भोगवे समुद्रकिनाऱ्यावर जायलाच हवं...
दत्ता सावंत
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगातील 30 सर्वांत सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत आपले नाव पक्के केल्यानंतर आता जिल्ह्यातील भोगवे बिचला ब्ल्यू फ्लॅगचे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे पर्यटनातील विकासाच्या मार्गाला आता अधिक चालना मिळेल. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ''पर्यावरण अभ्यास संस्था डेन्मार्क'' या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. यात देशातील 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच्या भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश करण्यात आला. (Blue flag beach )
यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे बीचवर एक नवे आणि आगळेवेगळे निशाण फडकणार आहे. अत्यंत मानाचे असलेले ब्ल्यू फ्लॅगचे मानांकन.
केंद्र सरकारच्या भोगवे बीचला हे मानांकन मिळाल्याचे नुकतेच जाहीर केले. असा स्टेटस मिळवणारा भोगवे हा महाराष्ट्रातील पहिला बीच आहे. भोगवे समुद्रकिनारा हा, पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ला तालुक्यात आहे. पर्यटन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील ७२ बीचपैकी तीन बीच, म्हणजेच भोगवे, चिवला व आरवली (सागर तीर्थ) यांचा विचार ब्ल्यू फ्लॅगसाठी करण्यात आला होता. त्यात भोगवे बीचची निवड झाली. या प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकारकडून करण्यात आला, तर पाण्याची गुणवत्ता तपासणी (पाणी हे या प्रकल्पामध्ये फार महत्त्वाचं मानक आहे) व निर्मल सागरतट अभियानाची अंमलबजावणी ही महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे करण्यात आली.