Shailesh Pandey writes research article about online education
Shailesh Pandey writes research article about online education

ऑनलाईन शिक्षण : अडचण नव्हे, आधारशीला

Published on

ऑनलाईन एज्युकेशन किंवा ऑनलाईन शिक्षण ही तशी नवी संकल्पना नाही. १९९८ च्या सुमारास `ई-लर्निंग`ची कल्पना अस्तित्वात आली. पण, ऑनलाईन शिक्षण ही मुख्य प्रवाहातील शिक्षण प्रक्रिया ठरू शकेल, असा विचार कुणीही केला नव्हता. नाही म्हणायला, काही तज्ज्ञ मंडळी बोलत होती. ऑनलाईन शिक्षण हेच शिक्षणाचे भवितव्य आहे, असे सांगताना वाढती लोकसंख्या, घटती जागा आणि विकसनशील देशांमध्ये क्लासरूम टिचिंगसाठी लागणाऱया संसाधनांचा अभाव या कारणांचे दाखले देत त्याचे महत्त्व पटवून सांगत होती. तरीही या विषयाला अपेक्षित गती मिळताना दिसली नाही. कोरोनाने जगाच्या एकूण जगण्यातच बदल घडविला. आपले जगणे, काम करण्याची जागा आणि पद्धत, आपले शॉपिंग, मनोरंजन एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष भेटण्याच्या ओढीला मिळालेले व्हिडिओ कॉलसारखे वळण हा बदल लक्षणीय आहे. त्याला शिक्षण प्रक्रिया अपवाद राहिली नाही. पाण्यात पडल्यावर पोहायला आपोआप येते, असे जे म्हणतात, ते ऑनलाईन शिक्षणासारख्या आतापर्यंत दूर ठेवलेल्या संकल्पनेच्या संदर्भात एक-दीड महिन्यातच खरे ठरले.

जी गोष्ट आपण जाणीवपूर्वक दूर ठेवतो, तिचा अत्यंत सहज स्वीकार आपण संकटाच्या प्रसंगी करतो, हेच ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात दिसून आले. ऑनलाईन शिक्षण भारतासारख्या मोठा डिजिटल डिव्हाईड असलेल्या देशात कितपत क्लासरूम शिक्षणाचा पर्याय म्हणून रुजेल, हे आजच सांगता येत नाही. मात्र, कोरोनासारखे आजारांची पुनरावृत्ती झाली किंवा सहजपणे व सुरक्षित परत येण्याच्या खात्रीसह घराबाहेर पडता येणार नाही, असे कोणतेही संकट मानवी समुदायावर कोसळले तर मात्र ऑनलाईन एज्युकेशनचा आपल्याला संपूर्ण स्वीकार करावा लागेल. एकप्रकारे ऑनलाईन शिक्षण न्यू नॉर्मल म्हणून आपल्याला स्वीकारले पाहिजे, अशी परिस्थिती आजच आहे.

