा कधीच नाही असाच असेल हे नक्की. भारतीय संघ विश्वविजेता बनल्यास शुभमन गिल, ईशान किशन हे ऐन पंचविशीतील खेळाडू सुपरस्टार बनतील आणि कदाचित पुढील दशक त्यांचेच असू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.