प्रसाद घारे
डॉ. विशाल सरदेशपांडे आणि डॉ. माधवी सरदेशपांडे यांनी ‘आयआयटी’ मुंबईमधून उच्च शिक्षण घेतले आहे. डॉ. विशाल सरदेशपांडे यांनी जगविख्यात ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. थरमॅक्ससह अन्य देशविदेशातील कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काही वर्षे कामाचा अनुभव घेतला आहे.
डॉ. माधवी सरदेशपांडे यांनीदेखील ‘एनसीएल’ या पुण्यातील प्रतिष्ठित संस्थेत काही वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम केले. या कामात पैसा मिळत होता. मात्र, त्यांचे मन रमत नव्हते. त्यांचा आतला आवाज त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल करण्यासाठी सतत साद घालत होता.
अखेर या दाम्पत्याने आपल्या नोकरीवर पाणी सोडले आणि सर्वसामान्य शेतकरीवर्गाच्या जीवनात सुखस्वप्ने फुलून यावीत यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित केमिकलविरहित सेंद्रिय गूळ तयार करण्याचा कारखाना उभारण्याची तयारी सुरू केली.
याकरिता आयुष्याची जमापुंजी खर्ची केली. रात्रीचा दिवस केला. असंख्य प्रयोग केले, शेतकऱ्यांशी संवाद साधला. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. कारखान्याचा सविस्तर आराखडा तयार केला.
पुण्याजवळील लवळे या गावात जागा भाड्याने घेतली आणि कारखाना उभारला. उसाचा रस काढून तो मोठ्या कढईत गरम, गार करून त्यावर विविध प्रक्रिया केल्या गेल्या, रसाचा सामू (पीएच) नियंत्रित केला गेला, असंख्य प्रयोगातून केमिकलविरहित दाणेदार आणि पावडर स्वरूपातील शुद्ध गूळ तयार झाला. अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात आले.