वाढते मार्केट

ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना दोनेक दशकांपूर्वी बाळसं धरायला लागली. या क्षेत्राचे मार्केट आता जगभर मोठ्या वेगाने वाढते आहे. २०२५ पर्यंत ई लर्निंगचे जागतिक मार्केट ३२५ अब्ज डॉलर्सची उलाढाल करेल.  २००० सालापासून आतापर्यंत हे क्षेत्र ९०० टक्क्यांनी वाढलेले आहे. २०२५ पर्यंत ते सध्यापेक्षा तिप्पट आकाराचे होईल. २०१६ मध्ये भारतात हे मार्केट २४७ दशलक्ष डॉलर्सचे होते. २०२१ मध्ये ते १.९६ अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल. समग्र वृद्धीचा विचार केला तर ती एका वर्षात ५२ टक्के आहे. जगामध्ये ऑनलाईन शिक्षणाची जी काही वाढती मार्केट्स आहेत, त्यात थायलंड, फिलिपिन्ससह भारत आणि चीनचाही समावेश आहे आणि या क्षेत्रातील वृद्धीचा दर ३० टक्के असेल, असा अंदाज आहे. आपण फक्त भारतातील शालेय व महाविद्यालयीन औपचारिक  शिक्षणाचा विचार केला तरी त्यात या क्षेत्राच्या वाढीला मोठा वाव आहे. शाळा किंवा महाविद्यालयात प्रत्यक्ष जाणे आणि प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहणे ही जी सक्ती होती, ती कोरोनाने जवळजवळ इतिहासजमा केली. जाणकार मंडळी याचे वर्णन- `जिऑग्राफी इज हिस्ट्री नाऊ` अशा शब्दांत करतात. क्लासरूम शिक्षणाला ऑनलाईन शिक्षण पर्याय ठरू शकत नाही, असे म्हणणारे लोकही आहेत. पण, उद्या क्लासरूमपर्यंत शिक्षक किंवा विद्यार्थी यापैकी कुणालाच, कोणत्याही कारणास्तव कां असेना, जाता आले नाही, तर त्यासाठीची तयारी म्हणून तरी ऑनलाईन शिक्षणाचा आजपासून विचार करायला हरकत नाही.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे

  1. भौगोलिक व वेळेची मर्यादा नाही- ऑनलाईन शिक्षण कुणालाही, कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी घेता येते. इंटरनेटचे कनेक्शन, मोबाईल वा तत्सम उपकरण आणि शिकण्याची इच्छा एवढेच त्यासाठी लागते. दिवसा काम करणारे रात्री शिकू शकतात. रात्रीच्या ड्युटी करणारे लोक दिवसा शिकू शकतात. आठवडी सुटीच्या दिवशी शिकण्याचा पर्याय असतो.
  2. वेळ व पैशाची बचत- प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालयात जाणे व वर्गात बसणे यासाठी येणाऱया खर्चाच्या तुलनेत ऑनलाईन शिक्षणावर होणारा खर्च किती तरी पटींनी कमी असतो. शिवाय, वेळेचे बंधन नसल्यामुळे कोणत्या वेळी काम करायचे आणि कोणत्या वेळी शिकायचे हे आपल्याला ठरवता येते.
  3. संवादाचे नवे रूप- अगदी कालपर्यंत शिक्षकांना प्रश्न विचारणे हा एकच मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध होता. ऑनलाईनमध्ये त्यांची भीड चेपेल आणि ते लर्निंगच्या प्लॅटफॉर्मवरील मेसेंजरचा वापर करून शिक्षकांशी संवाद करू शकतील.
  4. व्यक्तिगत शिक्षणाचा पर्याय- ज्याला एखाद्या विशिष्ट शिक्षकाकडून विशिष्ट प्रकारचे शिक्षण वा कौशल्य शिकायचे असेल, त्याच्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे.

काही तोटे...

  1. वाढलेला स्क्रीन टाईम- या प्रकारच्या शिक्षण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.
  2. प्रयोगाला वाव नाही- प्रयोगशाळेत किंवा फॅक्टरीमध्ये किंवा प्रोटोटाईपसारख्या माध्यमातून शिकायचे असेल तर सध्या तरी ऑनलाईन शिक्षणात तसे पर्याय पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. भविष्यात सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकेल अशी शक्यता आहे.
  3. इंटरनेट जोडणी किंवा उपकरण यातले काहीही पुरेशा क्षमतेने काम करीत नसेल तर ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत मोठी बाधा निर्माण होते.
  4. ऑनलाईन प्रक्रियेत शिक्षकांना विद्यार्थ्याची मानसिकता समजण्यात अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुणाला आणखी समजावून सांगावे लागेल, यासाठी अतिरिक्त प्रयत्न शिक्षकांना करावा लागतो. क्लासरुममध्ये हे सहज लक्षात येते.
  5. स्पर्धेच्या वातावरणाचा अभाव- ऑनलाईन शिक्षण हे प्रामुख्याने एकट्याने घ्यावयाचे असल्याने व विद्यार्थ्यांचा समूह प्रत्यक्षात अस्तित्वात येत नसल्याने स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

डिजिटल डिव्हाईड

भारतासारख्या देशात ऑनलाईन शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पर्याय ठरण्यात बऱयाच अडचणी आहेत हे खरे. मात्र, त्याची वाढ होणार आहे आणि अनेक क्षेत्रांना त्याचा लाभ होणार आहे, हेही तेवढेच खरे. यातले पहिले महत्त्वाचे कारण आहे डिजिटल डिव्हाईडचे.

भारतातील डिजिटल डिव्हाईडचे वर्तमान

  • ग्रामीण भागात संगणक असलेली घरे- ४.४ टक्के
  • शहरी भागात संगणक असलेली घरे- २३.४ टक्के
  • ग्रामीण भागात नेटची उपलब्धता असलेली घरे- १४.९ टक्के
  • शहरी भागात नेट उपलब्ध असलेली घरे- ४२ टक्के

हे आकडे दोन वर्षांपूर्वी नॅशनल सँपल सर्व्हेतून बाहेर आलेले. याचा अर्थ असा, की ग्रामीण भागातच काय, शहरी भागात सुद्धा ऑनलाईन शिक्षण हा शंभर टक्के लोकांसाठी पर्याय ठरू शकेल, अशी स्थिती आज तरी नाही. थिंकझोन नावाचे ओडिशातले स्टार्टअप आहे. त्यांनी इंटरअक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स (आयव्हीआर), एसएमएस आणि रेडिओ या तीन माध्यमांचा वापर करून इंटरनेट नसलेल्या घरांपर्यंत शिक्षण पोचवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी स्थानिक रेडिओ चॅनेलला सोबत घेतले. त्याद्वारे ३ ते १० या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कृती आधारित शिक्षण प्रक्रियेची सामुग्री (अक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मोड्युल) प्रसारित केली जाते. उडिया, हिंदी आणि इंग्रजीतून यासंबंधीचे संदेश दिले जातात. शेजारच्या राज्यांमध्ये देखील थिंकझोनचा लाभ घेतला जात असल्याचे संस्थापक बिनायक आचार्य सांगतात. तब्बल ५००० कुटुंबांपर्यंत आम्ही पोचलो आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे. मुद्दा असा, डिजिटल डिव्हाईड भरून काढण्यासाठी ज्या मूलभूत सोयीसुविधा देशाच्या कानाकोपऱयात पोचवाव्या लागतील आणि नेटचा ऑनलाईन शिक्षणाकरिता वापर करण्यासाठी ज्या प्रकारची क्रयशक्ती निर्माण करावी लागेल, त्यासाठीच्या योजना आज सुरू केल्या तरी त्याचे परिणाम दिसायला काही वर्षे जावी लागतील. थिंकझोनसारखे प्रयोग ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवण्यासाठी विचारात घेण्यासारखे आहेत. याशिवाय, एकूण शैक्षणिक प्रक्रियेचा विचार पारंपरिक पद्धतीने न करता नव्या आयुधांसह करण्याचे दिवस आता आले आहेत.

येऊ शकते रंगत

कोविडमुळे शाळा-महाविद्यालये सध्या बंद असली तरी ती कायमची बंद राहतील, असे समजण्याचे कारण नाही. शैक्षणिक संस्थांमधील वातावरण सर्वार्थाने मुलांच्या हिताचे असते. तेथे विद्यार्थी प्रयोग करून पाहू शकतात, शिक्षकांशी बोलू शकतात, सांघिकता शिकतात, खेळ शिकतात आणि अन्य सांस्कृतिक प्रक्रियांमधूनही जातात. या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो. मात्र, कोविडनंतरच्या काळात उद्भवलेली परिस्थिती, भविष्यातील अशा प्रकारच्या पुनरावृत्तीची शक्यता यासह शैक्षणिक क्षेत्रासाठी लागणाऱया पायाभूत सुविधांचा सध्या जो अभाव दिसतो, त्याचा विचार करता ऑनलाईन शिक्षण हे संस्थात्मक किंवा क्लासरूम टिचिंगला साथ-संगत देणारे व त्यात रंगत आणणारे देखील ठरू शकते.

शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात ऑडिओ-व्हिज्युअल टूल्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत नाही. खडू-फळा, प्रश्नोत्तरे, वाचन-चर्चा आणि फार तर प्रयोगशाळा असेच आपल्या शिक्षणाचे बव्हंशी स्वरुप आहे. त्यात ऑनलाईन टूल्सचा वापर करून रंगत आणता येणे शक्य आहे. त्यातून विद्यार्थ्यांची शिकण्यातली गोडी वाढेल. उदाहरणार्थ- तीस-बत्तीस वर्षांपूर्वी आमच्या पिढीचे लोक जेव्हा विद्यापीठात इंग्रजी साहित्य शिकले, त्याकाळी शेक्सपीअरच्या हॅम्लेटसारख्या नाटकाचे दर्जेदार ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकायला मिळणे ही मोठी गोष्ट होती. आमच्या एक प्राध्यापिका टेपरेकॉर्डर घेऊन वर्गात यायच्या. कॅसेट लावून नाटकातले प्रयोग ऐकवायच्या आणि मग लेक्चर द्यायच्या. त्या काळी यू ट्यूब असते तर वर्गात किंवा घरात बसूनही हॅम्लेट पाहता व समजून घेता आले असते, असे आता वाटते. आमच्या प्राध्यापिकेने शिकवलेले आम्हाला अधिक चांगले समजले असते असेही वाटते. आता या सगळ्या सोयी आहेत. विद्यार्थ्यांना घरी गृहपाठ दिला जातो, तसा विचार सुद्धा ऑनलाईनच्या संदर्भात करता येणे शक्य आहे. त्यांना यू-ट्यूबसारख्या माध्यमातून नेमके काय पाहायचे हे सांगणे आणि दुसऱया दिवशी त्यावर वर्गात प्रत्यक्ष चर्चा करणे अशी सांगड घालता येणे शक्य आहे. एखादे ऑनलाईन गेमिफिकेशन बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी किंवा रूची निर्माण करता येण्यासाठी वापरता येऊ शकते. हे कोणत्याही विद्याशाखेच्या बाबतीत घडू शकते.

शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईनमध्ये केवळ लेक्चर न घेता व्हिडिओज दाखवू शकतात. त्याद्वारे प्रयोग समजावून सांगू शकतात. नाट्यशास्त्र असो वा गणित, सगळ्या विद्याशाखांमध्ये अशाप्रकारे ऑनलाईन माध्यमांचा वापर केला जाऊ शकतो. काही वर्ग काही आठवड्यांसाठी ऑनलाईन भरतील आणि त्यानंतर क्लासरूम लर्निंग देखील होईल, असा विचार होऊ शकतो. गुगल क्लासरूमसारख्या प्लॅटफॉर्मचा त्यात भरपूर उपयोग होऊ शकतो. शिक्षण हे केवळ औपचारिक न राहता ते संस्काराच्या पद्धतीने दिले जायचे असेल आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा व्हायचा असेल तर कोविड़ असेल वा नसेल तरी ऑनलाईन शिक्षण हा एकूण शैक्षणिक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून विचारात घ्यायला हरकत नाही. यात व्यवसायाच्या वाढत्या शक्यता तर आहेतच. शिवाय, मनोरंजनाचा सर्वांना आवडणारा घटक आहे आणि विद्यार्थ्यांच्या उत्सफूर्त सहभागाची व प्रतिसादाची शक्यताही अधिक आहे. सरकार, शिक्षक-प्राध्यापक, शिक्षणसंस्था चालवणारे लोक, पालक या साऱयांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने या अंगाने विचार केला तर ऑनलाईन शिक्षण हे आव्हानात्मक किंवा अडचणीचे नसून ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाची आधारशीला ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...